- निशांत महाजन
फ्रेंडशिप देतीस का? - असं विचारण्याचा एक काळ होता. स्री-पुरुष मैत्री तर काय भयंकर चर्चेचा विषय होती. मैने प्यार किया सिनेमाच्या काळात, एक लडका-एक लडकी दोस्त नहीं हो सकते असं म्हणणारे तर सर्वत्र होते. आता काळ असा बदलला की कुणीही कुणाला चटकन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो आणि ती रिक्वेस्ट स्वीकारलीही जाते. प्रत्यक्ष भेट झालेली असो-नसो, आपण फेसबुक आणि व्हॉट्सअॅप फ्रेंड्स तरी सहज बनतो. गप्पा मारतो. व्हॉट्सअॅप नंबर शेअर झाला काय किंवा एखाद्या ग्रुपवर भेट झाली काय हल्ली चटकन मैत्री होते. लगेच ऑनलाइन चॅट सुरू होतं. भरपूर गप्पा, जोक्स, इमोजी असं लगेच देवाणघेवाण, फॉरवर्ड ढकलणं, बड्डे विश करणं, आणि पर्सनल गप्पा मारणं सुरू होतं.आता जे असं सहज फोनवर होतं, ते कार्यालयातही होतं.वर्क कल्चर बदलतं आहे, लोक अधिक खेळीमेळीनं वागतात ही चांगली गोष्ट आहे, मात्र आता चर्चा आहे ती व्हचरुअल मैत्री आणि प्रोफेशनल मैत्री यांच्यात काही घोळ झाले तर ते कसे निस्तरायचे?हल्ली वारंवार प्रोफेशनल मैत्रीबद्दल बोललं जातं. प्रोफेशनल मैत्री कशी असावी, कुणाशी असावी, त्यातून करिअरवर काय परिणाम होतो हे सारं आता नव्या कार्यालयीन संस्कृतीचा भाग बनतं आहे. अर्थातच रोजच्या कामाचा व्याप सांभाळणं, सतत एकसारख्या वातावरणात वावरणं, टीम म्हणून एकत्र काम करणं, अगदी चिकटून खुच्र्याना खुच्र्या लावून बसणं, एकसारख्या अनुभवांचं जगणं वाटय़ाला येणं यातून सहकर्मचार्यांबरोबर एक प्रकारचं सहज नातं जुळून येतं. गप्पा-विनोद, शेअरिंग सारं सुरू होतं; पण व्यक्तिगत आयुष्यात आपण मैत्रीकडून ज्या अपेक्षा ठेवतो, त्याच अपेक्षांचा डोंगर जर व्यावसायिक मैत्रीत ठेवला तर घोळ, मनस्ताप अटळ आहे.आणि मग आपण म्हणतो की, प्रोफेशनल मैत्रीत काही खरं नाही. लोक माझ्याशीच का वाईट वागतात. मलाच दगा देतात. माझ्या पाठीवर पाय देऊन तमका/तमकी पुढं निघून गेले, मी काम केलं, भलत्यानंच क्रेडिट घेतलं आणि माझा दोस्त म्हणवत होता किंवा मैत्रीण म्हणून शेअरिंग होतं.हे सारं टाळायचं असेल आणि निकोप प्रोफेशनल मैत्री करायची असेल तर.. त्यासंदर्भात या काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
1) कामाच्या ठिकाणी दोस्ती झाली, मस्त मैत्री झाली तरी हे विसरू नका की आपण सहकारी आहोत, प्रोफेशनल सहकारी, प्रसंगी स्पर्धकही आहोत. त्यामुळे मैत्रीत जी स्पर्धा नसते ती या प्रोफेशनल मैत्रीत असणारच! त्यामुळे आपण किती आणि काय शेअर करतो आहोत, याचा विचार करा.2) मैत्नी आपल्या ठिकाणी आणि काम आपल्या ठिकाणी. मर्यादित कक्षेतलं नातं सांभाळणं कठीण नक्की असतं; पण अशक्य नाही. 3) मात्र कामापुरती, मैत्नी करू नका. आणि मैत्रीत राजकारण करू नका. ऑफिसचं राजकारण मैत्नीमध्ये येता कामा नये. एकदा विश्वास गमावला की तो कमावणं फार अवघड. 4) सहकारी आपल्यापेक्षा पुढे जाऊ शकतात, हे कधीच विसरू नका.5) प्रोफेशनल मैत्रीविषयी पझेसिव्ह होऊ नका. आपल्या व्यावसायिक जगापलीकडे मित्राला जग आहे हे कायम लक्षात ठेवा.