मन आजारी पडलंच तर काय कराल?

By Admin | Updated: April 12, 2017 16:29 IST2017-04-12T16:29:13+5:302017-04-12T16:29:13+5:30

‘याचं डोकं फिरलंय रे, डोक्याच्या डॉक्टरकडे न्या त्याला’ - असा संवाद कधीतरी आपल्या कानावर पडतोच.

What will you do if you get sick? | मन आजारी पडलंच तर काय कराल?

मन आजारी पडलंच तर काय कराल?

 काय डोकंबिकं फिरलंय काय? डोक्यावर पडलाय का? सायको आहे रे ती. जरा डिप्रेशनच आलंय मला.
मला कसलं डिप्रेशन?  मी कशाला जाऊ डॉक्टरकडे? - ही अशी वाक्यं आपण सतत ऐकतो.
पण जसा शरीराचा डॉक्टर असतो तसा मनाचाही असतो, हे आपण मान्य का करत नाही?

‘याचं डोकं फिरलंय रे, डोक्याच्या डॉक्टरकडे न्या त्याला’ - असा संवाद कधीतरी आपल्या कानावर पडतोच. 
‘डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या?’
‘दिमाग के डॉक्टर के पास जाओ’ - अशी वाक्यंही आपण अगदी सहज वापरत असतो. 
काहींना स्वत:हून जाणवत असतं की आपण हे प्रेशर-टेन्शन स्वत:चं स्वत: हॅण्डल करू शकणार नाही. डोकं फुटेल आता. आपण कोसळू मनातून. आतून पोखरले जाऊ. त्यावेळी एखादा सुरक्षित कोपरा ऐकून घेणारा हवा असतो. पण, त्या माणसानं आपल्या माहितीचा गैरवापर केला तर? - अशी भीतीही वाटत असते. मैत्री आहे तोवर चांगलं आणि मैत्री तुटली तर एकमेकांचे वैरी, अशी आणि इतकीच समज असणारे बहुसंख्य लोक आजूबाजूला असतात. बोलून दु:ख कमी होतं म्हणतात, पण बोलायचं कुणाशी ते कळत नसतं. 
अलीकडे काही सिनेमांमध्ये तरी हिरो-हिरोइन्स समुपदेशकापुढे बसून त्यांचं सुख-दु:ख शेअर करताना दिसतात. आपल्यालाही वाटतं असं असावं कोणीतरी. मेरा कौन सुनेगा? डॉक्टरकडे जावं तर तिथे किती पैसे लागतील? ते आपल्याला परवडतील का? त्यानं फायदा काय होणार? ते औषध देणारे डॉक्टर आहेत मनोविकारतज्ज्ञ (सायकॅट्रिस्ट) की केवळ ऐकून घेणारे समुपदेशक (सायकॉलॉजिस्ट) ते कळत नसतं. यापैकी सर्वांनाच आपण ‘डोक्याचे डॉक्टर’ म्हणत असतो. त्यांच्याकडे कोणी जाताना दिसला की काहीतरी प्रॉब्लेम असणारच डोक्याचा, असे शिक्के मारू लागतो. अर्थात त्याविषयी कुणी बोलत नाही. एक दडपण असतंच. आणि कुणी सांगितलं नाही पण आपल्याला वाटलं की हा डॉक्टरची मदत घेतो आहे तर आपण ‘कुछ तो लोचा है’ असं आपसात गॉसिप करू लागतो. 
आपला प्रॉब्लेम मनोविकार आहे की शेअर करून, आपलं वागणं-विचार बदलून सुटणारा प्रश्न आहे, तेही आपल्याला माहीत नसतं. त्यात आपल्या आयुष्यात वेगवेगळी आव्हानं असतात. सगळ्यांनाच ती ऐकून घेऊन तुम्हाला नेमका सल्ला-उपाय सांगता येईल असं नाही. खरंतर गेलं समुपदेशकाकडे म्हणजे काउन्सिलरकडे आणि सुटला प्रश्न, असंही चटकन होत नसतं. मग आपण जिथे कुठे थोडासा हळवा कोपरा सापडतो, त्यांच्याशी बोलायला जातो. त्यांना वेळ असणं, तुमचं ऐकून घेण्यात रस असणं, नंतर तुमच्या परिस्थितीत काहीतरी मदत होईल असं काही करणं हे फार आव्हानात्मक टप्पे आहेत. 
जसा तुमचा प्रॉब्लेम दीर्घकाळ सुरू असतो, तसेच त्यातून बाहेर पडायचा मार्गदेखील गुंतागुंतीचा असू शकतो. 
एका वाक्यात उत्तर द्या असा इतक्या सहजी तो सुटत नाही. आज गोळी खाल्ली उद्या बरे झालो, असंही मनाच्या बाबत असत नाही. त्यामुळे कौन्सिलरकडे, डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला ऐकून तसं करण्यास काही हरकत नाही. 
सगळ्यात आधी तुम्हाला स्वत:ला स्वत:हून आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडावे असे वाटले पाहिजे. कोणताही देवदूत येऊन चुटकीसरशी तुमचा प्रश्न सोडवू शकणार नाही. मुळात तुमचा प्रश्न काय आहे ते तरी नीटसं कळलं आहे का, हे आधी बघावं लागेल. ते टप्प्याटप्प्यानं होईल असा संयम बाळगला पाहिजे. आपण नेहमीपेक्षा वेगळे वागतोय का? चिडचिड करतोय का? खूप टेन्शन घेतोय का? झोप उडाली आहे का? पळून जावंसं वाटतंय का? काहीच करू नाही असं वाटतंय का? नकोच हे जगणं असं वाटतंय का? खाण्यापिण्यावर लक्ष नाहीये का? शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष कमी देत आहोत का? कशातच उत्साह न वाटणं म्हणजे लगेच डिप्रेशन नसतं हे आपल्याला समजतं आहे का? तेच ते विचार मनात येत आहेत का? किती काळ येत आहेत? नात्यांमधले ताणतणाव असह्य वाटत आहेत का? त्यांच्याशी बोलून प्रश्न सुटतील अशी काहीच आशा दिसत नाही का? पोटदुखी, डोकेदुखी आहे का? किती काळ? काही भास होत आहेत का? कशाची भीती बसली आहे का? हे आपल्याबाबत थोडंसं तरी कळतंय का, त्याचा शोध घेऊन बघायला हवा. आपल्या मनातला गोंधळ नेमका शब्दांत मांडता येतो का तेही तपासून पाहायला हवं.

आपले सेल्फी काढायला आणि तासन्तास ते बघायला आपण कसा भरपूर वेळ घालवतो?
आता जरा शरीर मनाचा सेल्फी घेऊन बघू या!
जितकं मन आतून झकास असेल, तितके तुमचे बाह्य सेल्फीदेखील झकासच येतील. 
प्रयत्न करू स्वत:ला समजून घेण्याचा. 
हळूहळू जमेल की...

 

एरवी दिवसभर आपण व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर असू. अनोळखी लोकांमध्ये मैत्र शोधायला जाऊ. पण कोणी सांगितलं की, ‘अमुक मानसिक हेल्पलाइन वापरून बघा, फ्री आहे’ तर आपण कारणांची लाइनच लावणार.

‘मला घरातून बोलता येणार नाही’

‘मला बोलताच येणार नाही, तुम्ही समजून घ्या’

‘आमच्या गावातून फोन करता येईल का?’

‘रेंज नसते फोनला’

‘किती पैसे लागतील त्याला?’

‘तुम्ही उत्तरं द्या. हेल्पलाइन वापरा, समुपदेशकाकडे जा असले सल्ले देऊ नका मला’ ‘तिथं बोलून काय होणार?’ म्हणजे त्यातल्या त्यात कोणी थोडंसं काही सुचवलं, तर ते कसं मला सोयीचं नाही, हेच आपण डोक्यात घेणार. त्यांना काही कळत नाही, असे शिक्केही चटकन मारणार. समुपदेशकाकडे जाणे वगैरे तर बाजूलाच राहिले.

पण अनेकदा होतं काय आपल्यालाच अगदी अलगद समस्येतून बाहेर पडायचं असतं. कोणीतरी तारणहार येणार आणि अलगद घोड्यावर बसवून वेगात यशाकडे नेणार, समस्येतून बाहेर काढणार असं काही तरी डोक्यात असतं. पण ते खरं नाही. समुपदेशक तुम्हाला तुमच्या बलस्थानांची, कमतरतांची जाणीव करून देऊ शकतो. समस्येतून बाहेर तुम्हालाच पडायचं असतं. रेडिमेड सल्ले, थोर थोर वचनं, सुविचार कायमच सर्व परिस्थितीत उपयोगी पडतील असं नाही. आपली एकूणच परिस्थिती काय आहे, तिच्या कचाट्यात सापडलेले आपण कोण आहोत आणि आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे, यावर सगळं अवलंबून असतं. मित्राने तमुक केलं तर ते मलाही लागू पडेल, असंही यात काही नसतं. पण अनेकदा होतं काय आपल्यालाच अगदी अलगद समस्येतून बाहेर पडायचं असतं. कोणीतरी तारणहार येणार आणि अलगद घोड्यावर बसवून वेगात यशाकडे नेणार, समस्येतून बाहेर काढणार असं काही तरी डोक्यात असतं. पण ते खरं नाही. समुपदेशक तुम्हाला तुमच्या बलस्थानांची, कमतरतांची जाणीव करून देऊ शकतो. समस्येतून बाहेर तुम्हालाच पडायचं असतं. रेडिमेड सल्ले, थोर थोर वचनं, सुविचार कायमच सर्व परिस्थितीत उपयोगी पडतील असं नाही. आपली एकूणच परिस्थिती काय आहे, तिच्या कचाट्यात सापडलेले आपण कोण आहोत आणि आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे, यावर सगळं अवलंबून असतं. मित्राने तमुक केलं तर ते मलाही लागू पडेल, असंही यात काही नसतं.
- प्राची पाठक
prachi333@hotmail.com  

( मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)



 

Web Title: What will you do if you get sick?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.