स्टायलिश व्हायचंय? बी ओरिजनल!
By Admin | Updated: September 11, 2014 16:57 IST2014-09-11T16:57:05+5:302014-09-11T16:57:05+5:30
कुणाची तरी स्टाईल कॉपी केल्यानं किंवा महागडे ब्रॅण्ड वापरल्यानं तुम्ही स्टायलिश बनत नाही?

स्टायलिश व्हायचंय? बी ओरिजनल!
>फॅशन्सविषयी अपडेट असणं हे अत्यंत महत्त्वाचं झालंय. मात्र फॅशनेबल दिसण्याच्या नादात आपला फॅशनबळी होत नाहीये ना, हे आपलं आपणच तपासून पहायला पाहिजे.
मुळात हे समजून घ्यायला पाहिजे की स्टायलिश असणं आणि फॅशन कॉन्शस असणं यात खूप फरक आहे. शब्द सारखे वाटत असले तरी त्यामुळे आपलं व्यक्तिमत्त्व घडत आणि दिसत असतं.
स्टायलिश असणं म्हणजे काय?
तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट्स आहेत, ट्राऊझर, अँक्सेसरीज आहेत. घड्याळं, गॉगल्स, बॅग्ज, बुट्स आहेत. नेमकं कशावर काय आणि कधी घालायचं याचं परफेक्ट टायमिंग जमलं तर त्याला म्हणायचं स्टायलिंग आणि जो ते करू शकतो तो खरा स्टायलिश. तुमच्या जवळच्या सगळ्याच गोष्टी कदाचित चालू ट्रेण्डप्रमाणं नसतीलही, पण तरी तुम्ही स्टायलिश दिसू शकतात.
उदाहरणार्थ, एखादा मस्त समर टॉप घातला असूनही त्याच्यावर पारंपरिक वळणाचा दागिना घातला किंवा शॉर्ट्सवर मोजडी, कोल्हापुरी चप्पल घातली तरी तुम्हाला एक वेगळा लूक मिळू शकतो. तुम्ही वेगळे, स्टायलिश दिसू शकता. स्टायलिंग करण्याशी, सध्या कसला ट्रेण्ड आहे याचा काही संबंध नाही, नसतोच.
फॅशन कॉन्शस असणं म्हणजे काय?
बाजारात कुठला नवीन ट्रेण्ड आलाय, काय फॅशन इन आहे, सिझनल चेंजमध्ये नवीन काय हे सारं माहिती असणं म्हणजे फॅशन कॉन्शस असणं.
उदाहरणार्थ, सध्या ब्राईट निऑन कलर्स एकदम फॅशनेबल आहेत. मात्र म्हणून निऑन कलरचे कपडे घालणं कसं चांगलं दिसेल? त्यातही ब्राईट कलर्स कायम वापरणं सोयीचं नसतं अनेकांना. मग त्याऐवजी निऑन कलरचे बेल्ट, बॅग्ज, शूज, हेअरपिन्स, ज्वेलरी वापरून आपण उत्तम बॅलन्स करू शकतो.
‘ब्रॅण्डेड’चाच आग्रह कशासाठी?
अनेक लोकांना असं वाटतं की, जे जे ब्रॅण्डेड तेच फक्त चांगलं. काही लोक ब्रॅण्डसची कॉपी मारलेले शर्ट्स, वस्तूही विकत घेतात. काही खूप पैसे खर्च करून ओरिजनल विकत घेतात. पण दिसतात अनेकदा गबाळेच. असं का होतं? एकतर लोकल ब्रॅण्ड घेण्यात काहीच कमीपणा नाही. ते स्वस्तही असतं. मात्र तुम्ही ब्रॅण्डेड घेऊनही काय घ्यायचं, रंग कुोणते, फिटिंग कसंय हेच माहिती नसेल, तर ब्रॅण्डेडचाही बोजवारा उडतो.
त्यामुळे स्टाईल्स कॉपी करणं सोडा, बी ओरिजनल. तुम्ही तुमचं जे मिक्स मॅच कराल, तेच जास्त चांगलं दिसेल!
- प्राची खाडे
स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर