आम्ही कॉलेजात काहीच केलं नाही!

By Admin | Updated: August 22, 2014 12:02 IST2014-08-22T12:02:41+5:302014-08-22T12:02:41+5:30

४ जुलैच्या ‘ऑक्सिजन’ पुरवणीनं खडबडून जागंच केलं. ‘ कॉलेजात तुम्ही करता काय?’ हा प्रश्न वाचला आणि कॉलेजचे दिवस आठवले. प्रा. वृंदा भार्गवे यांच्या लेखानं तर डोळ्यात अंजनच घातलं. खरंच, काय केलं आपण कॉलेजच्या पाच वर्षांत?

We did nothing at the college! | आम्ही कॉलेजात काहीच केलं नाही!

आम्ही कॉलेजात काहीच केलं नाही!

४ जुलैच्या ‘ऑक्सिजन’ पुरवणीनं खडबडून जागंच केलं. ‘ कॉलेजात तुम्ही करता काय?’ हा प्रश्न वाचला आणि कॉलेजचे दिवस आठवले. प्रा. वृंदा भार्गवे यांच्या लेखानं तर डोळ्यात अंजनच घातलं. खरंच, काय केलं आपण कॉलेजच्या पाच वर्षांत?
फक्त डिग्री मिळवली. आमच्या कॉलेजात पूर्वी स्नेहसंमेलनं, कॉलेज डे व्हायचे असं ऐकून होतो. पण काही कारणांमुळे ते कायमचे बंदच झाले. त्याची झळ आम्हाला बसली. अगदी शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा एकुलतं एक संमेलन झालं. गीत गायन स्पर्धेत मी भाग घेतला होता तेवढाच. मला लिहायची भारी आवड होती पण आमच्या कॉलेजात साधी निबंध स्पर्धा कधी झाली नाही. त्यात कॉलेजची, मॅनेजमेण्टची अनास्था होती हे खरंय. त्यांनी कधी आम्हाला प्रोत्साहन दिलं नाही की स्वत: पुढाकार घेऊन आम्हाला काही करायला भाग पाडलं नाही.
आणि आम्हीही स्वत:हून काहीच केलं नाही. नाही ना कॉलेजात काही होत मग वर्गात जाण्यापलीकडे दुसरं काही आम्हीही केलं नाही.
आमच्या कॉलेजात अद्ययावत लायब्ररी होती. पुस्तकांनी सजलेली. पण आम्ही तिचा कधी फारसा उपयोग करूनच घेतला नाही. 
आमचे कॉलेजचे दिवस आले आणि उडून गेले, आता वाटतं आम्ही स्वत:ला काही फार या काळात देऊच शकलो नाही. ‘ऑक्सिजन’नं हे खर्‍या अर्थानं कॉलेजलाइफ एन्जॉय करणं फार आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं.
पण आता काय उपयोग?
आपल्या हातून फार काही निसटून गेलंय याची आज जाणीव होतेय, आणि त्याचीच फार खंत वाटतेय.
- सौ. रागिणी सोनकुसरे
उमरेड, जि. नागपूर
 
रिकामटेकड्यांना
जोर का धक्का!
 
फुक्कट जाताहेत दिवस! बोअर करतंय लाइफ. कारण कॉलेजात आम्ही काहीच करत नाही!
 
‘कॉलेजात जाऊन केलय काय?’ असा प्रश्न विचारणारा आणि कॉलेजात असंख्य उद्योग करणार्‍या मित्रमैत्रिणींच्या कहाण्या सांगणारा एक विशेष अंक ऑक्सिजननं ४ जुलै रोजी प्रसिद्ध केला होता. त्या अंकाला प्रतिसाद म्हणून अनेकांनी कळवलं की, आपण कॉलेजात काही म्हणजे काहीच करत नाही. निव्वळ टाइमपास करतो, बोअर होतो, कट्टय़ावर बसतो. असं का करतो? तर हे करायचं नाही तर काय करायचं? हेच आपल्याला माहिती नाही. ‘ते’ नेमकं काय करता येईल हे ऑक्सिजननं सांगितलं तर अनेकांनी आवर्जून कळवलं की, हे तर आम्हीही करून पाहू. कॉलेज मॅनेजमेण्ट आमच्यासाठी काय करतं, हे न पाहता, त्यांनाच दोष न देता आम्ही पुढाकार घेऊ. असाच सकारात्मक दृष्टिकोन मांडणार्‍या दोस्तांची ही काही पत्रं. ती वाचाच, पण एक गोष्ट नक्की, कॉलेज लाइफ आयुष्यात पुन्हा मिळत नाही, जी लो जिंदगी यार!
- ऑक्सिजन टीम
 
म्हणजे आम्ही 
बिंडोकच!
 
‘कॉलेजात तुम्ही करता काय?’
असा थेट प्रश्न तुम्ही आम्हाला विचारला ते बरंच केलं!
पुरवणी हातात घेतली तेव्हा वाटलं, झालं आता मारणार हे बोअर! पण यार, तुम्ही तर म्हणता की कॉलेजात कराच उद्योग. वाट्टेल तेवढे करा, राडे करा, पंगे करा. पण ‘करा काहीतरी’.
हे ‘काहीतरी’ खरंतर आम्हाला सापडत नव्हतं. 
पण ‘ऑक्सिजन’नं आमचे डोळे उघडले. पहिल्यांदाच कळलं की, आपण आपलं कॉलेजलाइफ यादगार बनवू शकतो. शिकू शकतो त्यातून खरंच काहीतरी! त्यामुळे यंदा मी आणि माझ्या ग्रुपनं ठरवलंय की, आपला नेहमीचा आचरटपणा कमी करायचा आणि काहीतरी जरा सेन्सिबल करून पहायचं.
म्हणून मग आमचा आवडता उद्योग सुरू करतोय. कुणाकुणाकडे असलेले गाजलेले इंग्रजी, जुने हिंदी सिनेमे काढतोय. ते एकत्र येऊन पाहतोय, त्याची चर्चा करतोय.
युट्यूबवर काही शॉर्ट फिल्म्स पहायचं ठरवलं आहे. पुस्तकं निदान पहायला तरी लायब्ररीत जाऊ म्हणतोय.
सिन्सिअर ना सही, पण निदान बिंडोक तरी आपण रहायचं नाही. मस्त दिलखुलास जगायचं आणि कॉलेजात खरंच काहीतरी शिकायचं, असं आता ठरवलंय.
थॅँक्स ऑक्सिजन!
- नीलेश देवकुळे
उल्हासनगर, जि. ठाणे
 
लीडरगिरी 
कुणी करायची?
कॉलेजात तुम्ही करता काय?’ हे विचारणारी, काय करायला हवं हे सांगणारी ‘ऑक्सिजन’ पुरवणी वाचली आणि मलाही काहीतरी मनापासून लिहावंसं वाटलं.
मला प्रश्न पडलाय की, कॉलेजात कसं निर्माण होणार नवंनेतृत्व. मी स्वत: महाविद्यालयातील विविध मंडळात काम करत होते. त्यातून बराच अनुभव मिळाला. सध्या होतंय काय, कॉलेजमध्ये निवडणुकाच नाहीत. त्यामुळे जे हुशार असतात, वर्गात पहिलेबिहले आलेले ते सीएस म्हणजे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडले जातात. पण ही ‘हुशार’ मंडळी बाकी कसल्या भानगडीत पडतच नाहीत. त्यामुळे कॉलेजात काही घडणं, कॉलेज प्रशासनाशी बोलणं, विद्यार्थ्यांसाठी काही करणं असं काही घडतच नाही.
खरंतर रॅँकर जीएस असेल तर त्यानं लायब्ररीत कोणती पुस्तकं आवश्यक आहेत, हे पहावं. ती मुलांसाठी मागवावीत. कट्टय़ावरच्यांनी आपला उत्साह चांगल्या ठिकाणी लावला तर बरंच काही घडू शकेल.
पण देशाची सिस्टिम कुणी सुधरायची हा जसा प्रश्न आहे, तसंच कॉलेजात सुरुवात कुणी करायची हा?
ती आपल्यालाच करावी लागेल हेच त्याचं उत्तर. पण ते कुणी समजून कामाला लागताना दिसत नाही.
- पूनम राऊळ
मळगाव, 
ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
 

 

Web Title: We did nothing at the college!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.