भटके
By Admin | Updated: December 31, 2015 20:02 IST2015-12-31T20:02:45+5:302015-12-31T20:02:45+5:30
जंगलात जायचं आणि तिथेही सेल्फी क्लीक करत त्या फेसबुकवर शेअर करण्यासाठी रेंज शोधण्यात वेळ घालवायचा.

भटके
जंगलात जायचं आणि तिथेही सेल्फी क्लीक करत
त्या फेसबुकवर शेअर करण्यासाठी
रेंज शोधण्यात वेळ घालवायचा.
..हा असला वेडेपणा कराल, तर
नव्या वर्षात आऊटडेटेड ठराल.
बघा, जगात पोरं भटकायला निघालीत...
मध्यंतरी व्हॉट्सअॅपवर एक जोक व्हायरल होता.
नव्या गावात, देशात गेल्यावर जो तिथं जाऊन ‘सेल्फी’ काढतो तो पर्यटक आणि जो त्या जागांचे, तिथल्या माणसांचेही क्वचित फोटो काढून सारं काही ‘अनुभवतो’ तो खरा प्रवासी जीव!
हे ‘खरं’ करणारा एक ट्रेण्ड सध्या मूळ धरतो आहे आणि पर्यटन व्यवसायाच्या टिपिकल व्याख्याही मोडून पडताहेत!
तसं पाहता फिरणं, भटकंती, आऊटिंग, पर्यटन, देशाबाहेरचं पर्यटन हे सारं नव्या जगण्याचा भाग झालं, त्यालाही आता कितीतरी दिवस झाले, त्यात नवीन ट्रेण्ड असं काही नाही!
पण ‘फिरायला’ लागलेल्या माणसांनी किंवा नव्यानं फिरण्याची इच्छा असलेल्या नवीन माणसांनी जुन्या पद्धतीचं पर्यटन नाकारायला सुरुवात केली आहे, आणि त्या नव्या सुरुवातीचे काही अत्यंत नवीन, प्राथमिक ट्रेण्ड या वर्षात दिसतील असा अंदाज आहे. अर्थात हे ट्रेण्डही नव्या रक्ताचे, सळसळते, उत्साही अॅडव्हेंचरवेडे तरुणतरुणीच घडवणार आहेत, घडवताहेत हे नक्की!
१) युनिक, अननोन, रॉ डेस्टिनेशन
जिथं सहसा कुणी जात नाही, गेलं नाही, ट्रॅव्हल कंपन्यांच्या नकाशावर ज्या जागा अजून पोहचल्याच नाहीयेत त्या जागा हुडकून तिथं जाणं, तिथल्या पद्धतीनं मिळतील तितक्या किंवा जास्तीत जास्त गैरसोयी पत्करून राहणं हा सध्या अनेक तरुण ट्रॅव्हलर्सचा आवडता छंद आहे. त्यात त्यांच्या मदतीला तमाम आॅनलाइन सेवा आहेत, मॅप्स आहेत, जिथं जायचं तिथले लोकल हॉटेल्स आहेत, आॅनलाइन बुकिंगची सोय आहे, आणि जाऊ तेव्हा पाहू हा सगळ्यात मोठा अॅटिट्यूड आहे. बॅग पॅक करून जाण्याच्याही पलीकडचं हे पाऊल! फक्त जायचं, बुकिंग करायचं, किती दिवस आणि कुठं जायचं हे ठरवायचं, बाकी सगळं तिथं गेल्यावर जे मिळेल ते! मिळेल तिथं राहायचं, मिळेल तसं खायचं, काहीच प्लॅन न करता हे असे ‘उनाड’ दिवस जगून घेणं आणि त्या काळात आपला मोबाइल होता होईतो बंद ठेवणं हा यंदा भटक्यांच्या यादीतला अग्रक्रम असेल! त्यात रिस्क असतेच, हाल असतात, पण ते हवं म्हणून ते अशा सुट्ट्या हे भटके प्लॅन करताहेत.
२) अॅडव्हेंचर जंकी
हाच त्यांच्यासाठी परफेक्ट शब्द आहे. त्यालाच नव्या परिभाषेत थ्रिलिकेशन असा शब्द आहे. अॅडव्हेंचर स्पोर्टपासून ट्रेकला जाणारे, कयाकिंग, बंजी जंपीग असं काय काय करून पाहणारे आणि त्यानिमित्त प्रवास करणारे हे अॅडव्हेंचर जंकी. तरुण मुलामुलींमध्ये हे अॅडव्हेंचर टुरिझम वाढणारच नाही, तर त्यासाठीच्या सुविधाही या वर्षात वाढीस लागतील, असा टुरिझम मार्केटचा अंदाज आहे.
३) टेकीसेशन
आता हे काय नवीन? व्हेकेशन विथ टेक्नॉलॉजी म्हणजे टेकीसेशन. मुद्दा काय तर पैसे खर्च करून बड्या हॉटेलमधे, रिसॉर्टमधे राहायचं तर तिथला अनुभवही एचडी असला पाहिजे असं अनेकांचं मत. म्हणून मग फ्री वायफाय, मोबाइल चेकइन्स ते भलामोठा टीव्ही, आॅटोमॅटिक लाइफ आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजिकल अनुभव देणाऱ्या या सुट्टीवर जाणाऱ्यांचं प्रमाणही वाढणार आहे. त्यांच्या या सुट्टीचं नावच टेकीसेशन.
४) फूडकेशन
पुन्हा तेच. सुट्टी तर घ्यायची, पण ही सुट्टी खास खवय्यांसाठी!
म्हणजे सुट्टीवर जाण्याचं प्रयोजनच हे की, आपल्याला माहिती नसलेल्या प्रदेशातलं, भागातलं, स्थानिक, आॅथेंटिक फूड ट्राय करायचं. खाण्याची सुट्टी म्हणजेच हे फूडकेशन. पण हा अनुभव कुठल्या हॉटेलात राहून फारसा मिळत नाही. म्हणून मग लहान गावात जाऊन, लोकांच्या घरी राहून ते पदार्थ खायचे आणि कसे बनतात हे पाहायचंही! सुट्टी खऱ्या अर्थानं सत्कारणी लावायची.
५) बीलीजर
काही बिचारे दुर्दैवी जीव असतात. ज्यांच्या मागचं काम सुटत नाही. जे सुट्टी घेतात. पण लॅपटॉप, मोबाइलवर त्यांचं आॅफिस त्यांच्या सोबत येतंच. पण तरुण मुलांनी त्यातूनही आता मार्ग काढायचं ठरवलं आहे. त्याचं नाव आहे बीलीजर. म्हणजे काय तर बिझनेसनिमित्त कराव्या लागणाऱ्या प्रवासातच लीजर टाइम शोधतात. अशा बिझनेस ट्रीप करणाऱ्यांचं प्रमाण सध्या वाढतं आहे. आणि त्यांचं म्हणणंच आहे की, कामच करायचं तर मग बीचवर बसून करू, आॅफिसात कशाला?
यावर्षी हा असा पॉझिटिव्हली जगण्याच्या धावपळीकडे बघणाऱ्यांचा वर्गही वाढीस लागेल!
- अनन्या भारद्वाज
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)