Think b4 U throw
By Admin | Updated: February 5, 2015 19:06 IST2015-02-05T19:06:21+5:302015-02-05T19:06:21+5:30
हल्ली सगळ्यांचे विकेण्ड प्लॅन अगोदरच ठरलेले असतात. पार्टी-पिकनिक-सिनेमा-ट्रेकिंग नाही, तर मस्त झोपा काढणं

Think b4 U throw
> प्राजक्ता ढेकळे -
फेकण्यापूर्वी विचार करा असं सांगत स्वच्छता मोहीम राबवणारा पुण्यातला एक ग्रुप
हल्ली सगळ्यांचे विकेण्ड प्लॅन अगोदरच ठरलेले असतात. पार्टी-पिकनिक-सिनेमा-ट्रेकिंग नाही, तर मस्त झोपा काढणं. अनेकांचा रविवार तर दुपारपर्यंत झोपून उठणे, मग जेवणे मग पुन्हा झोपणे याच एका तत्त्वावर आधारलेला असतो.
पण हे सारं बाजूला ठेवून पुण्यातली काही २0-२२ वर्षांची मुलं एक खास उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहे.
त्या प्रय्नाचं नाव आहे,‘थिंक बीफोर यू थ्रो’. मिहीर भोपळे आणि त्याचे मित्र, कट्टय़ावर गप्पा मारता मारता त्यांना सुचलेली ही कल्पना. सुटीच्या दिवशी शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी जाऊन तिथला कचरा उचलून सफाई करण्याचं काम ते करतात. मिहीर एक अनुभव सांगतो, ‘एकदा आम्ही कट्टय़ावर बसलो होतो. आमच्या समोर एक कपल बसलं होतं. त्यांनी काय काय खाल्लं आणि कागद तिथंच टाकून निघून गेले. आम्हाला वाटलं की, त्यांना सांगावं, इथं कचरा टाकू नका, घेऊन जा, डस्टबीनमध्ये टाका; पण आमच्यापैकी कुणाचं धाडसच झालं नाही. कारण आम्ही तरी वेगळं काय करत होतो? खायचं तिथचं कचरा फेकायचा, त्यामुळं इतरांना काही सांगण्यापेक्षा स्वत:पासून सुरुवात करायचं ठरलं. आणि या कामाला सुरुवात केली. म्हणून मग आम्ही आमचा पहिला क्लिनलिनेस ड्रायइव्ह पुण्याच्या संभाजी बागेतच केला.’
पहिल्या दिवशी ते फक्त चार ते पाच जण होतो. पण त्यांचीही भीड चेपली आणि मग आपल्या कामाविषयी त्यांनी इतर मित्र-मैत्रिणींना सांगायला सुरुवात केली. जे तयार झाले त्यांना घेऊन व्हॉट्स अँपवर एक ग्रुप तयार झाला. फेसबुकवरही थिंक बीफोर युू थ्रोचे पेज त्यांनी बनवलं. त्यातून अनेक माणसं जोडत गेली आणि मग पुण्याच्या फेमस एफसीरोडवरही त्यांनी जोरदार स्वच्छता केली.
आर्किटेक्ट, इंजिनिअर असलेली ही उच्चशिक्षित मुलं असं स्वत:हून काम करतात याचं अनेकांनी अप्रूप वाटून अगदी लहान मुलं, आजोबाही स्वत:हून त्या मोहिमेत सहभागी होऊ लागली. आजपर्यंत त्यांनी शहरात असे १६ क्लिनलिनेस ड्राइव्ह केले आहेत.
‘‘ शहरातला कचरा हा प्रॉब्लेम नसून कचरा वर्गीकरण हा मुख्य प्रॉब्लेम आहे, असं आता आमच्या लक्षात आलं आहे. म्हणून आम्ही आता विविध ठिकाणी जाऊन कचरा वर्गीकरणाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली. ’’
- अमृता जोशी
‘‘या स्वच्छता मोहिमेमुळे स्वत:लाही एक चांगली सवय लागली. आता चहाचा प्लॅस्टिकचा कपही आम्ही रस्त्यावर टाकत नाही आणि इतरांना टाकू देत नाही. ज्याठिकाणी मोहीम राबवली त्या भागातल्या चहाच्या टपर्या, फूड स्टॉल या सर्वांना आपला कचरा वर्गीकरण करून वेगळा टाका असं आम्ही चारचारदा बजावतोय.’’
-तन्मय ब्रम्हे