गावचा प्रोफेशनल गडी
By Admin | Updated: May 22, 2014 16:02 IST2014-05-22T16:02:09+5:302014-05-22T16:02:09+5:30
खेड्यापाड्यात काय पोरं छंद जोपासणार? त्यातून काय व्यवसाय करणार? खेड्यात कसला आलाय स्कोप असं काही बुरसटलेलं ज्याच्या कुणाच्या डोक्यात असेल त्यानं बिनधास्त या तरुणाला भेटावं.

गावचा प्रोफेशनल गडी
किशोर बागडे- कोण म्हणतं खेड्यापाड्यात हाताला काम नाही.कलेतून व्यवसायाचं रुजलं एक बी.
------------------
खेड्यापाड्यात काय पोरं छंद जोपासणार? त्यातून काय व्यवसाय करणार? खेड्यात कसला आलाय स्कोप असं काही बुरसटलेलं ज्याच्या कुणाच्या डोक्यात असेल त्यानं बिनधास्त या तरुणाला भेटावं. छंद हा व्यवसाय बनेल, हे त्याला कधीही वाटलं नव्हतं, मात्र हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्यानं आपला छंद जोपासला एवढेच नव्हे तर आता त्याच छंदातून व्यवसाय सुरू करून त्याने पाच युवकांना रोजगारसुद्धा दिला आहे.
कशी सुचली आयडिया?
निर्जीव वस्तूंमध्ये प्राण ओतून सुंदर वस्तू बनवणारा किशोर बागडे. आमगाव या छोट्याशा गावातल्या मिताराम बागडे यांचा हा मुलगा. वयाच्या बाराव्या वर्षापासूनच टाकाऊ वस्तूत कला शोधण्याचे त्यास वेध लागले. गव्हाच्या दांड्या, गवत, बांबू, भुसा, रेती, गुंजा, फुले, पाने, पराग, शिंपली, तुळशीची मंजिरी गोळा करून त्यापासून निसर्गरम्य सिनेरी बोर्ड व शुभेच्छा पत्रे तयार करणे हा त्याचा नित्यक्रम होता. राजस्थानी आर्ट, प्राचीन कलाकृती, फोटो फ्रेम, नेमप्लेट, जहाज, लेटर बॉक्स तसेच निसर्गाचे हुबेहूब अनुपम सौंदर्य आपल्या कलाकृतीने टिपून कलात्मक वस्तू तो तयार करतो. त्याच्या मनात असलेल्या विषयाला अनुसरून तो निसर्गचित्रे उभारण्याचा प्रयत्न करतो.
किशोरचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. घरची परिस्थिती हलाखीची. त्यामुळे कुटुंबाचा बोजा किशोरवर आला. त्याला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता पण पैसा नव्हता. त्यामुळे त्याने सन २00९ मध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत कर्ज घेतले. जिल्हा उद्योग केंद्र गोंदिया येथील १0 दिवसीय विशेष प्रशिक्षण घेऊन आपल्या व्यवसायाचे बीज रोवले. सिनेरी बोर्ड, ग्रिटिंग कार्डस् आणि होर्डिंग, फ्लेक्स बोर्ड, नंबर प्लेट, सन कंट्रोल फिल्म, स्टिकर, थर्माकॉल आर्ट, स्टिल लेटर, आयकार्ड, लॅमिनेशन, कव्हरिंग, लग्नपत्रिका, व्हिजिटिंग कार्ड, क्लोजप फोटो, फोटो मिक्सिंग, व्हिडीओ शूटिंग, फोटोग्राफी व रेडियम डिझायनिंग, थर्माकॉल वर्क आदि कलाकृती तयार करण्याचा व्यवसाय त्यानं सुरू केला. त्याच्या हस्तकलेची आदिवासी हस्त विकास संस्था गोंदियाने दखल घेतली आहे. आज त्याच्याकडे प्रेमेंद्र वाटकर, मुकुंद भांडारकर, दिलीप वासनिक, मंगल पाचे व नरेश फुंडे हे पाच युवक काम करीत आहेत.
आता त्याच्या छोट्या गावात व्यवसायाचा जम बसू लागला आहे.
अडचणी काय आल्या?
१) अपमान होतात, हातात पैसे नसतात तेव्हा कुणी उभं करत नाही. पण आपल्या हातांवर, कष्टांवर विश्वास ठेवावाच लागतो.
२) आपल्याला हे काम जमेल, असं इतरांना वाटत नाही. त्यामुळे स्वत:ला सिद्ध करावं लागतं, तो काळ अवघड असतो.
लक्षात काय ठेवायचं?
१) आपला हात जगन्नाथ एवढंच लक्षात ठेवायचं. शहरं-खेडी असा काही फरक नसतो. आपलं काम प्रोफेशनल असावं लागतं, हेच महत्त्वाचं.
- एच. के. फुंडे,कालीमाटी (गोंदिया)