वन वे तिकीट

By Admin | Updated: April 12, 2017 16:32 IST2017-04-12T16:32:35+5:302017-04-12T16:32:35+5:30

घरंदारं सोडून मोठ्या शहरातस्वप्नांच्या मागे धावणारा प्रवास

One way ticket | वन वे तिकीट

वन वे तिकीट

गावात पोट भरायचं काहीच साधन नव्हतं, म्हणून वडिलांनी आम्हाला  घेऊन जळगाव गाठलं. काय नाही केलं मी इथं येऊन? शिपायाच्या नोकरीपासून भाजी विकण्यापर्यंत असंख्य कामं केली, पण मागे हटलो नाही. अजूनही माझी शर्यत संपलेली नाही.. पाचोऱ्याचा मुलगा जळगावकर होतो तेव्हा..

 

 गावात कामधंदा किंवा व्यवसायासाठी पूरक वातावरण नसल्याने वडिलांनी गाव सोडून जळगाव शहरात स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. खरंतर वडिलांच्या गाव सोडण्याच्या निर्णयानं मी पुरताच हादरलो होतो. मी आईला सांगत होतो की, तुम्हाला सर्वांना जळगावला जायचं तर जा, मी मात्र इथंच राहणार! मात्र माझं बोलणं वायफळ. वडिलांसमोर बोलण्याची माझी हिंमतच होत नव्हती. तेव्हा मी साधारण १७ वर्षांचा होतो. भावाचं दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर वडिलांनी त्याला गावातच पानटपरी सुरू करून दिली होती. त्यामुळे तो पुढे न शिकता पानटपरीच सांभाळू लागला. मी तसा शाळेत शिक्षकांचा लाडका होतो. दहावी पास झाल्यानंतर पुढे आणखी शिकून खूप मोठ्ठं व्हायची मनस्वी इच्छा होती.

 


मात्र दहावी पास होऊन करिअरच्या नव्या वाटा धुंडाळत असताना, कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अचानक ढासळली. पुढचं शिक्षण न घेता मोठ्या भावाप्रमाणे पानटपरीच सांभाळावी लागली. त्यात आमच्याकडे किराणा दुकान व पानटपरी वगळता काही शेतीही नव्हती. वडिलांनी स्वत:चे राहते घर विकून आलेल्या पैशातून गावातील काही लोकांकडून बहिणींच्या लग्नासाठी घेतलेले सर्व पैसे चुकते केले. लोकांनी गाव सोडू नये म्हणून आग्रह केला, किराणा दुकान पुन्हा सुरू करण्यासाठी भांडवलाचे पैसेही देऊ केले. पण गावात तोपर्यंत गल्लीगल्लीत किराणा मालाची दुकानं सुरू झाली होती. त्या स्पर्धेत नको जायला असा विचार करून वडिलांनी गाव सोडलं.

 


हाताला काम मिळेल एवढीच आशा होती. जळगाव शहरात आल्यावर मावशीच्या मुलांव्यतिरिक्त दुसरं कोणी ओळखीचंही नव्हतं. पाचशे रुपये भाड्यानं खोली घेऊन आम्ही राहू लागलो. भावाला एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम मिळालं. तेव्हा त्याला १५०० रु पये महिना पगार मिळायचा. त्यातच आम्हाला घरभाडं आणि कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवावा लागत होता. माझा नोकरीचा शोध मात्र सुरूच होता. त्यानंतर मी एका स्थानिक वृत्तपत्रात शहरातीलच एका माध्यमिक विद्यालयात शिपाई पदाची जागा रिक्त असल्याची जाहिरात पाहिली. मावशीला सोबत घेऊन ती शाळा गाठली. एका जागेसाठी तिथं शेकडो उमेदवार आले होते. तसा मला याआधी कामाचा कुठलाही अनुभव नव्हता. मुलाखतीस आलेल्या उमेदवारांमध्ये माझ्यापेक्षा जास्त शिकलेले उमेदवारच जास्त होते. माझा नंबर आला. मुलाखत घेण्यासाठी बसलेले मुख्याध्यापक व संचालकांनी मला आत येण्याची परवानगी दिली. मी आत गेलो. आता काय प्रश्न विचारणार ही भीती कायम होती. मात्र त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मी बरोबर दिली आणि त्यांनी मला लगेच उद्यापासून कामाला हजर हो म्हणून सांगितले. त्यावेळी मला महिन्याला ५०० रुपये इतका पगार मिळणार होता. काम मिळाल्याचा आनंद आता मनात मावत नव्हता. त्यावेळी शाळा विना अनुदानित (नॉन ग्रॅँड) होती. मात्र शाळेला ग्रॅँड मिळाल्यास पगारवाढीची हमी मला संचालकांकडून त्याचवेळी मिळून गेली होती.

 

त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी कामावर रुजू झालो. घरापासून शाळा साधारण पाच किलोमीटर असल्याने मला ड्यूटीच्या वेळेच्या अर्धा तास आधी पोहचेल या बेताने घरून निघावं लागत असे. त्यावेळी माझ्याकडे सायकलही नव्हती. रिक्षाने प्रवास केला असता तर महिन्याला ६०० रु पये इतका खर्च झाला असता व पगार ५०० रु पये. त्यामुळे मी पायीच जायचो. दोन महिने मी नोकरी केली.
अकरावीला प्रवेशही घेतला. त्यासाठीही बरीच धावपळ करावी लागली. शिक्षण हवं तर काम करावं लागत होतं. मी बऱ्याच ठिकाणी नोकरी केली मात्र मनासारखे काम व पगार मिळतच नव्हता. त्यामुळे मी स्वत: भाजीपाला विकू लागलो. काही दिवस तो भाजीपाल्याचा धंदा केला. कटलरीचा माल विकू लागलो. गल्लोगल्ली जाऊन लोटगाडीवर माल विकावा लागत असे. त्यातच मालाची चोरी होत असल्याने फायद्यापेक्षा तोटा अधिक. एका ज्वेलरी दुकानात हेल्पर म्हणून चांगल्या पगाराची नोकरी करू लागलो. कामावर ये-जा करण्यासाठी घरच्यांनी एक नवी सायकल विकत घेऊन दिली होती.
पुढे मी लोकमत युवा मंचचा सदस्य झालो. लेखनाची आवड असल्याने मी लेखन करू लागलो. काही स्थानिक वृत्तपत्रांत माझे लेख छापून येऊ लागले. अहिराणी व्हिडीओ अल्बमला खांदेशात चांगले दिवस होते. मी लिहिलेली गाणी, मी शहरातीलच एका हॉटेल व्यावसायिक असलेल्या व ज्यांनी याआधी एका अहिराणी गाण्यांच्या व्हिडीओ अल्बमची निर्मिती केली होती त्यांच्याकडे घेऊन गेलो. त्यांनाही मी लिहिलेली गाणी आवडली व त्यांनी मला आपण या गाण्यांचा एक नवीन अल्बम तयार करू असे आश्वासन दिले. पण मला वाटलं की आपणच अल्बम काढला तर? त्यासाठी बरीच मेहनत केली, पण पैसे वाया गेले. अल्बम काही रिलीज होऊ शकला नाही. त्यापायी घेतलेलं कर्ज मात्र फेडावं लागलं.
एका मोठ्या नामांकित कंपनीचं रिजनल आॅफिस होतं. त्याठिकाणी मला आॅफिस बॉय म्हणून नोकरी मिळाली होती. डोक्यावर असलेला कर्जाचा भार चुकता करून हलका केला. कॉम्प्युटरचे कवडीचे ज्ञान नसताना पुढे मी त्याच आॅफिसात हळूहळू कॉम्प्युटर हाताळू लागलो. आॅफिसच्या संचालकांनी मला क्लर्क म्हणून संधी दिली. एखादा आॅफिस बॉय त्याचं काम सोडून आपल्याप्रमाणे खुर्चीवर बसून काम करतोय हे पाहून अनेकांचं पोट दुखलं. मात्र वरिष्ठांच्या विश्वासानं मला तारलं.
पुढे एका दैनिकात वार्ताहर म्हणून कामाला लागलो. पण ते बंद पडले म्हणून मला एका कंपनीत कॉम्प्युटर आॅपरेटरचा नवीन जॉब मिळाला. लेखन आवडत होतं म्हणून मग काही ठिकाणी वार्ताहर म्हणून काम केलं. आता स्वत:चं साप्ताहिक चालवायचा प्रयत्न करतो आहे. एक ई-सेवा केंद्रही सुरू केलं आहे. 
आता वाटतं जळगावमध्ये आलो म्हणून हे सारं जमलं.. मात्र अजूनही शर्यत संपलेली नाही. कारण मला लढायचंय, जगायचंय व जिंकायचंय! 
- बाळासाहेब सुधाकर शिंपी,जळगाव

Web Title: One way ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.