वेस्ट टू एनर्जी
By Admin | Updated: July 18, 2014 11:42 IST2014-07-18T11:42:14+5:302014-07-18T11:42:14+5:30
मुंबईच्या सागर-परागचे कॅनडात शून्य कचरा घरांसाठी खास संशोधन

वेस्ट टू एनर्जी
>स्वच्छतेची आपली व्याख्या काय?
- तर आपल्या घरातला कचरा बाहेर टाकणे, शहरातली कचरा कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी नेऊन डम्प करणे. पण त्यातून मोठमोठे कचराडेपो उभे राहतात आणि नव्याच समस्या डोकं वर काढतात.
पण त्याऐवजी आपल्या घरातूनच जर कचरा बाहेर गेला नाही तर? म्हणजे कचरा म्हणून आपण जे जे घराबाहेर टाकतो ते टाकावंच लागलं नाही तर, म्हणजेच आपलं घर ‘शून्य कचरा घर’ म्हणून तयार करता आलं तर?
याच जर-तरची उत्तरे शोधत मुंबईच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटमधले दोन विद्यार्थी कॅनडाला रवाना झाले आहेत. या दोन मराठी संशोधकांची नावं आहेत सागर देशमुख आणि पराग पाटील.
घरातली कचर्याचे, टाकाऊ वस्तूंचे योग्य व्यवस्थापन केल्यास, किंवा थेट ऊर्जानिर्मितीसाठी त्याचा वापर केल्यास भविष्यात अनेक घरं शून्य कचरा संकल्पनेवर साकारता येऊ शकतील. याशिवाय उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर कसा करता येऊ शकेल. शैक्षणिक संस्था, बाजारपेठा, मोकळ्या जागा, आरोग्यसुविधा देणार्या संस्था यासगळ्या ठिकाणी जागेचा अधिकाधिक सुयोग्य वापर कसा जमे, अर्थात स्पेस मॅनेजमेण्ट कशी करता येईल याचा अभ्यास करणारी ही मुलं.
वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये एक आंतरराष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. ह्युमनायझिंग ए मेट्रोपोलिस-इंटरडिझाईन असं त्या कार्यशाळेचं नाव. जगभरातून ४0 डिझायनर्स या कार्यशाळेत सहभागी झाले होत. त्या कार्यशाळेत या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प मांडले होत. ‘झिरो वेस्ट हाउस होल्ड’, लिव्हिंग विथ रेन आणि युनिव्हर्सिटी टाउनशिप असं या प्रकल्पांचं नाव. घरातल्या घरात काय केलं तर कचरानिर्मिती टाळता येईल असा हा प्रकल्प.
कॅनडातल्या कार्लटन स्कूल ऑफ इंडस्ट्रियल डिझाईन या स्ंस्थेचे संचालक थॉमस गार्वी यांनी या प्रकल्पांचे कौतुक ता केलंच. पण कॅनडामध्ये झीरो वेस्ट हाउस होल्ड अर्थात शून्य कचरा घरांवर जे संशोधन होत आहे त्या संशोधनात सहभागी होण्याची संधी त्यांनी पराग आणि सागर यांना दिली. सध्या सागर आणि पराग कॅनडियन कंपन्यात इंटर्न म्हणून प्रत्यक्ष कामाचा काही अनुभव घेत संशोधन करत आहेत.
नवनिर्मिती, ऊर्जानिर्मिती आणि आणि शून्य कचरा यावर या मुलांच्या संशोधनाचा भर आहे. त्यालाच ते म्हणतात, ‘वेस्ट टू एनर्जी’.
लोणावळ्याच्या आयफील इन्स्टिट्यूटचे अँग्नेस थॉमस, प्रिया कोठाडिया, कृतेश जांगीर हे विद्यार्थीही या टीमबरोबर कॅनडात संशोधन करत आहेत.
घरोघर ज्या गोष्टी वापरता येणं शक्य आहे, अशा गोष्टींच्या संशोधनावर या मुलांचा भर आहे. त्यातून ते शून्य कचरा घरांची नवी संकल्पना शोधत, उकलत आहेत.
- ऑक्सिजन टीम