नॉनग्रॅन्ट दिवसातली चप्पल-सायकल

By Admin | Updated: August 1, 2014 11:36 IST2014-08-01T11:36:08+5:302014-08-01T11:36:08+5:30

मला चांगला आठवतो तो दिवस. कारण त्याच दिवसानं मला शिकवलं की, विचार करून निर्णय घे. जुलै १२ वर्ष २00२ दिवसभर फुकट शिकवायचं. माझ्या शाळेला ग्रॅन्ट म्हणजेच सरकारी अनुदान नव्हतं.

Sandal-cycle with non-grant daytime | नॉनग्रॅन्ट दिवसातली चप्पल-सायकल

नॉनग्रॅन्ट दिवसातली चप्पल-सायकल

मला चांगला आठवतो तो दिवस. कारण त्याच दिवसानं मला शिकवलं की, विचार करून निर्णय घे.
जुलै १२ वर्ष २00२  दिवसभर फुकट शिकवायचं. माझ्या शाळेला ग्रॅन्ट म्हणजेच सरकारी अनुदान नव्हतं. एस.टी.च्या भाड्याचे रुपये फार वाटायचे. त्यामुळे मी शाळेत सायकलवरच जायचो. अशाच एका दिवसाची ही पाऊसवाट.
कासोदा ते कुरंगी हा माझा सायकलचा मार्ग.
माझी सायकल काढली. निघालो. कमरेपर्यंत पाणी चिरत जाणं, सायकल खांद्यावर घेणं तसं काही मला नवीन उरलेलं नव्हतंच. 
मी सायकल पाण्यात टाकली. पाऊस थांबला नव्हता. माहेजी ते हणमंतखेडेसीम गिरणेचे खूप मोठं पात्र. पण करणार काय..
पावसाचा जोर वाढतच होता. नदीचं पाणी खूप वाढल्यानं पाणी कमरेच्यादेखील वर गेलं. वाळू असल्यामुळे पाय खूप खोलवर जायचे. अशातच माझी एक चप्पल पायातून निघाली. पाण्याच्या प्रवाहामुळे खांद्यावरच्या सायकलीचे दोन्ही चाकं फिरत होती.
चप्पल शोधण्यासाठी सायकल खाली टाकण्यात अर्थ नव्हता, पाण्याच्या ओढीनं ती वाहून जायची भीती. चपलेसाठी सायकल कोण जाऊ देईल? मी नदीकाठ गाठण्याच्या विचारात दुसरीही चप्पल फेकून दिली. वाटलं, सापडल्याच कुणाला तर दोन्ही चपला सापडलेल्या बर्‍या, एकीचा काय उपयोग? 
पण पावसातून वाट काढता काढता सायकल एकदम जड वाटली, पाहिलं तर माझी एक चप्पल सायकलच्या चाकातच अडकलेली. 
मी कपाळावर हात मारला, सायकलनं चप्पल वाचवली होती, आणि मी मात्र दुसरी उत्साहात फेकली.
 
- पाटील व्ही. एस. (उपशिक्षक)  माध्यमिक विद्यालय, करंगी, ता. पाचोरा,  जि. जळगाव.

 

Web Title: Sandal-cycle with non-grant daytime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.