.आहे उत्तर?

By Admin | Updated: July 3, 2014 18:17 IST2014-07-03T18:17:18+5:302014-07-03T18:17:18+5:30

अकरावीला प्रवेश घेतल्यापासून पदवी मिळेपर्यंतची पाच वर्षं. एकूण दिवस १८२५. प्रत्येक वर्षी ६0 दिवस सुट्टी, म्हणजे एकूण ३00 दिवस वजा केले तर १५२५ दिवस कॉलेजचे.

What is the answer? | .आहे उत्तर?

.आहे उत्तर?

- कॉलेजात पडीक असता, पण करता काय?
 
अकरावीला प्रवेश घेतल्यापासून पदवी मिळेपर्यंतची पाच वर्षं. एकूण दिवस १८२५. प्रत्येक वर्षी ६0 दिवस सुट्टी, म्हणजे एकूण ३00 दिवस वजा केले तर १५२५ दिवस कॉलेजचे. इतक्या दिवसांत काय केलं लेक्चरव्यतिरिक्त? तर कॉलेजमध्ये शिरल्यावर घोळक्यानं उभं राहणे, एका पायावरून  दुसर्‍या पायावर कित्येक काळ उभे राहत निर्थक बोलत राहणं, टाइमपास करणं. छेड काढणं, गाड्या उडवणं, बाकी काहीही केलं नाही, असं का?
 
‘‘आयुष्यातील मोस्ट मेमोरेबल वर्षं. अर्थात कॉलेजची. 
इथून घडलो, क्षण न क्षण सर्जनाचा. नावीन्याचा, कवि-संमेलन, कधी नृत्यरंग, घणाघाती अमोघ वक्तृत्वाचे शेकडो नमुने. उत्स्फूर्त आविष्कार तर श्‍वासासारखा सदोदित तयार. प्रमुख पाहुणा नि कार्यक्र म, त्या तयारीनं रगारगात निव्वळ उत्साहाचं उधाण. इथे वाचायला, चर्चा करायला, शिकलो. विचारांचं व्यासपीठ सापडलं. नेतृत्वाचा स्पर्श झाला. शब्दांना कोंदण मिळालं. अंगातली रग जिरली. एन.सी.सी. नं कमाल केली, शिस्तीचा प्रवाह रक्तात सोडून दिला, अलगद पण कायमचा. आमच्यातले काही लेफ्टनंट झाले, काही मेजर, काहींनी विमानं उडवली, तर काही जमिनीवर स्वत:चं  साम्राज्य निर्माण करण्याची क्षमता बाळगून उभे राहिले.’’
- कॉलेजनं काय दिलं यावर भारावून बोलणारी ही  पिढी. काही वर्षांपूर्वी याच परिसरात घडलेली. त्यांच्या समोर बसणार्‍या बर्‍याच जणांची अवस्था अप्रूप ऐकल्या सारखी. नुकतीच पदवी मिळवलेले त्यातच होते. एवढय़ा वर्षांत आपण नेमकं काय केलं हे त्यांना समजेना. पदवीच्या वर्षात असणार्‍या अनेकांना दोन वर्षांत तू काय केलं लेक्चरव्यतिरिक्त, हा प्रश्न विचारला की चेहरा कोरा-करकरीत व्हायचा.. 
कॉलेजमध्ये शिरल्यावर घोळक्यानं उभं राहणं, एका पायावरून दुसर्‍या पायावर कित्येक काळ उभे राहत निर्थक बोलत राहणं, एखादी चक्कर किंवा थेट कोणतातरी क्लास. नाहीतर गेटबाहेर पडत रस्ता गाठणं. टाइमपास करणं. कॉलेज परिसर हा मज्जा करण्यासाठी, छेड काढण्यासाठी, हातातल्या गाड्या वेगानं पार्किंगपर्यंत आणण्यासाठी असतो असं मानणारे अनेक. ग्रंथालय केवळ सिलॅबस उतरवण्यासाठी. परीक्षेच्या काळात डाउनलोड केलेल्या नोट्स वाचण्यासाठी. तिथल्या कपाटाशी मैत्नीपेक्षा शत्नुत्व अधिक. पुस्तकांची पानं फाडायची, किंवा झेरॉक्स करायची.वेळ कोणाला असतो.वाचन शक्य नाही. एकतर प्रश्न उत्तरं शार्पमधून वाचणार. तीदेखील आदल्या रात्नी.
दिवसभर कॉलेजला पडीक राहायचं.म्हणजे नेमकं काय तर कॅम्पसमध्ये भटकायचं.आठवणी विचारल्या तर कॉलेजबाहेरच्याच जास्त. इथल्या असल्याच तर कुठलातरी राडा, मारलेल्या चकरा, खाल्लेली बोलणी. तासन्तास, दिवसेंदिवस जिथे वावरलो, तिथले काही कसं लक्षात राहिलं नाही..?
अकरावीला प्रवेश घेतल्यापासून पदवी मिळेपर्यंत पाच वर्षं, एकूण दिवस १८२५. प्रत्येक वर्षीचे ६0 दिवस सुट्टी, एकूण ३00 दिवस वजा केले तर १५२५ दिवस. इतक्या दिवसात काय केलं तर फक्त एक डिग्री मिळवली. पाच तास रोज एका सुंदर मोकळ्य़ा वातावरणात येऊन, समृद्ध ग्रंथालय, अद्ययावत सामग्री असणार्‍या इमारतीत येऊन नेमकं काय अनुभवलं ?
काहींचे प्रश्न रास्त असतात. म्हणजे अभ्यास खूप. मान वर करायला जागा नाही. हा क्लास, ते प्रोजेक्ट कायम सबमिशन. व्हिजनचा मारा. वेळ कशात घालवायचा?. काही कॉलेजेस म्हणजे निव्वळ शाळा. आखणीबद्ध. तुमच्या कल्पकतेला वाव नाही. हे घडणं शक्य नाही, ते  होणं नाहीच नाही. अशा कठोर वातावरणात रोमांचित क्षण कसे टिपता येणार? एका पाठोपाठ तास किंवा प्रात्यक्षिक. वेळ मिळालाच तर डबा खाणं, भरमसाट अभ्यासात वेळ आणायचा कसा? आर्ट्स, कॉर्मससाठी प्रचंड वेळात असंख्य पुस्तकं वाचण्याचा अलिखित नियम असतो, आग्रह असतो. पण ते सारं बासनात गुंडाळलं जातं. उत्तरं २0 वा ५0 शब्दात लिहिण्याचा जमाना. 
वाचायचं आहे कुणाला? आमची मतं नकोच आहेत, चकाट्या पिटल्या तर बिघडलं काय? हा वेळ बिलकुल नसतो म्हणत नोटीसबोर्डवरील सर्व सूचना मोबाइलमध्ये क्लीक केल्या जातात, पाच मिनिटंदेखील उभं राहून वाचलं जात नाही. जमाना वेगवान असल्यानं वेळ ‘घालवायला’ कोणी तयार नाही.
सर्मथन वरवर पाहता योग्य वाटलं तरी, तुम्ही काय केलं आहे? अभ्यासक्र म बदला म्हणून धरणं धरलं? या निरु पयोगी अभ्यासक्र माचा मला काय उपयोग म्हणून व्यक्त झालात, त्यासाठी वेळ काढला? आहे तुमच्याजवळ नियोजन? वर्षभरात मी काय करू शकतो. हा प्रश्न तुम्ही स्वत:ला विचारलाय? वर्गातल्या मुला-मुलींचा एक निकोप मैत्नीचा ग्रुप तयार केलाय? त्या ग्रुप समोर आहेत काही विचार, प्रश्न, समस्या, आनंदाचे, सच्चे व्यक्त करण्याचे प्रसंग? रंग रेषांचं प्रदर्शन, पावसाची चाहूल लागत नाही म्हणून कासावीस होणं. पर्यावरण तज्ज्ञाला पाचारण करणं. धरणाच्या साठय़ाबद्दल केवळ चिंतातुर न होता पाणी वाचवण्यासाठी अभियान सुरू करणं. कॉलेजमध्ये असं पाणी वाया जात असेल तर, कचरा व्यवस्थापन होत नसेल तर दबावगट निर्माण करणं. पावसाचा तो चिरपरिचित मृद्गंध आल्याक्षणी बेभान होत पावसाच्या कवितांनी परिसर चिंब करणं. श्रावण नि भाद्रपदात संस्कृती जपणार्‍या  सार्‍या उत्सवाची सर्जक आस्वाद यात्ना घडवणं. गुरु पौर्णिमा हा महत्त्वाचा दिवस, त्या दिवसापासून विद्यादान करणार्‍यांचा सन्मान आणि  अध्ययनासाठी सीमोल्लंघन, केलंय? अभ्यास करता करता पुस्तकांशी संवाद, दर आठवड्याला एखादा उपक्र म. विभाग कोणताही असो. आपण त्या विभागात जायचंच. नवीन शिकून घ्यायचं. उत्तम शिकवणार्‍या प्रोफेसरांच्या लेक्चरला बसायचं. ज्ञानाला नकार कोणाचा असणार? पुरु षोत्तम करंडक सारखी स्पर्धा, मल्हार सारखा महोत्सव प्रत्येक शहरात का होऊ शकत नाही? मेडिकल- इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये वेळेशी झगडताना हाती गवसणार्‍या काही दिवसांचा उत्सव केला जातो. प्रोफेशनल कोर्स करताना वाट वाकडी करून काही डोंगर-नद्याच्या प्रदेशात पंधरा दिवस सहज फिरून येतात.हे रिफ्रेश होणं, त्यांना ऊर्जा देऊन जाते. जे असं काही करत नाहीत, ते करंटे.
आज दिसतंय काय. भाषेबद्दल प्रेम नाही. ना मराठी धड ना हिंदी ना इंग्रजी. त्यामुळे व्यक्त व्हायला वेळ नाही नि रसदेखील नाही. नवीन काही सुचण्यासाठी भरपूर वाचावं लागते. वाचण्यासाठी आवड हवी, पुस्तक सलग वाचण्यासाठी बैठक हवी. त्यासाठी वेळ काढणारे किती तरु ण-तरु णी दिसतात? क्रमिक पुस्तकं वाचत नाहीत, संदर्भ साहित्याकडे जे ढुंकूनही पाहत नाही, त्यांना परिसंवाद, कार्यशाळा, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्र मात रस कसा वाटणार? आपला वेळ कॉलेज नंतर भटकण्यात, खरेदी करण्यात जातो. पायी चालणं, शहरात घडणार्‍या छोट्या-मोठय़ा सभा कार्यक्र मांना न जाणं, यामुळे बौद्धिक पोषण होणार कसं? आंदोलनं-चळवळी जन्माला येण्यासाठी विचार समजून घेण्याची गरज आहे. पाच तासात श्रवणभक्ती, नेत्नसुखाचा प्रत्यय घेत तीन वा पाच वर्षंं घालवली तर कोणत्याच आठवणी जवळ बाळगता येणार नाहीत. क्लासरूम, प्रोजेक्ट, सबमिशन म्हणजे डिग्री. भरपूर टाइमपास करण्याची जागा म्हणजे कॉलेज हे आपणच निर्माण केलेलं समीकरण जोपर्यंत बदललं जाणार नाही, तोपर्यंंत एन्जॉय करणं म्हणजे वेळ घालवणं. हीच व्याख्या पाठ होईल. पाच वर्षंं संपली की मी काही केलं नाही, कॉलेज पूर्ण पाहिलं नाही, लायब्ररीत गेलो नाही, जिमखान्याच्या वार्‍याला थांबलो नाही. कशात सहभाग नव्हता. फक्त पदव्युत्तर शिक्षण घेतलं.
पण मग कॉलेज कॅम्पसमध्ये सात वर्षंं घालवून उरलेल्या वेळाचं काय केलं?
- आहे उत्तर?
 
- वृंदा भार्गवे
(तरुणाईशी उत्तम संवाद असलेल्या,  नाशिकच्या हंप्राठा महाविद्यालयातील मराठी विषयाच्या विद्यार्थिप्रिय प्राध्यापक) 

 

Web Title: What is the answer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.