दिवाळीची पर्सनल भेट, दिवाळीत गिफ्ट देताना काहीतरी महागडं देऊ, एक्स्क्लुसिव्ह देऊ असा विचार करू नका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 12:27 IST2017-10-12T12:25:57+5:302017-10-12T12:27:24+5:30
या दिवाळीत गिफ्ट देताना काहीतरी महागडं देऊ, एक्स्क्लुसिव्ह देऊ असा विचार करू नका. त्यापेक्षा असं ठरवा की, काहीतरी खास देऊ.

दिवाळीची पर्सनल भेट, दिवाळीत गिफ्ट देताना काहीतरी महागडं देऊ, एक्स्क्लुसिव्ह देऊ असा विचार करू नका
- नितांत महाजन
या दिवाळीत गिफ्ट देताना
काहीतरी महागडं देऊ,
एक्स्क्लुसिव्ह देऊ असा विचार करू नका.
त्यापेक्षा असं ठरवा की,
काहीतरी खास देऊ.
असं काहीतरी जे आपल्या नात्याची
ओळख सांगेल. आपलं प्रेम सांगेल.
मेक इट पर्सनलाइज्ड!
कसं?
त्यासाठीच तर या काही आयडिया..
दिवाळी चार दिवसांवर आली.
दिवाळीत स्वत:साठी तर आपण खरेदी करतोच, पण आनंद वाटून घ्यायचा तर आपल्या जिवाभावाच्या माणसांसाठी, मित्रांसाठी, भावाबहिणींसाठी, आईबाबा, शिक्षक, आॅफिसमधले सहकारी यांच्यासाठीही गिफ्ट्स घ्यावेत. त्यांना प्रेमाचं प्रतीक म्हणून काहीतरी घ्यावं असं वाटतंच.
पण मुद्दा असतो, काय घ्यायचं?
प्रश्न असतात दोन :
पहिला म्हणजे, बजेट. त्याचं सोंग तर नाहीच आणता येत.
दुसरा म्हणजे, घ्यायचं काय? असं काय स्पेशल गिफ्ट दिलं म्हणजे त्या माणसाला स्पेशल वाटेल?
दुकानात तर काय वाट्टेल त्या गोष्टी मिळतात. सगळ्यांकडे सगळंच असतं हल्ली. असं आपण काय वेगळं देणार जे त्यांच्याकडे नाही? आणि आपण दिलं आणि त्यात काही ‘खास’ आहे असं त्या व्यक्तीला वाटलं नाही तर?
असे प्रश्नही मेंदू कुरतडतात. डोक्यात दंगा करतात.
त्यावर उपाय काय शोधायचा?
पहिला उपाय म्हणजे सोच बदलनेकी जरूरत है!
म्हणजे काय तर मार्केटमधून काहीतरी उचलून आपल्या मायेच्या माणसांना, दोस्तांना गिफ्ट रॅप करून देऊन टाकायचं हे आधी मनातून काढून टाकू. सरसकट जे दुकानात विकलं जातंय ते महागडं आहे का स्वस्त याला काही अर्थ नाही. त्याला आपला पर्सनल टच नाही हे नक्की. त्यामुळे गिफ्ट ज्याला द्यायचंय त्याला ते आवडावं, खास वाटावं, त्याला स्पेशल फिल यावा असं वाटत असेल तर ते त्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं हवं. तसं गिफ्ट आपल्याला तेव्हाच सापडतं जेव्हा तो माणूस आपल्याला कळलेला असेल, त्याच्या बारीकसारीक सवयी, इच्छा, आवडीनिवडी आपल्याला माहिती असतील आणि दुसरं म्हणजे आपलं त्याच्यावर प्रेम असेल. प्रेम असलं की त्या माणसाला काय आवडतं हे आपल्या पक्कं लक्षात राहतं.
त्यामुळेच या दिवाळीतही गिफ्ट देताना काहीतरी महागडं देऊ, एक्स्क्लुसिव्ह देऊ असा विचार करू नका. त्यापेक्षा असा विचार करू की, काहीतरी खास देऊ. असं काहीतरी जे आपल्या नात्याची ओळख सांगेल. आपलं प्रेम सांगेल.
मेक इट पर्सनलाइज्ड!
कसं? त्यासाठीच तर या काही आयडिया. त्यातल्या काही नेहमीच्या आहेत, काही वेगळ्या..
पण यातलं सूत्र एकच की, तुम्ही जरा विचार केला, आपल्या माणसांना काय आवडेल यासाठी डोकं खपवलं तर तुम्हालाही एक से एक गिफ्ट्स दिसायला लागतील.
पैसे तर वाचतीलच पण ज्याला द्याल त्याची तुमच्यावरची मायाही वाढेल.
पण ते कसं करायचं, यासाठीच या काही ट्रिक्स..
कितने लोग है?
हा महत्त्वाचा प्रश्न. जगभरातल्या माणसांना गिफ्ट्स द्यावीत असं आपल्याला वाटत असलं, तरी आपल्या बजेटमध्ये ते शक्य नाही हे एकदा मान्य करून टाकावं.
उगीच प्रतिष्ठा, कॉण्टॅक्ट्स वगैरेसाठी दिवाळी गिफ्ट देण्याच्या भानगडीत पडू नये. कारण आपण ती ज्यांना देतो त्याचं त्यांना फारसं मोल नसतं.
त्यापेक्षा आपली जिवाभावाची चार-दोन टाळकी कोण हे आपलं आपल्याला माहिती असतं.
त्यांनाच काय ते प्रेमानं देण्याचा विचार करावा. त्यातही बजेट पाहून.
प्रत्येकासाठी समान बजेट ठरवावं आणि त्यातच काय करता येईल याचा विचार केलेला बरा.
बजेट ठरवायचं सूत्र एकच..
आपल्याकडे आज बरे पैसे आहेत म्हणून जास्त दिलं पण पुढे नसतील तर?
श्रीमंतीत वाईट दिसू नये आणि गरिबीतही वाईट दिसू नये अशा मापानं समोरच्याला भेट दिलेली बरी!
सोप्यात सोपं हे करून पाहा
१) दिवाळीत फराळाचं देणं गिफ्ट म्हणून काही चूक नाही. मस्त डेकोरेट करा एखादी परडी, बटवा आणि आपण स्वत: बनवलेले लाडू घालून द्या. त्या पर्सनल मायेला मोल नाही.
२) हे नको तर मग सरळ बेदाणे-मनुका-काजू-बदाम सुंदर पॅक करून द्या.
३) चॉकलेटच द्यायचे तर ते स्वत: बनवून द्या किंवा होममेड चॉकलेट्स कुठं मिळतात का पाहा, ते द्या.
४) हे सारं स्वत: गिफ्ट रॅप करा. आणि त्यावर जमल्यास एखादा सुंदर मेसेज लिहा.
दिवेच दिवे
१) पणत्या गिफ्ट करायला काय हरकत आहे?
बाजारातून मातीच्या साध्या, विविध आकाराच्या पणत्या आणा. त्या आपल्याला हव्या तशा रंगवा, ग्लिटर, मोती, गोंडे काय लावायचे ते लावा आणि असे सुंदर दिवे गिफ्ट करा.
दिवाळीत दिव्याहून अधिक सुंदर गिफ्ट काय असेल?
चाय पे चर्चा
चहावेडे दोस्त असतील तर सरळ चहा गिफ्ट करा. विविध पॅक आणि फ्लेवरमध्ये मिळतो. याशिवाय चहाचे मग, टीबॅगसाठीच्या किटल्या, इटकुल्या बरण्या असं काहीबाही मिळतं. ते सुंदर दिसतं. शिवाय त्यातही गंमत आहेच.
प्रिण्ट मारो..
हे सगळ्यात सोपं. पर्सनलाइज्ड.
मस्त कोरे टीशर्ट आणा. त्यावर मित्रांचे फोटो किंवा एखादा संदेश असं प्रिण्ट करून घ्या. करा गिफ्ट. असे शर्ट बाजारात मिळणार नाहीत त्या मित्रांना.
याशिवाय मगही प्रिण्ट करता येतील.
फोटो फ्रेम देता येतील.
हायटेक गिफ्ट्स
कुणी स्पेशल असेल तुमच्या आयुष्यात तर त्याला/तिला हे हायटेक गिफ्ट द्यायला हरकत नाही.
खिशात दहा हजार रुपयांच्या आसपास पैसे पाहिजेत मात्र.
तर सध्या त्यातही ट्रेण्डी काय आहे?
1) ब्लू टूथ स्पीकर्स
२) वायरलेस इअरफोन्स
३) फिटनेस ट्रॅकर्स
स्वत: बनवा ग्रीटिंग
हॅण्डमेड ग्रीटिंग्ज देण्याचा हा काळ आहे.
आपल्या मित्रमैत्रिणींना स्वत: ग्रीटिंग्ज बनवून द्या. स्वत: तयार केलेला एखादा छोटासा आकाशकंदील, एखादी पणती, एखादा स्टार किंवा आठवणीसाठी एखादा मोमेण्टो स्वत: बनवून द्या.