पिठोरी शिरसगाव ते सँटियागो

By Admin | Updated: July 24, 2014 20:01 IST2014-07-24T20:01:09+5:302014-07-24T20:01:09+5:30

पिठोरी शिरसगाव या गावाचं नाव ऐकलंय तुम्ही? कदाचित ऐकलंही नसेल.मराठवाड्यातलं छोट्टसं गाव

Pithori Shirasgaon to Santiago | पिठोरी शिरसगाव ते सँटियागो

पिठोरी शिरसगाव ते सँटियागो

>पिठोरी शिरसगाव या गावाचं नाव ऐकलंय तुम्ही?
कदाचित ऐकलंही नसेल. मराठवाड्यातलं छोट्टसं गाव.  त्या गावची ही एक मुलगी, रोहिणी पाष्टे तिचं नाव. 
रोहिणीची भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघात निवड झाली आहे आणि लवकरच ती दक्षिण अमेरिकेतल्या सँटियागो शहरात फुटबॉल खेळण्यासाठी जाणार आहे.
भारी वाटलं ना वाचून? कुठे ते पिठोरी शिरसगाव आणि कुठे सँटियागो? कुठं मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातले जेमतेम दोन हजार लोकसंख्येचं एक लहानसं खेडं आणि कुठं सँटियागो, दक्षिण अमेरिकेतल्या चिले देशाची राजधानी.
रोहिणीनं एवढी मोठी सातासमुद्रापार उडी कशी मारली?  कशाच्या जोरावर?
समजून घ्यायचं तर रोहिणीच्या गावात जायला हवं?
आजही मराठवाड्यातल्या अनेक दुष्काळग्रस्त गावातल्या बहुसंख्य घरामध्ये मुलींना शाळेत घातलंच जात नाही, साधारणपणे बाराव्या-तेराव्या वर्षीच मुलींचं लग्न लावून टाकलं जातं. रोहिणीचं गाव या कहाणीला अपवाद नाहीच. अशा परिस्थितीत एखाद्या मुलीनं फुटबॉलसारख्या ‘पुरुषी’ समजल्या जाणार्‍या खेळात प्रावीण्य मिळवणं हीच आश्‍चर्याची गोष्ट आहे.
रोहिणीच्या घरची जेमतेम दोन एकर शेती.  रोहिणीच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला, रोहिणीची आई लोकांच्या शेतावर मोलमजुरी करून कसेबसे दिवस ढकलत होती. त्यामुळे मुलींना शाळेत घालण्याची चैन तिला परवडण्यासारखी नव्हती. जबाबदारीतून मोकळं होत तिनं रोहिणीच्या मोठय़ा बहिणीचं चौदाव्या वर्षीच लग्न लावून टाकावं लागलं. मोठय़ा भावाला आजोळी शिक्षणासाठी पाठवलं. रोहिणीला मात्र चौथीत शाळा सोडावी लागली. शेजारी राहणार्‍या काकांना अंबडला नव्यानंच सुरू झालेल्या कस्तुरबा गांधी विद्यालयाची माहिती समजली नसती, तर कदाचित रोहिणीदेखील आईसोबत मोलमजुरी करत राहिली असती. रोहिणीच्या आईनं कधी गावाबाहेर पाऊल टाकलेलं नव्हतं, त्यामुळे मुलीला शाळेच्या निमित्तानं बाहेरगावी पाठवणं तिच्या जिवावर आलं होतं. पण त्या निवासी शाळेत रोहिणीच्या शिक्षणाची विनामूल्य सोय होतेय म्हटल्यावर आईनं मन घट्ट करून तिला ३0 किलोमीटर लांब शाळेत पाठवलं.
खेळाच्या तासाला शाळेतल्या शेख सरांनी तिच्यातले गुण हेरले. शाळेतल्या राधा शिंदे या अव्वल खेळाडू मुलीची तिच्याशी मैत्री करून दिली. राधाचा खेळ पाहून तिच्याप्रमाणे फुटबॉल खेळायला सुरु वात केली.
रोहिणी सांगते,  ‘‘या शाळेत प्रवेश मिळाला म्हणूनच मला खेळायची संधी तरी मिळाली. आता खेळाची इतकी आवड लागली आहे की, सुट्टीमध्येदेखील शाळा सोडून घरी जावंसं वाटत नाही.’’ 
शाळेतले सर सांगत की, सुट्टीत घरी गेल्यावर गावातल्या मुलींनी एकत्र येऊन फुटबॉलचा सराव करा. पण खेड्यापाड्यात मुलींनी मैदानात जाऊन खेळणंच कुणाला आजही झेपत नाही. ‘पोरीच्या जातीनं असं उघड्यावर खेळण शोभत नाही.’’ असंच गावात सगळ्यांचं मत. अगदी रोहिणीच्या आईचंही. पण आता रोहिणीची आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी निवड झाल्यानंतर गावाला खेळाचं महत्त्व हळूहळू पटायला लागलेलं आहे. आता गावात रोहिणीचं अभिनंदन करणारी पोस्टर्स लावलेली दिसतात. तिचा जिल्हापातळीवर सत्कार करण्यात आला, तसाच गावातही सत्कार झाला. शाळेतले कोच रफिक शेख यांचाही गावानं सत्कार केला. त्यावेळी सरांनी गावातल्या मुलांना फुटबॉल भेट दिला. तेव्हापासून गावातल्या मुलांनी माळावर फुटबॉल खेळायला सुरु वात केली आहे. 
निदान रोहिणीमुळे तिच्या गावातलं तरी चित्र बदलतंय. ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत सतरा वर्षाखालील गटात रोहिणीच्या शाळेनं दुसरा क्र मांक मिळवला. त्या सामन्यातला खेळ पाहून ‘स्लम सॉकर’ संस्थेच्या प्रतिनिधींनी तिची विशेष दखल घेतली. 
‘स्लम सॉकर’ ही संस्था देशभरात वंचित वर्गातील मुलामुलींना खेळांच्या माध्यमातून विकासाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम करते. देशभरात या दृष्टिकोनातून या संस्थेतर्फे विविध उपक्र म चालवले जातात. या संस्थेतर्फे नागपूरला झालेल्या चाचणीमध्ये रोहिणीची निवड सँटियागो शहरात ऑक्टोबरमध्ये होणार्‍या ‘होमलेस वर्ल्ड कप फुटबॉल’साठी खेळणार्‍या भारतीय संघात झाली आहे. जगातल्या ६४ देशांतून अगदी आव्हानात्मक परिस्थितीत जगणारी ५00 पेक्षा जास्त मुलं-मुली हा वेगळा वर्ल्ड कप खेळायला येणार आहेत.  या स्पर्धेच्या निमित्तानं रोहिणीला वेगळं जग पहायला मिळेल, तिच्या आकांक्षांना नवे क्षितिज मिळेल. आणि तिच्या गावपरिसरातून अजून एखादी रोहिणी बनायला पुढे येईल, अशी आशा आहे.
- वंदना खरे

Web Title: Pithori Shirasgaon to Santiago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.