अण्डरटेकर
By Admin | Updated: April 12, 2017 15:50 IST2017-04-12T15:50:26+5:302017-04-12T15:50:26+5:30
एक दिवस हा स्वत:हून रिंग सोडून जाईल असं कधी वाटलं तरी होतं का?

अण्डरटेकर
- रोहित नाईक
WWF तो फक्त एक खेळ नाही, तर तरुण होतानाची रग जिरवत थ्रिल देणारा एक जोश होता. त्या जोशात अण्डरटेकर नावाचा माणूस आयुष्यात आला आणि जगण्याची रिंगच बदलून गेली. फाइट करत जिंकत राहण्याचं वेडच त्यानं सगळ्यांमध्ये वाटून टाकलं!
बापरे. २७ वर्षं कशी भरभर निघून गेली कळालंच नाही...
१९९० साली WWF मध्ये आलेल्या आमच्या आवडत्या अण्डरटेकरनं रविवारी (भारतीय वेळेनुसार सोमवारी) वयाच्या ५२ व्या वर्षी अचानकपणे निवृत्ती जाहीर केली आणि आम्ही एकदम मागे म्हणजे आमच्या बालपणात गेलो. अण्डरटेकर आपल्याला आवडायला लागला तेव्हा नेमकं आपलं वय काय होतं इथपासून काय काय एका झटक्यात आठवू लागलं..
नव्वदीच्या दशकात मोठ्या झालेल्या कुणाही अॅक्शनप्रेमी तरुण मुलाला विचारा ‘अण्डरटेकर’ची सारी कुंडलीच मिळेल त्याच्याकडे. आणि खरंतर अण्डरटेकरविषयी सांगताना तो आपलं तरुण होणं सांगत असेल. त्याची क्रेझ जगणं काय होतं हे सांगत असेल. क्रिकेटवेड्या भारतातही अण्डरटेकरचे दिवाने झाले पोरं. तो काळच वेगळा होता. ज्या काळात केबल आणि इंटरनेट या गोष्टीही फार नवीन आणि तशा दुर्मीळच होत्या.
पण तरी एकेक स्टिकर जमवत अण्डरटेकरच्या किती प्रतिमा जमवल्या पोरांनी त्या काळात त्याला गणती नाही. त्याकाळी अनेकांचा या हहऋ वर जीव होता. शाळेतून आल्या आल्या घाईघाईत टीव्हीपुढे ठाण मांडून रोमांचक फाइट्स बघायच्या हा आवडता कार्यक्रम. आणि मग शाळेत गेल्यावर याच फाइट्सच्या चर्चा आपापल्या गँगसोबत रंगवून सांगायची तुंबळ चढाओढ. त्यात प्रत्येकाचा फेव्हरीट स्टार वेगळा. त्यावरून भांडणंही होत. परंतु सगळ्यांचा एक स्टार फेवरिट असायचा तो म्हणजे अण्डरटेकर.
खरंतर प्रत्येक रेसलरची एक विशिष्ट स्टाइल असते. मात्र ६ फूट ९ इंच उंचीच्या धिप्पाड अण्डरटेकरची स्टाइल सर्वात हटके. गेल्या २७ वर्षांमध्ये अनेक दमदार रेसलर्स आले आणि गेले. परंतु अण्डरटेकर लोकप्रियता मात्र वाढतच राहिली.
हहऋ किंवा हहए मध्ये अण्डरटेकर म्हणजे मृत्यू असंच एक समीकरण. ज्यावेळी अण्डरटेकरची फाइट असायची, तेव्हा त्याची एण्ट्री भन्नाट व्हायची. संपूर्ण स्टेडियममध्ये काळोख व्हायचा. तीन वेळा घंटानाद झाल्यानंतर अचानकपणे रिंगमध्ये प्रतिस्पर्धी रेसलरच्या समोर अण्डरटेकर प्रकट व्हायचा. या भीतिदायक प्रसंगानेच प्रतिस्पर्धी रेसलरची गाळण व्हायची. मुळात हे केवळ मनोरंजन असल्याचं माहिती असूनही पाहणाऱ्याला त्यात जे थ्रिल वाटायचं ते भन्नाट होतं. प्रतिस्पर्धी रेसलरकडून मार खाऊन अण्डरटेकर खाली पडायचा. पण मग अचानक उठून आपली ओळख असलेला ‘चोकस्लॅम’ द्यायचा, तेव्हा मात्र अंडरटेकरप्रेमींच्या आनंदाला मर्यादा राहत नसे.
‘रेसलमेनिया’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या ३३ व्या सत्रात फाइट हरल्यानंतर अण्डरटेकरनं आपले ग्लोव्हज, कोट आणि हॅट रिंगमध्ये टाकले आणि निवृत्तीचे संकेत दिले. त्यावेळी उपस्थित आणि टीव्ही प्रेक्षक सर्वांनाच धक्का दिला. त्याचं असं रिंगच्या बाहेर जाणं अजूनही पचवता येणं अवघड आहे.
कारण तो म्हणजे थ्रिल, तो म्हणजे अटॅक, तो म्हणजे जिद्द आणि तो म्हणजे तुंबळ अॅक्शन. आणि त्यासोबतचं एक तरुण जगणंही!
कोण आहे अण्डरटेकर?
अण्डरटेकरचं खरं नाव मार्क विलियम कॅलव. १९८४ साली वर्ल्ड क्लास चॅम्पियनशिप रेसलिंगमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने १९८९ मध्ये ‘मीन मार्क’ म्हणून वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंगमध्ये प्रवेश केला. येथूनच १९९० सालापासून हहऋ मध्ये अण्डरटेकरचा प्रवास सुरूझाला. टेक्सास प्रांतातील हॉस्टन येथे २४ मार्च १९६५ साली जन्मलेल्या मार्कला चार मोठे भाऊ आहेत. शालेय जीवनात मार्क वॉलट्रिप हायस्कूलच्या फुटबॉल आणि बास्केटबॉल संघाचा सदस्य होता. बास्केटबॉलमधील कौशल्याच्या जोरावर मार्कनं टेक्सासमधील अँजेलिना कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळवून प्रवेश घेतला. मुळात खेळाची प्रचंड आवड असलेल्या मार्कने १९८५ साली स्पोटर््स मॅनेजमेंट असलेल्या टेक्सास वेस्लीन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि १९८५-८६ दरम्यान स्पर्धात्मक बास्केटबॉलमध्ये छाप पाडली. खेळाकडे लक्ष देण्यासाठी मार्कने कॉलेज सोडले आणि रेसलिंगकडे वळण्याआधी त्याने युरोपमध्ये व्यावसायिक बास्केटबॉलमध्ये आपली चमक दाखवली.
अण्डरटेकरला ‘डेडमॅन’ या नावानंही ओळखलं जातं. त्यानं सातवेळा मृत्यूला हुलकावणी दिल्याची दंतकथा चांगलीच गाजली. त्याचं मैदानाबाहेर असणं, दुखापतीवर उपचार करणं आणि त्याचं निधन झाल्याच्या अफवा पसरणं आणि त्यानं परत येत प्रतिस्पर्ध्याला हरवणं हे सारं अनेकदा झालं. खरंतर तो रिंगमध्ये कधीच परतणार नाही यावर म्हणूनच जगभरातले चाहते विश्वास ठेवायला आजही तयार नाहीत.
( रोहित लोकमतच्या मुंबई आवृत्तीत क्रीडा वार्ताहर आहे. rohitnaik7388@gmail.com )