रेझ्युमेत अतिपर्सनल माहिती देताय?- आवरा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 07:25 IST2019-10-24T07:25:00+5:302019-10-24T07:25:04+5:30
रेझ्युमेत जन्मतारीख, जात-धर्म, पत्ता हे सारं लिहायला ती काही लग्नाची कुंडली आहे का?

रेझ्युमेत अतिपर्सनल माहिती देताय?- आवरा.
डॉ. भूषण केळकर
रेझ्युमे कसा नीट लिहावा याचे विवेचन करणारा हा तिसरा आणि या विषयावरील शेवटचा लेख. आपण रेझ्युमे लिहितानाचे तीन मूलभूत नियम बघितले आणि त्याचबरोबर मागील लेखात काही यम-नियमपण.
आजच्या संवादात मला भारतीयांच्या रेझ्युमेमध्ये न आढळणारा आणि जगभरात मान्यता पावलेल्या महत्त्वाच्या घटकांविषयी सांगायचं आहे.
त्याचबरोबर मला तुम्हाला याचीपण जाणीव करून द्यायची आहे की, रेझ्युमे लिहिणे हे प्रकरण तुम्ही समजत असाल तेवढे सोपं नाही. व्यावसायिकरीत्या तुम्ही जर तुमचा रेझ्युमे कोणा तज्ज्ञाकडून व कंपनीकडून करून घेतलात तर भारतामध्ये त्याची किंमत सहजगत्या पाच हजार रुपयांर्पयत जाईल आणि ही किंमत आहे ती अगदी प्राथमिक पातळीच्या रेझ्युमेबाबत आहे.
जरा अनुभव असणार्या वा मॅनेजमेंट पातळीवर असणार्या लोकांचे रेझ्युमे लिहिण्याची किंमत 10-15-20 हजारांर्पयत सहज जाते.
अमेरिकेत जर बघितलं तर हीच किंमत प्राथमिक पातळीला 500 डॉलर्स (रु. 30-35 हजार)र्पयत आहे आणि लक्षात घ्या की ही फक्त रेझ्युमे लिहिण्याची किंमत आहे. नंतर जॉब, इंटरव्ह्यूचा कॉल येईल याची काही खात्री नाही, बरं का!
दुसरं म्हणजे रेझ्युमेमध्ये जे वेगवेगळे उपविभाग आहेत, त्यात वैयक्तिक माहिती, उद्दिष्ट, गोषवारा, शैक्षणिक माहिती, व्यावसायिक प्रत्यक्षानुभव, प्रकल्प, छंद इ. येतात. यातील सर्वात कमी महत्त्वाचा व ज्याकडे कंपन्या जवळजवळ दुर्लक्षच करतात तो म्हणजे ‘वैयक्तिक माहिती’. þ
गंमत म्हणजे भारतीय रेझ्युमेमध्ये खूपसा भर हा वैयक्तिक माहितीवर दिलेला आढळतो. उदाहरणार्थ बहुतांशी भारतीयांच्या रेझ्युमेमध्ये संपूर्ण पत्ता, जन्म तारीख, कुटुंबीयांची माहिती, पासपोर्टचा तपशील, जात-धर्म इ. ची अनावश्यक माहिती असते. हे सारे जणू कमी म्हणून की काय पण भारतीय रेझ्युमेमध्ये कृष्णधवल/रंगीत फोटोपण असतो! मी तर विनोदाने म्हणतो की हुंडा घेणार नाही व पत्रिकेत मंगळ नाही एवढेच फक्त त्यात लिहिले तर तो रेझ्युमे कंपनीला पाठवण्यापेक्षा वधू-वर सूचक मंडळाकडे पाठवायला योग्य होईल!
खरं तर रेझ्युमेमध्ये नक्की पाहिजे अशा गोष्टी म्हणजे ऑबजेक्टिव्ह व त्याचबरोबर समरी (उद्दिष्ट). यामध्ये तुम्ही हे एका वाक्यात लिहिणं अपेक्षित आहे की जर तुम्ही मागताय तो जॉब तुम्हाला मिळाला तर तुम्ही काय करू इच्छिता.
समरी (गोषवारा/ संक्षिप्त माहिती) या भागात तुम्ही हे 3-4 ओळीत/वाक्यात सांगणं अपेक्षित आहे की उद्दिष्टामध्ये तुम्ही जे करू इच्छिता ते नीट करण्यासाठी तुम्ही कसे सुयोग्य आहात.
तुमचं नाव, त्याखाली ई-मेल व सेलफोन आणि असेल तर वेबपेज/ ब्लॉग किंवा लिंकडिन अकाउण्टची लिंक देऊन पुढे ऑबजेक्टिव्ह आणि समरी लिहा. याने फापट पसारा कमी होऊन तुम्हाला जी नेमकी बलस्थानं सांगायची आहेत ती नीट मांडता येतील.
छान कव्हर लेटरसकट जर असा प्रभावी रेझ्युमे तुम्ही पाठवलात तर इंटरव्ह्यू कॉल येण्याची शक्यता खूपच वाढेल.
सर्वाना शुभेच्छा!