पॉप्स, फेल आणि हिरो
By Admin | Updated: December 11, 2014 20:31 IST2014-12-11T20:31:16+5:302014-12-11T20:31:16+5:30
माऽऽ माऽऽ, मै फस्ट क्लास फस्ट आया मा, असं म्हणत हातात ट्रॉफी घेत जो धावत येतो तोच हिरो, असं डीडीएलजेपूर्वीचे सिनेमे सांगायचे.

पॉप्स, फेल आणि हिरो
माऽऽ माऽऽ, मै फस्ट क्लास फस्ट आया मा, असं म्हणत हातात ट्रॉफी घेत जो धावत येतो तोच हिरो, असं डीडीएलजेपूर्वीचे सिनेमे सांगायचे. या सिनेमातील राज तर लंडनच्या त्याच्या युनिव्हर्सिटीमधे चक्क नापास होण्याचा विक्रम करून दाखवतो. आपल्याला वाटतं, घरी गेला की वडील त्याला सट्कारतील ! तर त्याचे वडील जाम खूश होतात. हे अतिश्रीमंत ‘पॉप्स’ राजला सांगतात की, ‘फेल होना और पढाई न करना हमारे परिवार की परंपरा है ! बाकी सारे तरी देशात नापास झाले होते, तू तर परदेशात नापास झालास. आणि एक लक्षात ठेव, दीमाग में किताबे भरनेसे जेबें थोडी भरती है ?’
मग हेच वडील मुलाला युरोप ट्रिपवर पाठवतात. मी कष्ट करत तारुण्य वाया घालवलं, तू माझ्या वाट्याचंही जगून घे, म्हणतात.
हे सारं तेव्हा हिंदी सिनेमाच्या पडद्यावर नवीन होतं. घरोघर अभ्यासाचे लकडे, एकेका पॉइंटने जाणार्या जागा, अमेरिकेला जायचे लागलेले वेध, मुलांच्या अभ्यासासाठी अतिरेकी प्रयत्न करणारे आईवडील असं अवतीभोवतीचं वातावरण. दहावीच्या परीक्षेआधी रिंगमास्टर होत मित्रमैत्रिणींच्या आयांनी रजा काढकाढून त्रास दिल्याचं आठवत होतंच. आणि तेव्हाच माझ्यासारखे बरेचजण, दहावीला चांगले मार्क मिळवूनही सायन्स नाकारत, डॉक्टर-इंजिनिअर नाही होणार असं घरच्यांना ठामपणे सांगत, त्यापायी मार खात आर्ट्सला निघाले होते. १९९५ हे महाराष्ट्रातलं पहिलं वर्ष ज्यावर्षी दहावीत ऐंशी टक्क्यांहून जास्त मार्क असलेल्यांनीही अकरावी आर्ट्सला प्रवेश घेतला होता. आपल्याला ज्यात रस आहे, त्यातच करिअर करण्याचा रोमॅण्टिसिझम तरुणांच्या मनात जागा होत असतानाच ‘ढ’ गोळा, बेपर्वा, वातट्र राज हिरो बनत होता.
लाइफमधे ‘हिरो’ बनण्याची परिभाषाच बदलायला लागली होती.