डॉ. वृन्दा भार्गवे
समोर कुडाची झोपडी, पत्र्याची शेड. त्याच वाटेने जाणारा एखादा उत्सुक, खंगलेला म्हातारा. उघडय़ा अंगाची पोर हातात प्लॅस्टिकचा पेला घेऊन बसलेली. झूमवरून ऑनलाइन लेक्चर घेणार्या मला हे सगळे दिसू नये म्हणून सतत त्याच्या मोबाइलच्या कॅमेराचा अँगल बदलणारा, माझा एम.ए.चा विद्यार्थी.मी त्याला कादंबरी या साहित्य प्रकाराबद्दल प्रश्न विचारतेय. त्याला साहित्यशास्र, नाटय़शास्र, समीक्षा, संशोधन सगळ्याच विषयांचा अभ्यास करावयाचा आहे. साहित्य प्रकाराची त्याची संकल्पना सुस्पष्ट व्हायला हवी, म्हणून त्याला प्रश्न विचारण्याचा माझा अट्टाहास. तो मात्र, ऐकण्यापेक्षा आजूबाजूला जे दिसतंय त्यामुळे अधिकच कसनुसा होणारा. त्याला भाषाव्यवहार समजून सांगावा तर तो गप्प. त्याची बोली त्यालाच एकदम खटकणारी. तो प्रमाण भाषेचा आधार घेत शब्दाची जुळणी करत बोलणारा. एक तासाची वेळ आपण मागून घेतली आहे, ती एखादाच बोलला तर संपून जाणार. या विवंचनेत मी.त्याला अनुवाद शिकवायचा कसा? एखाद्या सर्जनशील समजल्या जाणार्या लेखकाने अनुवाद केला तर तो दुय्यम प्रतीचे काम करतो, असे का म्हटले जाते असा प्रश्न विचारत अनुवाद विषयाकडे वळले तर त्याने मूळ पुस्तके वाचलेली नसतात. त्यांना काही पुस्तकांची मुखपृष्ठे मी दाखवते. छोटा पडदा आता त्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांनी व्यापलेला असतो. शहरी विद्यार्थी भराभर स्क्रीन शॉट्स काढतात. कुडाची झोपडी मात्र नुसतेच अप्रूप पाहिल्यासारखी अचंबित. पडद्यावरच्या इतरांच्या सजलेल्या घरांकडे ओशाळल्या नजरेने पाहणारी.
बाकी काहीही व्हा; पण प्रा. होऊ नका!
दुसर्या बाजूला त्या विद्याथ्र्याना शिकवणारे शिक्षक. तात्पुरत्या वेतनावरचे, घडय़ाळी तासावरचे. विनाअनुदानित. त्यांचा पगार अगदीच तुटपुंजा. पण नावामागचे बिरुद प्रा..ही आजवरची कमाई. ती टिकवायला हवी. यापैकी काही डॉक्टरेट. त्यांच्या संशोधनाला विद्यापीठाचा पुरस्कार. शैक्षणिक कारकीर्द अगदी लखलखीत, देदीप्यमान. त्यांची अवस्था तर महाबिकट. गेल्या सहा महिन्यांपासून पगार नाही. पहिले दहा दिवस घरात, नंतर बरेचसे नेट, सेट पीएच.डी.वाले शेतात मजूर म्हणून काम करू लागले. काही पोल्ट्री फार्मवर तर काही किराणा दुकानात. त्यांच्या नोकर्या 5, 7, 8 दहा वर्षांहून अधिक काळ झालेल्या. घरात काम करणार्या बाईला जेवढा पगार एक तासासाठी दिला जातो तेवढादेखील त्यांना नाही. कधी सहा महिन्यांनी त्यांना वेतन मिळाले तर बचत सोडाच; पण मुलांच्या शाळा, कुटुंबाचा खर्च, काहीही मेळ ते घालू शकत नाहीत. ऑनलाइन शिकवण्यासाठी एक लॅपटॉप, व्हाइट बोर्ड, ट्रायपॉडसाठी झालेला खर्च. लेक्चर रेकॉर्ड करताना घरात पूर्ण शांतता हवी. मुला-बायकोला ना बागेत पाठवता येत ना मंदिरात. एका खोलीचे घर. त्यांना इमारतीच्या खाली बसवणारे प्राध्यापक जीव तोडून शिकवतात. एवढे करून आपल्याला नोकरी मिळणार की नाही याची त्यांना शाश्वती नसते. मिळाली तर नऊ हजारापेक्षा पैसा मिळणार नाही याची कल्पना असते. शाळेतला त्यांचा एखादा मित्र जो दहावीला नापास झालेला, तो त्याच्या गोठय़ातल्या दहा-बारा गायी-म्हशींना स्वच्छ करणार्या नोकराचा शोध घेत असतो. दूध पोहोचवायचे काम करायला तयार असणार्या या प्राध्यापक मित्राला दहावी नापास नकार देतो. पीएच.डी.ची कदर ते नाही तर आपण करावी म्हणून गवंडय़ाच्या हाताखाली काम करणारा कॉमर्सचा प्राध्यापक आर्थिक आणीबाणी आली तर काय होऊ शकेल याचे प्रेझेन्टेशन घरी आल्यावर करतो.शिक्षक दिनाला या सगळ्यांना खेडोपाडी राहणार्या विद्याथ्र्याचे मेसेजेस येतात. आम्हाला शिक्षक-प्राध्यापक व्हायचं, अगदी तुमच्यासारखे असे जेव्हा चुणचुणीत विद्यार्थी सांगतात. नि आपल्या दुर्गम भागातून शब्द फुलांच्या इमोजीज पाठवतात तेव्हा हात जोडून (त्याचीही इमोजीच) हे प्राध्यापक सांगतात, बाकी काहीही व्हा; पण प्राध्यापक होऊ नका. बायकोच्या माहेरची मोटरसायकल, महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारी मुले, वेळेवर हप्ता न भरता येणारे आपण, ऑनलाइनमध्ये दिसत नाही. विद्याथ्र्याना दिसतोय आपला व्हाइट बोर्ड नि ठेवणीतले शर्ट्स. पण खरं बापुडवाणे रिते घर, नि रंग उडालेले चेहरे येथे आहेच. कॅमेरा इथेही ऑफच हवा..
(लेखिका विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहेत.)