सोशल मीडियाच झाला त्याचा गुरु
By Admin | Updated: July 21, 2016 12:45 IST2016-07-21T12:31:52+5:302016-07-21T12:45:49+5:30
मुंबईतल्या परळमध्ये राहणारा चोवीस वर्षाच्या पराग सावंत या तरुणाचा सोशल मीडिया हाच आयुष्यातला खरा गुरू झाला आहे.

सोशल मीडियाच झाला त्याचा गुरु
प्रवीण दाभोळकर
सोशल मीडियाचा वापर कोणी एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी करतो, कोणी निव्वळ टाईमपाससाठी करतो पण मुंबईतल्या परळमध्ये राहणारा चोवीस वर्षाच्या पराग सावंत या तरुणाचा सोशल मीडिया हाच आयुष्यातला खरा गुरू झाला आहे.
पराग सावंतला डान्स, फोटोग्राफी, व्हिडीओ एडीटिंग, सिनेमेटोग्राफी, अक्षरगणपती कला खूप उत्कृष्ट अवगत आहे. औत्सुक्याची बाब म्हणजे यातील कोणतीही कला शिकण्यासाठी त्याने शिकवणी वर्ग लावले नाहीत.
त्याने यूट्यूबवर आॅनलाईन डान्स पाहून शिकण्यास सुरूवात केली. डान्समध्ये सातत्य ठेवून महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये अनेक पारितोषीके जिंकली. सिनेमेटोग्राफीची माहीती मिळवून त्याने आतापर्यंत सण, उत्सव तसेच सामाजिक विषयांवर मिळून ९४ व्हिडीओ अपलोड केले आहेत. त्याने बनविलेल्या डार्क मेमरी या शॉर्ट फिल्मला मुंबई-पुण्यातील महाविद्यालयांतील स्पर्धांमध्ये गौरविण्यात आले.
अनेक दिग्गजांच्या फोटोच्या वेगळेपणाचा अभ्यास करण्यासाठी त्याने गुगलची मदत घेतील. फोटोग्राफीचे बारकावे हेरून त्यातही प्रभूत्व मिळविले. सोशल मीडीयावरील त्याचे क्लीक पाहून पोर्टफोलिओ, वेडींग, चाईल्ड पोट्रेट, स्टिल फोटोग्राफी यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात विचारणा होऊ लागली. त्यानं स्वत:ची कला यूट्यूब चॅनल मार्फत लोकांपर्यंत पोहोचिवली, त्याला आतापर्यंत साडे तीन लाखाहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत.
पराग म्हणतो, सोशल मीडीया हा आयुष्यातला अविभाज्य भाग बनला आहे. यानेच मला खूप मित्र दिले, चांगली माणसे जोडली गेली, कामाच्या संधी मिळाल्या.
सोशल मीडीयाने जरी गुरु ची भूमिका बजावली असली तरी त्याला परागच्या मेहनत, जिद्द, चिकाटीची जोड नेहमीच राहील्याचे परागचे मित्र अभिमानाने त्याच्याबद्दल सांगतात.