BDD भकास खेळ चाले!

By Admin | Updated: March 31, 2016 14:24 IST2016-03-31T14:24:10+5:302016-03-31T14:24:10+5:30

सतत सेल्फी काढून ते पोस्ट करणारे अनेकजण आजारी असतात, अटेन्शनसाठी भुकेले असतात आणि स्वत:शीच विचित्र भावनिक खेळ खेळत राहतात, असं सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवाल? -पण हे खरंय!

Play BDD bikes! | BDD भकास खेळ चाले!

BDD भकास खेळ चाले!

मध्यंतरी एक व्हिडीओ पाहिला. मोठा गमतीशीर. एक तरु ण प्रेमी युगुल एका रोमॅण्टिक रेस्टॉरण्टमध्ये बसलेले आहेत. अगदी एकमेकांना बिलगून. त्यांच्या गुलुगुलू गप्पा चालू आहेत. काहीतरी होतं आणि त्यांच्यात खटके उडायला लागतात. खटके वाढत जातात. एकीकडे ते भांडत असतात तर दुसरीकडे त्यातली तरु णी खटाखट तिचे आणि तिच्या मित्रचे सेल्फी घेत असते. ते पाहून कुणालाही वाटेल की, ती या कडाक्याच्या भांडणाचे सेल्फी काढत बसलीये? तर तसं नाही!! ती त्यांच्या भांडणाचे सेल्फी घेत नव्हती तर भांडणात मध्येमध्ये काही सेकंदाचा ब्रेक घेत मित्रच्या जवळ जात, ओठांचा चंबू करत हसत हसत ती त्यांचा सेल्फी घेतेय, तो मित्रही तेवढय़ापुरता कॅमे:यात बघून तेवढय़ापुरता हसतो.  सेल्फीचा तेवढा सेकंद संपला की पुन्हा दोघांचं भांडण सुरू.  पुढच्या क्षणी पुन्हा ती तरु णी सेल्फी काढते, तेवढय़ापुरती मित्रजवळ जातेय, सेल्फी काढून झाला की लांब होत भांडण कंटिन्यू. असं एकदा दोनदा नाही तर ब:याचदा चाललेलं दिसतं.
हे एवढंच दाखवून ती दीड मिनिटांची शॉर्ट फिल्म संपते. 
हा व्हिडीओ बघत असताना खूप हसू येतं, गंमतही वाटते, पण त्याचबरोबर काहीही न बोलता सेल्फी काढणा:यांच्या मानसिकतेवर तो व्हिडीओ अचूक बोट ठेवतो.
म्हणजे प्रत्यक्षात एकीकडे त्या दोघांमध्ये भांडण पेटलेलं असतं. प्रत्यक्षात मूड चांगला नसतोच, कदाचित त्यांचं नात ब्रेकअपच्या टप्प्यावरही पोहचलेलं असेल पण तरीही आम्ही एकमेकांच्या किती प्रेमात आहोत, आम्ही किती आनंदात आहोत हे जगाला दाखवण्याचा तिचा अट्टहास मात्र सुरूच असतो. प्रत्यक्षात एकमेकांवर असलेलं प्रेम उरलेलं आहे की नाही, ते तसं आहे की नाही हे त्यांचं त्यांनाही नीटसं आकळत नसताना सोशल मीडियासाठी मात्र त्यांनी स्वत:च्या प्रेमाचं एक आभासी जग आणि आभासी चित्र निर्माण केलेलं आहे.
विशेष म्हणजे या शॉर्टफिल्मवाले हे दोघे काही गमतीपुरता अपवाद नव्हेत. 
सेल्फीचं वेड सर्रास सरसकट दिसतं हल्ली, त्या सेल्फपायी जीव गमावल्याच्या बातम्या आपण वाचतो, आणि तरी पण अनेकजण जगताना हरघडी स्वत:सह इतरांना कॅमे:यात टिपत सेल्फी काढत सुटलेले दिसतात. यावरूनच सेल्फी हा प्रकार किती नशा आणणारा आणि आत्मस्तुतीची चटक लावणारा आहे हे लक्षात येतं. 
सेल्फीचा खेळच मोठा रंजक असतो. आणि तो संपूर्णपणो स्तुतिपाठकांवर अवलंबून असतो. जितके  लाइक्स जास्त तितकी पुन्हा पुन्हा सेल्फी टाकण्याची ओढ तीव्र. 
म्हणून मग सतत आपल्या लव्ह लाइफचे, कुठकुठल्या एक्झॉटिक डेस्टिनेशनला दिलेल्या भेटींचे, बनवलेल्या ‘हटके’ पदार्थांचे सेल्फी टाकणा:यांची संख्या वाढतेच आहे. त्यात सेल्फीच्या या खेळाला फोटोशॉपपासून निरनिराळ्या अॅपची सहज मदत मिळाल्यानं सोशल मीडियात पोस्ट होणारा प्रत्येक फोटो सुंदरच दिसतो. आकर्षक आणि हटके असतो. परिणाम म्हणजे त्यांना भरपूर लाइक्स मिळतात. मग लाइक्स जास्त म्हणून सेल्फी जास्त नी पोस्ट करत शेअर करण्याची ओढही जास्त. हे चक्र असं सुरूच राहतं, नव्हे जास्त गतिशील होतं, अधिक डिमाण्डिंग होतं.
 
सेल्फी? व्यसन की आजार?
 अतिरेकी सेल्फी काढणं आणि सोशल मीडीयावर टाकणं टाकणो हे व्यसन आहे का?
या प्रश्नांचं उत्तर देणा:या दोन विचारधारा सध्या आपला अभ्यास मांडत आहेत. 
 
1) यातला एक गट म्हणतो सेल्फी हे व्यसनच आहे. कारण ते पुन्हा पुन्हा करावंसं वाटतं, त्याची तलफ येते आणि सेल्फी काढून सोशल मीडियात टाकणारी व्यक्ती स्वत:ला त्यापासून रोखू शकत नाही. सेल्फी टाकल्यानंतर त्या व्यक्तीला छान वाटल्याचा भास होतो. आणि ते छान वाटणं सतत सुरू राहावं म्हणून इतर व्यसनी लोक जशी आपल्या व्यसनाचाच आधार घेतात तसं हे सेल्फीचं व्यसनही पुन्हा पुन्हा तीच कृती करायला भाग पाडतो.
 
2)  दुसरा गट म्हणतो हे व्यसन नाही. हा एक आजार आहे. ज्याचं नाव, बॉडी डीस्मोर्फिक डिसऑर्डर किंवा बीडीडी. 
ज्यांना स्वत:च्या शरीराबद्दल पुरेसा आदर नसतो, किंवा ज्यांना असं वाटतं की आपण सुंदर नाही, आकर्षक नाही, किंवा अगदी त्या उलट ज्यांना असं वाटतं की, आपण खूप सुंदर आहोत, आकर्षक आहोत, मात्र आपलं सौंदर्य टिकून आहे की नाही याबद्दल जे अति संवेदनशील आहेत असे लोक सतत स्वत:ला तपासून बघत असतात. पूर्वीच्या काळी अशा स्वरूपाचा आजार असलेले लोक स्वत:ला हजारदा आरशात बघत. आज हातात सुपर एफिशियंट कॅमेरा आल्यामुळे ते धडाधड स्वत:चेच फोटो काढून त्यावर इतरांकडून आपण चांगले दिसतोय, आपण कूल आहोत, आपण हॉट आणि सेक्सी आहोत, आपण हटके आहोत याची पावती मिळवण्याची धडपड सुरू करतात. बरं यातली अजून एक गोम अशी की, हे कसेही काढलेले फोटो दुरु स्त करणारे अॅप्स उपलब्ध आहेत. त्यामुळे फोटो देखणोच दिसतात. आणि मग अनेकजण या चक्रात इतके अडकून पडतात की, आपल्याला एक नवाच आजार झालाय हेसुद्धा समजण्याच्या पलीकडे जातात. 
अलीकडच्या काळात तर मृतदेहाबरोबर, जंगली प्राण्यांबरोबर, नग्न अवस्थेतले, प्रचंड गर्दीतले असे चित्रविचित्र सेल्फ झळकलेले दिसतात ते याच प्रकारातून! खरंतर असे सतत स्वत:चे चित्रविचित्र फोटो काढणं यात कसलंही थ्रिल नाही, हे सरळसरळ तर एका नव्या आजाराला आमंत्रण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्फी काढण्याचा हा खेळ हा आपला स्वत:शी चाललेला स्वप्रतिमेचा खेळ आहे आणि तो चेह:यापेक्षा मनाचा खेळ जास्त आहे, हे लक्षातही येत नाही!
आपण असा खेळ स्वत:शीच करतोय का, हे पुढच्यावेळी सेल्फी काढताना ज्यानंत्यानं एकदा तपासून घेतलं पाहिजे!
 
 
अटेन्शनची भूक
 
अमेरिकेतल्या बॉस्टनमधील मीडिया सायकोलॉजी रिसर्च सेंटरच्या अध्यक्ष डॉ. पामेला रुत्लेज यांनी मध्यंतरी सायकोलॉजी टुडेमध्ये लिहिलेल्या एका लेखात म्हटले आहे, ‘सेल्फी काढण्यात प्रचंड वेळ देणा:या व्यक्तीची स्वप्रतिमा अनेकदा विस्कळीत झालेली असते. आजूबाजूच्या लोकांकडून त्यांना पुरेसं महत्त्व मिळत नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या, मित्रपरिवाराच्या केंद्रस्थानी ते नसतात. यातून ‘अटेन्शन सीकिंग’ म्हणजे लक्ष वेधून घेण्याची मानसिकता विकसित होते आणि सेल्फी अशा मानसिकतेला खतपाणी घालतात. सोशल मीडियावर चटकन अटेन्शन मिळत असल्याने हे शेअरिंग वाढतं; मात्र त्यातून आत्मविश्वास वाढण्याऐवजी कमी कमी होत जातो. एखाद्यावेळी सेल्फीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर स्वप्रतिमेला तडे जातात आणि सेल्फी टाकणारी व्यक्ती जास्त निराश होते. 
 
-मुक्ता चैतन्य
muktachaitanya11@gmail.com
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

 

Web Title: Play BDD bikes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.