आवडतं काय नव्हे; लोकांची गरज काय?
By Admin | Updated: May 21, 2015 19:44 IST2015-05-21T19:44:54+5:302015-05-21T19:44:54+5:30
त्यातही इंजिनिअर्स ज्यांना उद्योजकच व्हायचं होतं, अशी मुलं भेटली आणि सामाजिक क्षेत्रत काम करताना जो काही अगदी थोडा अनुभव मिळाला त्यातून मीच विचार करतो आहे की,

आवडतं काय नव्हे; लोकांची गरज काय?
>
अमृत बंग, कार्यकर्ता, निर्माण -
मी स्वत: काही ‘उद्योग’ केलेला नाही, त्यामुळे ग्रामीण उद्योजक कुणाला होता येऊ शकतं?
-कुणालाही होता येऊ शकतं का?
या प्रश्नाचं उत्तर मी तटस्थ म्हणूनच देतो, गेल्या काही दिवसांत निर्माणच्या प्रक्रियेत जी मुलं मला भेटली, त्यातही इंजिनिअर्स ज्यांना उद्योजकच व्हायचं होतं, अशी मुलं भेटली आणि सामाजिक क्षेत्रत काम करताना जो काही अगदी थोडा अनुभव मिळाला त्यातून मीच विचार करतो आहे की, सामाजिक क्षेत्रत काम करण्यासाठी, समाजभान जागं ठेवून ग्रामीण भागात उद्योजक होण्यासाठी नेमकं काय काय असायला हवं?
अनेकदा या सा:याची सुरुवातच एका चुकीच्या गृहितकानं होते. अनेक तरुण मुलं सांगतात, मला कुणाच्या ‘अण्डर’ कामच करायचं नाही, म्हणून मला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे, मला उद्योजक व्हायचं आहे.
माङया मते हे म्हणणंच अत्यंत बालीश आणि आत्मकेंद्री आहे, असा विचार करून जे उद्योजक व्हायला निघतील ते बहुतांश अपयशीच ठरणार हे उघड आहे. कारण आपल्याला इतर माणसांशी जुळवून घ्यावंच लागतं. ऑर्डर घ्याव्या लागतात, ऐकाव्या लागतात, आणि अनेकदा ऑर्डर्स न सोडताही प्रेमानं बोलून काम करून घ्यावं लागतं.
त्यामुळे मी कुणाचंच ऐकणार नाही आणि कुणाच्याच हाताखाली काम करणार नाही, या म्हणण्याला काहीच अर्थ नाही.
आपल्याला कुणाच्या हाताखाली कामच करायचं नाही, आपण कुणाला जुमानत नाही म्हणून जर ग्रामीण भागात जाऊन आपण उद्योजक होऊ असं कुणाला वाटत असेल, तर ते पहिले मनातून काढून टाका!
आणि ग्रामीण भागात उद्योग सुरू करायचा असेल तर आपलं समाजभानही जागं असलं पाहिजे, ते आहे की नाही हे आधी तपासून पहा.!
त्यासाठी ही काही सूत्रं.
1) टेक्निकल डिझाइनच्या पलीकडे
विचार करायला हवा.
अनेक इंजिनिअर्सना खुमखुमी असते काहीतरी प्रॉडक्ट तयार करून पहायची. खरंतर ही चांगली गोष्ट आहे, पण हा काही आपला बीईचा प्रोजेक्ट नाही, हे लक्षात ठेवायला हवं. हॉबी हण्ंिटग करायला आणि हे की ते, ते की हे असं करून पहायला हरकत नाही. पण थांबायचं कुठं हे आपल्याला कळायला हवं. आणि म्हणूनच आपण जे काही प्रॉडक्ट करणार त्याच्या डिझाइनच्या पलीकडे काही विचार करायला हवा. मुख्य म्हणजे आपण जे उत्पादन बनवणार ते कुणासाठी? ग्रामीण भागात लोक खरंच त्याचा वापर करतील का, त्यांना ते उपयोगी ठरेल का, त्या प्रॉडक्टला गि:हाईक असेल का, या सा:याचा विचार करायला हवा.
लोकांची गरज आणि आपलं प्रॉडक्ट यांचा मेळ घातला तर उद्योग जमतो; मात्र त्यासाठी आपल्याला माहिती करून घ्यायला हवं की, ग्रामीण भागात लोक राहतात कसे, त्यांच्या गरजा काय आहेत, आणि आपण काय केलं तर त्या गरजांना उत्तर म्हणून आपलं प्रॉडक्ट डिझाइन होऊ शकेल.
तुम्हाला जे आवडेल तेच डिझाइन करण्यापेक्षा गरज काय, हे ओळखता यायला हवं.
2) प्रॉडक्ट परवडेल कुणाला ?
म्हणजे उद्योग सुरू करताना आपल्या भांडवलाचा विचार तर करायलाच हवा. आपल्याला कुठून मदत मिळेल, पैसा कसा येईल हा विचार तर महत्त्वाचा आहेच. पण ग्रामीण उद्योजकतेत आणखी महत्त्वाचं आहे ते आपण बनवत असलेल्या प्रॉडक्टची किंवा सेवेची किंमत, ते प्रॉडक्ट कुणाकुणाला परवडू शकतं, गरिबातल्या गरीब माणसाला ते परवडेल का, याचाही विचार व्हायला हवा. आणि तशी किंमत कमी ठेवायची तर आपल्याला परवडेल का, आपल्याला नफा होईल का, की क्रॉस सबसिडीचा आपल्याला विचार करायला लागेल, याचा अंदाज घ्यावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मार्केट कुठलं, आपलं उत्पादन कुठं खपेल, त्याला बाजारपेठ काय याचाही पूर्ण अभ्यास करायला हवा.
3) ग्लॅमरचा हात सोडायला हवा.
बिल गेट्स, स्टिव्ह जॉब्ज यांच्याविषयी वाचलेलं असतं, उद्योग करण्याला काहीतरी ग्लॅमर आहे असंही अनेकांना वाटतं. ‘मी माझं-स्वत:चं काहीतरी करतो’ हे इतरांना सांगण्यातच अनेकजण धन्यता मानतात. आपण नोकरीचा त्यागबिग करून असा निर्णय घेतलाय, ग्रामीण भागात काम करतोय याचंच फार गौरवीकरण होतं. आणि त्यात जे काम करण्यासाठी आपण आलो आहोत, तेच मागे पडतं. त्यामुळे ग्रामीण उद्योजकतेला येऊ घातलेलं ग्लॅमर पाहून लगेच धावण्यात अर्थ नाही. कारण ग्लॅमरचा भर ओसरल्यावर अनेकांना निराशा येऊ शकते.
4) विचारा स्वत:ला, मी हे कशासाठी करतोय?
सुरुवातीला खूप उत्साह असतो, आपल्याला कसा टपरीवरचा चहा पण चालतो हे अभिमानानं सांगितलं जातं. पण हात तंग झाले. उद्योगात किंवा कामात जरा नरमाई आली की काहीजणांना असं वाटू लागतं की, आपले मित्र सीसीडीत जातात, आपलं काय हे टपरीवर चहा पिणं !
असं होतं कारण, सामाजिक भान, वैचारिक पाश्र्वभूमीच नसते. काहीजण मग ग्रामीण-सामाजिक उद्योगातही नफ्याच्याच मागे धावू लागतात.
आपण हे सारं कशासाठी करतोय, हे पुरेसं स्पष्ट आणि ठाम असेल तर मग मोहाचे आणि कष्टाचे कितीही प्रसंग आले तरी ठाम राहता येऊ शकतं.
5) समाजाशी संवाद
मुख्य म्हणजे आपल्या कामाशी समाजाचा संबंध आहे, समाजाच्या गरजांशी आपलं काम जोडलं जातंय, हे कायम लक्षात ठेवायला हवं.
कष्टाची तयारीही हवी. ते असेल तरच या ग्रामीण उद्योजकतेकडे वळलेलं बरं !