रिस्क घेताय, पण नेमकी कशासाठी?
By Admin | Updated: June 5, 2014 18:02 IST2014-06-05T18:02:19+5:302014-06-05T18:02:19+5:30
करिअरच्या निर्णायक टप्प्यावर उभी तरुण मुलंच नाही तर त्यांचे पालकही काही गोष्टी ‘मस्ट’ म्हणत उतावीळपणे करत आहेत, त्यांचा हमखास तोल जातोय अशा या काही नव्या निसरड्या जागा.

रिस्क घेताय, पण नेमकी कशासाठी?
>उतावीळ पालक आणि करिअर कौन्सिलरकडे खेट्या
‘आपलं जे झालं ते झालं, आपल्या पोराला काही कमी नको पडायला, काय असतील नसतील तेवढय़ा टेस्ट करवून घेऊ, जातील दोन-पाच हजार, त्यात काय मोठं? आयुष्याचा प्रश्न आहे.’
असं स्वत:लाच सांगत पालक एखादा कौन्सिलर गाठतात. कौन्सिलरने ठरवावं,
आपल्या मुलाला कोणत्या टेस्ट आवश्यक आहे, हे त्या पालकांना मान्यच नसतं.
ते म्हणतात, तुम्ही इक्यू टेस्ट, आय क्यू टेस्ट, अँप्टिट्यूड टेस्ट, पर्सनॅलिटी टेस्ट, स्पीच थेरपी टेस्ट, जमल्यास स्ट्रेस टेस्टही करूनच टाका.
मग एकामागून एक टेस्टांचा रतीब लागतो.
त्यात मुलाचे जे काय रिझल्ट यायचे ते येतात.
पण त्या रिझल्टवर अनेक पालकांचं समाधानच होत नाही.
ते कौन्सिलरशी जोरदार वाद घालतात, ‘नाही कसं म्हणता, इंजिनिअरिंग तर करायचंच आहे त्याला, त्याचा तसा अँप्टिट्यूडच नाही, त्याच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत म्हणजे काय.तुम्ही पुन्हा एकदा तपासा.
दरम्यान, त्या कौन्सिलरच्या कुवतीविषयी शंका घेऊन दुसरा करिअर कौन्सिलर गाठला जातो.पुन्हा तेच चक्र. तीच तक्रार की, कौन्सिलर करिअरविषयी काही फर्म निर्णयच देत नाही.
कौन्सिलर विनवून सांगतात, की आम्ही निर्णय कसा देणार.?
आम्ही फक्त तुमच्या मुलांचे स्ट्रेंथ्स काय, विकनेसेस काय हे सांगू.
त्याला कल सांगू. त्यावर निर्णय तुम्ही आणि त्यानं मिळून घ्यायचा. पण हे ऐकून मुलांपेक्षा पालकच जास्त फ्रस्ट्रेट होतात.
आणि उपाय म्हणून आणखी एखादा कौन्सिलर गाठतात.
शेवटी त्यांना करायचं तेच करतात, काही पालक मुलांना आपण म्हणू तेच आजही करायला भाग पाडतात. कानाकोपर्यातल्या का होईना कॉलेजात अँडमिशन घेऊन देतात. काही पालक, मुलांना म्हणतात तू ठरव तुला काय करायचंय ते. सतरा-अठरा वर्षाच्या अनेक मुलांना आपल्या पालकांना दिलेलं हे स्वातंत्र्य पेलवत नाहीत. ते त्या औदार्याच्या ओझ्याखाली पार दबतात.
आणि झेपणार नाही त्याच अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन मोकळे होतात.
बरीच जणं मनं मारूनच अशी ‘करिअर’ची सुरुवात करतात.
आणि शोधत गेलं तर त्याचं मूळ सापडतं,
पालकांच्या अतीकाळजीत आणि अतीव असुरक्षितेत.
अशा उतावीळ पालकांनी थोडं सबुरीनं घेतलं तर किचकट प्रश्न निर्माण न होताही
कदाचित करिअरची योग्य वाट मुलांना सापडेल.कदाचित.
पण अनेकांच्या बाबतीत आज तसं होत नाहीये, हेच खरं.!