Steroids and Supplements -threat to your health, beware! | स्टिरॉइड्स आणि सप्लिमेण्ट्स - फिटनेसच्या हट्टापायी शरीराशी खेळ मांडलेल्या तरुण-तरुणींच्या जीवाला धोका !

स्टिरॉइड्स आणि सप्लिमेण्ट्स - फिटनेसच्या हट्टापायी शरीराशी खेळ मांडलेल्या तरुण-तरुणींच्या जीवाला धोका !

ठळक मुद्देकोणाला सहा महिन्यांत सिक्स पॅक करायचेत, तर कोणाला जिममधला, मैदानातला अ‍ॅथलेटिक परफॉर्मन्स वाढवायचाय.

- समीर मराठे

कोणाला झटपट वेटलॉस करायचाय. कोणाला बॉडी बनवायचीय. कोणाला सहा महिन्यांत सिक्स पॅक करायचेत, तर कोणाला जिममधला, मैदानातला अ‍ॅथलेटिक परफॉर्मन्स वाढवायचाय.
- मग काय कारायचं?
सगळं झटपट पाहिजे. त्यासाठी वेळ कोणालाच नाही. जोडीला गल्लोगल्लीतल्या जिम आणि त्या प्रत्येक ठिकाणी ढिगानं असलेले कोच, नाहीतर ट्रेनर्स आहेतच!
तुमची फक्त डिमांड सांगायची, लगेच तुम्हाला सप्लिमेण्ट्स, नाहीतर स्टिरॉइड्सचं सोल्युशनही बर्‍याचदा मिळतं.
बरं ते खोटं तरी कसं मानावं?
कारण ज्या कोच, ट्रेनरनं हे सांगितलंय, तो स्वतर्‍ कसलेला ‘बिल्डर’ दिसतोय. त्यानं ‘तयार’ केलेले, त्याच्यासारखेच त्याचे ‘शिष्य’ तिथे आपण आपल्या डोळ्यांनी पहातोय, तेही येता-जाता याच गोष्टींची चर्चा करताहेत. 
शिवाय बिटाइन, कॅफीन, क्रिएटिन, ग्लुटामाइन, प्रोटीन, अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट्स, सल्फर, बी ट्ेवल्व्ह, सोडिअम बायकाबरेनेट. असली नावं तो ट्रेनर फटाफट तुमच्या तोंडावर फेकतोय. 
तुमच्या आवश्यकतेनुसार झटपट टेलरमेड बॉडी बनवायचीय तर त्यासाठी तुम्हाला काय काय लागेल, तुमच्यात कोणत्या गोष्टींची कमतरता आहे, ते तुम्हाला कसं भरून काढता येईल याचे झटपट सल्लेही देतोय.
मग आपण तरी मागे कसं राहायचं? त्याच्या बोलण्यावर अविश्वास कसा ठेवायचा?
ट्रेनरनं सांगितल्याप्रमाणे आणि काही वेळेस आपलं अधिकचं डोकं लावून आपण लगेच सप्लिमेण्ट्स घ्यायला सुरुवात करतो. ज्यांना ‘हळद पिऊन झटपट गोरं व्हायचंय’ असे अस्वस्थ गिर्‍हाइक तर लगेचंच स्टिरॉइड्सच्या वाटेला जातात.
त्यांच्यात परिणाम दिसतो का?
- नक्कीच.
काहीवेळा काहींमध्ये जाणवेल इतका परिणाम दिसायला लागतो. काही वेळा तर तो लगेच जगालाही माहीत होतो आणि माध्यमांमध्येही झळकायला लागतो.
गेल्या काही दिवसांतल्याच या काही घटना पाहा.
डान्सर आणि अलीकडे स्वतर्‍च फिटनेस ट्रेनर झालेली ठाण्याची एक तरुणी. किती दिवसांपासून ती वेटलॉसच्या गोळ्या घेत होती, माहीत नाही; पण त्या दिवशी तिनं ती गोळी घेतली, (या गोळ्यांवर अधिकृतपणे बंदी आहे) आणि पंधरा तासांच्या आत तिला हे जग सोडून जावं लागलं.
बंगळुरूचा 26 वर्षाचा किरण. त्याला जास्तीत जास्त सहा महिन्यांत सिक्स पॅक हवे होते. जानेवारीत त्यानं जिम लावली. सुरुवात सप्लिमेंट्सपासून आणि नंतर लवकरच स्टिरॉइड्स. फेब्रुवारी महिन्यात आजारी पडला. अनेक डॉक्टरांच्या वार्‍या केल्या. काही हॉस्पिटल्सनी तर त्याला अ‍ॅडमिट करायलाही नकार दिला. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात त्याचं अवतारकार्य संपलं. सिक्स पॅकचं स्वपA अपुरंच राहिलं. 
असे अनेक. आपल्या आसपासचे तुम्हालाही माहीत असतील.  
पण मग नेमकं करायचं तरी काय?
जे खरोखरच फिटनेस एक्स्पर्ट आहेत, त्यांचं म्हणणं, मेहनतीला पर्याय नाही. शॉर्ट कट्सच्या मागे लागाल तर त्याचे फार गंभीर परिणाम भोगावे लागतील.
‘डाएट सप्लिमेण्ट’सवर मूलभूत काम करणार्‍या अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थनं (एनआयएच) अलीकडेच काही गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.
त्यांचं म्हणणं महत्त्वाचं आहे.
कोणतंही ‘परफॉर्मन्स सप्लिमेंट’ हेल्दी डाएटला पर्याय ठरू शकत नाही. तुमचं डाएट जर हेल्दी असेल तर तुम्हाला कशाचीही गरज नाही. तुमच्या डाएटमधूनच तुम्हाला आवश्यक ते सारे घटक मिळतील. मात्र काही वेळा तुम्हाला खरोखरच सप्लिमेण्ट्स ची गरज पडू शकते. पण तुमची अ‍ॅक्टिव्हिटी नेमकी काय आहे. त्याची तीव्रता किती आहे, किती सलगपणे; आठवडे, महिने, वर्षे तुम्ही ती करताहात, तुमचं वय काय. या सार्‍या गोष्टींवर तुम्हाला किती सप्लिमेण्ट्स ची गरज आहे, हे ठरतं.
मुळात आपण आता सप्लिमेण्ट्स  घ्यायला लागलो, म्हणजे लगेच आपल्या बॉडीत सुधारणा दिसायला लागेल असं अजिबात नाही. अनेक सप्लिमेण्ट्स चा तर तुम्हाला काहीही उपयोग होत नाही आणि काही सप्लिमेण्ट्स  तुमच्या शरीरासाठी घातकच ठरतात !
आणखी एक महत्त्वाची गोष्ट. 
समजा तुम्हाला प्रोटीनची गरज आहे, सोडिअमची गरज आहे, किंवा आणखी कसली. पण बाजारात जी रेडिमेड सप्लिमेण्ट्स  मिळतात, ती बर्‍याचदा ‘मिक्स्ड’ असतात, म्हणजे तुम्हाला जो घटक आवश्यक आहे, तेवढाच केवळ त्यात नसतो, तर इतरही अनेक घटक असतात. आणि हे घटक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा प्रत्येक घटक वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करायला सुरुवात करतो. मुळात त्यावर व्यवस्थित रिसर्चच झालेला नसतो आणि त्याचे तुमच्या शरीरावर काय साइड इफेक्ट्स होतील हे तुम्हालाच काय, ज्यांनी ते मार्केटमध्ये आणले आहेत, त्यांनाही माहीत नसतं. त्यामुळे ते खरंच सेफ आहेत का आणि त्यानं तुमचा परफॉर्मन्स खरोखर वाढेल का, या सार्‍याच गोष्टींबाबत अनिश्चितता असते.
एक गोष्ट मात्र नक्की, ती म्हणजे, तुमचा डाएट योग्य हवा, तुमचं ट्रेनिंग उत्तमच असलं पाहिजे, ज्या ट्रेनरकडून तुम्ही धडे गिरवताहेत, तो प्रशिक्षित, नॉलेजेबलच हवा आणि कोणत्याही गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी त्याची परिपूर्ण खात्रीही आपण करायलाच हवी.
त्यामुळे  आधी आपल्या अ‍ॅक्टिव्हिटीची इण्टेन्सिटी पाहा, आपली गरज ओळखा, आपलं डाएट तपासा, आपल्याला खरंच सप्लिमेण्ट्सची गरज आहे का याचं तारतम्य ठेवा, खात्री करून घ्या आणि मगच सप्लिमेण्ट्चा विचार करा. त्यासाठीही आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्या.
आणि.
स्टिरॉइड्सच्या नादाला मात्र अगदी चुकूनही, कधीच न लागलेलं बरं.
- का? ते काय सांगायला हवं?. 

***

कोणती सप्लिमेण्ट्स? किती उपयुक्त?

अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट्स (व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ, कोएन्झाइम क्यू 10.)

जेव्हा तुम्ही व्यायाम करता, तेव्हा तुम्ही श्वासावाटे जास्त ऑक्सिजन घेता; पण त्याचवेळी तुमचे मसल सेल्सही डॅमेज होत असतात. त्यामुळे अनेकजण मसल सोअरनेस आणि थकवा घालवण्यासाठी ही सप्लिमेण्ट्स घेतात. 
किती उपयुक्त, किती सेफ? - योग्य प्रमाणात अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट्स प्रत्येकाला आवश्यकच असतात; पण सप्लिमेण्ट्सद्वारे घेतल्या जाणार्‍या या घटकांचा किती परिणाम होतो, याविषयी शास्रज्ञही साशंकच आहेत. उलट व्यायामाचा फायदा तर ते घटवतातच; पण निद्रानाश, थकवा जाणवणं, डोकेदुखी, पोटदुखी असे साइड इफेक्ट्सही त्यामुळे जाणवू शकतात. 

प्रोटीन सप्लिमेण्ट्स 

प्रोटीनमुळे आपले मसल्स बिल्ड, मेण्टेन आणि रिपेअर होतात. अमिनो अ‍ॅसिड्सपासून प्रोटीन्स तयार होतात. यातले काही अ‍ॅमिनो अ‍ॅसिड्स आपलं शरीरच तयार करतं, तर काही आपल्याला आहारातून घ्यावं लागतं. त्यामुळे प्रोटीन सप्लिमेण्ट्स घेण्याचं प्रमाण खूप मोठं आहे.
किती उपयुक्त, किती सेफ? - 
साधारणपणे 65 ते 70 किलो वजनी अ‍ॅथलिटला 75 ते 135 ग्रॅम प्रोटीनची गरज पडते. काही ठरावीक काळासाठी, तुमचा वर्कआउट खूपच जास्त झाला तर, आणखीही प्रोटीनची गरज पडू शकते. जास्त प्रोटीन तुमच्या शरीरात गेलं तर त्यामुळे त्याचा फारसा तोटा नाही; पण जास्त प्रोटीनचा उपयोगही निश्चितच होणार नाही.

कॅफीन (चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक्स.)

 मर्यादित प्रमाणात कॅफीन घेतल्यास तुमची एनर्जी लेवल, स्ट्रेंग्थ, पॉवर थोडी वाढू शकते, थकवा कमी होऊ शकतो. 
किती उपयुक्त, किती सेफ? - 
दीर्घ पल्ल्याची शर्यत, फुटबॉल, लॉन टेनिस यांसारख्या जास्त काळ चालणार्‍या खेळांसाठी कॅफीनचा उपयोग होऊ शकतो, पण स्प्रिंट रनिंग, वेटलिफ्टिंग यांसारख्या खेळांत त्याचा उपयोग होत नाही. शिवाय प्रत्येकाला  त्याचा उपयोग होईलच असंही नाही. चहा, कॉफी किंवा इतर कुठल्याही मार्गानं प्रौढांसाठी दिवसाला जास्तीत जास्त चारशे ते पाचशे मिलिग्रॅम तर टीनएजर्ससाठी दिवसाला 100 मिलिग्रॅमपेक्षा कॅफीनचं सेवन जास्त नको. (एक कप कॉफीत साधारण 85 ते 100 मिलिग्रॅम कॅफीन असतं.) दिवसाला पाचशेपेक्षा जास्त मिलिग्रॅम कॅफीनचं सेवन झालं तर मात्र तुमचा फिजिकल परफॉर्मन्स वाढण्यापेक्षा कमी होऊ शकतो. झोप डिस्टर्ब होऊ शकते. अस्वस्थता आणि अ‍ॅँक्झायटी वाढू शकते. काही जण आपला परफॉर्मन्स झप्पकन वाढवण्यासाठी डायरेक्ट कोरी, प्युअर कॉफी पावडरच तोंडात टाकतात. बर्‍याचदा या सिंगल डोसचं प्रमाण दहा हजार मिलिग्रॅम किंवा त्यापेक्षाही जास्त असतं. अशी अघोरी कृत्यं मात्र जिवावर बेतू शकतात.

**********

सप्लिमेण्ट्स खरंच घ्यायलाच हवीत का?

- चैतन्य भोसले  (संचालक आणि ट्रेनर ‘वी फिटनेस क्लब’ नाशिक)

पहिल्यांदा एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे सप्लिमेण्ट्स आणि स्टिरॉइड्स या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत; पण दोन्हींना एक समजण्याची गल्लत बर्‍याचदा केली जाते. स्टिरॉइड्स आपल्या शरीरासाठी घातकच असतात. स्टिरॉइड्समुळे आपला परफॉर्मन्स एकदम झपकन वाढल्यासारखा वाटला, तरीही त्यामुळे आपल्या शरीराचे अनेक अवयव डॅमेज होऊ शकतात, प्रसंगी मृत्यूही येऊ शकतो. त्यामुळे परफॉर्मन्ससाठी स्टिरॉइड्स एकदम बाद.
सप्लिमेण्ट्सची मात्र आपल्या शरीराला गरज पडू शकते. उदाहरणार्थ बी-ट्वेल्व्ह, प्रोटीन, वेगवेगळी व्हिटॅमिन्स पण त्यासाठी आपल्या वर्कआउटची तीव्रता किती आहे आणि आपला डाएट काय, कसा आहे यावर सप्लिमेण्ट्सची गरज आहे की नाही हे ठरतं. तुम्ही जर बेसिक लेव्हलचा वर्कआउट करीत असाल, त्याची तीव्रता कमी असेल तर कोणत्याही बाहेरील सप्लिमेण्ट्सची गरज नाही. तुमचा आहार मात्र समतोल असला पाहिजे. तुम्ही प्रोफेशनल स्पोर्ट्समन असाल, तुमचा वर्कआउट खूप हेवी असेल आणि तुमच्या आहारातून आवश्यक घटक पुरेसे तुम्हाला मिळत नसतील, तर मात्र बाहेरून सप्लिमेण्ट्स घेण्याची गरज पडते. योग्य प्रमाणात घेतलेल्या सप्लिमेण्ट्सचा निश्चितच उपयोगही होतो. समजा थोडी जास्त प्रमाणात ती घेतली गेली तरी आपलं शरीर विविध मार्गानी ते बाहेर टाकून देतं. पण त्याचा अतिरेक नको.
कुठे थांबायचं, ही गोष्ट महत्त्वाची आहेच; पण त्याचवेळी हेही लक्षात घेतलं पाहिजे, की आज मार्केटमध्ये खूप मोठय़ा प्रमाणात बनावट, नकली सप्लिमेण्ट्स विकली जाताहेत. त्याचा तुमच्या शरीरावर नक्कीच अतिशय घातक परिणाम होऊ शकतो. शरीराचे वेगवेगळे अवयव डॅमेज होऊ शकतात. किडनी, लिव्हरवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पोट बिघडून अपचनाचा त्रास होऊ शकतो. कमिशन मिळतं म्हणून काही वेळा ट्रेनर्सही अशा गोष्टींचं प्रमोशन करतात.
तुम्ही कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्स खेळत असाल, तर तुमच्या शरीराला जास्त प्रमाणात प्रोटीन्स आणि इतरही अनेक घटकांची गरज पडते; पण तुमचा डाएट जर परिपूर्ण असेल, तर अशा खेळाडूंनाही बाहेरून सप्लिमेण्ट्स घेण्याची काहीच गरज नाही, मात्र बर्‍याचदा इतका परिपूर्ण आहार कोणाचाच नसतो. त्यामुळे गरजेप्रमाणे सप्लिमेण्ट्सचा वापर करावा लागतो. 
पण तुम्ही कोणीही असा, तुमचा वर्कआउट बेसिक असो, नाहीतर इन्टेन्स, किमान तीन गोष्टी प्रत्येकानं तपासून घेतल्याच पाहिजेत. एक म्हणजे ज्या ट्रेनरकडून आपण फिजिकल ट्रेनिंग घेतोय, तो सर्टिफाइड आहे का, त्याचं ज्ञान किती आहे, दुसर, ट्रेनर जे काही सांगतोय ते खरंच बरोबर आहे का, त्याची खातरजमा करून घ्या आणि तिसरं, कोणीतरी काहीतरी सप्लिमेण्ट्स घेतोय, म्हणून आपणही घ्यायची का आणि आपल्याला त्याची खरंच गरज आहे का, याचं भान बाळगणं. कारण एखाद्याला एखादी गोष्ट लागू पडली म्हणजे प्रत्येकाला ती लागू पडेलच असं नाही. याबाबत कुठलाही युनिव्हर्सल नियम नाही.
थोडंसं आपणही आपल्याला तपासून पाहिलं तर अनेक प्रश्नांची उत्तरं सहज मिळून जातील. 


(लेखक लोकमत वृत्तसमूहात उपवृत्तसंपादक आहेत.)
 

(पूरक माहिती आणि संदर्भ - नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ, अमेरिका)

Web Title: Steroids and Supplements -threat to your health, beware!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.