LOCKDOWN : व्यायाम कराल तर टिकाल, नाहीतर सावधान..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 16:59 IST2020-07-02T16:54:55+5:302020-07-02T16:59:37+5:30
घरातच बसलो आहोत तर बसूनच राहू असं म्हणू नका. घरातल्या घरात हाय इंटेन्सिटी प्रकारचे व्यायाम करा. मन आणि शरीर तंदुरुस्त करा, ही संधी आहे, ती दवडायची चूक करू नका..

LOCKDOWN : व्यायाम कराल तर टिकाल, नाहीतर सावधान..
- डॉ. नितीन पाटणकर
1) सतत एका जागी थांबण्याचा, घरबंद असण्याचा, घरातच बसून राहण्याचा हा काळ तरुणांच्या वाटय़ाला आला आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल?
तरुणांमध्ये रग असते. शारीरिक हालचाल होऊन ती जिरलीच पाहिजे. कारण ती ऊर्जा असते. ती शारीरिक श्रमातून बाहेर पडली नाही तर ती नकारात्मक मानसिक मार्ग शोधते. मग त्यातून वागणं-बोलणं नेहमीपेक्षा अधिक तीव्र व्हायला लागतं. मग तो उर्मटपणा वाटू लागतो. किंवा अशीच कुठकुठली नावं त्याला दिली जातात. मात्न ती वाट शोधणारी ऊर्जा असते. कुठंतरी स्वत:ला बंदिस्त करून घेणं किंवा मग अॅग्रेसिव्ह होणं यातून इंटरपर्सनल रिलेशनशिपमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या ऊर्जेला चॅनलाईज केलंच पाहिजे.
आता जे कुठले यंगस्टर्स येतात, मला दिसतात, त्यात माझी मुलगीही आहे, त्यांना मी सांगतो, की नियमित व्यायाम करा. मेंटेनन्स ऑफ हेल्थसाठी तो खूप गरजेचा आहे.
अजून एक विशेष बाब सांगायची, तर माङयाकडे या काळात येणारी मुलं मला खूप मॅच्युअर झाल्यासारखी वाटतात. कारण ही मुलं खूप विचार करताहेत. त्यांच्या एकमेकांशी बोलण्याच्या विषयातही खूप वैविध्य, प्रगल्भता येत चाललीय.
2) कुठले व्यायामप्रकार याकाळात करता येतील?
खासकरून तरुणांना मी सांगेन, की हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग प्रकारचे व्यायाम करा. अर्थात तज्ज्ञांच्या सल्ला-देखरेखीसोबतच. या प्रकारात 3क्-3क् सेकंदांकरता जास्त तीव्रतेचा व्यायाम करायचा असतो. यानंतर थोडी विश्रंती. पुन्हा तोच क्रम. असा पाच-सात मिनिटांचा व्यायामही पुरेसा असतो. यात हृदय, फुफ्फुसे आणि स्नायूंना अतिशय उत्तम स्टीम्युलेशन मिळतं. ऊर्जेचं व्यवस्थापनही चांगलं होतं. हे झाले हार्ट रेट वाढवण्याचे प्रकार. सोबतच फिटनेससाठी हार्ट रेट खूप खाली नेणंही सोईचं असतं. त्यासाठी योगासनं, प्राणायाम आणि विविध मुद्रांचा उपयोग होतो. शिवाय योगनिद्रा आणि ध्यान-संगीताचाही वापर यासोबत होऊ शकतो. मात्न प्राणायाम हा व्यायाम नाही. ते केल्याने शरीर आणि मन शांत होतं. सोबत इतर व्यायामप्रकार केले पाहिजेत.
हा काळ ही एक इष्टापत्ती आहे असं समजा. कारण फिटनेस, आहार, योग या सगळ्या गोष्टींना एका शिस्तीत आणायला सुरुवातीचा काळ जरा नीटपणो वापरावा लागतो. कारण या काळात हे जमायला वेळ लागतो. त्यामुळे हा काळ आपल्याला त्यासाठी मिळालाय ही उलट मोलाची गोष्ट आहे.
स्क्रीन टाइमबाबतही बोलणं मला महत्त्वाचं वाटतं. मोबाइल, लॅपटॉप यांचा अतिवापर टाळला पाहिजे. आपली पाच ज्ञानेंद्रियं आहेत, त्यातील डोळे आणि कानांना वेगळं काहीतरी काम थोडावेळ जाणीवपूर्वक द्यायला पाहिजे. तरच शारीरिक-मानसिक आरोग्यात फरक पडू शकतो.
3) व्यायाम आणि जीवनशैली यासाठीची शिस्त आणि नियमितपणा महत्त्वाचा आहे; पण तो कसा अंगी यावा.
याकाळातही लोक खूप सकस, पौष्टिक अन्न खात आहेत असं काही नाही. मात्न बाहेरचं खाणं, स्ट्रीट फूड हे सगळं जवळपास बंद झालंय. त्यामुळं अनेकांची वजनं, रक्तदाब खरं तर आटोक्यातही आल्याचं दिसतंय. कारण बाहेरच्या खाण्यात वापरलं जाणारं तेल, रंग आणि इतर गोष्टी जास्त हानिकारक असतात. त्यातच आपल्या आरोग्याच्या गडबडी होण्याचं मोठं रहस्य दडलेलं आहे हे तरुणांनी लक्षात घ्यावं. अर्थात दुसरीकडे हेही आहेच, की सतत बैठी कामं करून वजन वाढणं आणि त्यासोबतची मानसिक अस्वस्थता येणं हे अनेकांसोबत होतंय. त्यांना मी सांगेन, की व्यायाम काय फक्त जिममध्येच जाऊन होतो असं नाही. घरी व्यायाम करण्याच्या पद्धती उपलब्ध आहेत. अगदी बेडवर, खुर्चीवर बसून करण्याचे व्यायाम आहेत. हे सगळं शास्रशुद्ध पद्धतीने अमलात आणा. तुम्हाला आता हे स्वीकारावंच लागेल.
या सगळ्यांच्या मुळाशी मात्न हे कायम, नियमित करत राहण्याची इच्छाशक्ती टिकवून ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे.
एक संशोधन सांगतं, की 4-6 तासांहून अधिक बसून राहणं हे दिवसाला दहा सिगरेट्स ओढण्यासारखं आहे. ऑफिसातही तुमची वर्क स्टेशन्स सिटिंग न ठेवता स्टॅण्डिंग असावीत असं अनेक तज्ज्ञांनी वेळोवेळी सांगितलंय. जेव्हा दमाल तेव्हा बसा, बाकीचा वेळ उभे राहा. घरात आपण मोबाइलमध्ये गजर लावू शकतो, रिमाइंडर ठेवू शकतो. घरात जॉगिंग, जम्पिंग जॅक्स असं सगळं केलं तर फायदेशीर ठरते. हे करायला दहा सेकंदही पुरतात. पण हे मध्ये मध्ये करत राहिलं तर फायदा आहे.
4) मानसिक-भावनिक आरोग्यही या काळात सांभाळायला हवं.
हो, या काळात पर्सनल स्पेस खूप आक्र सत गेलीय. सतत ठरावीक माणसांच्या सोबत-आसपास राहिल्याने त्यांच्या स्वभावातले नकोसे कंगोरे ठळक दिसत राहिलेत. इथं मग आपण दुस:याला जजमेंटल न बोलता जरा वेगळं बोललं पाहिजे. म्हणजे, तू हे चूक करतोस असं न म्हणता हे तू असं केल्यानं मला हा त्नास होतोय असं म्हणणं जास्त योग्य असेल. त्यातून वादाचे प्रसंग टाळता येतील. स्वत:च्या भावना ओळखता आल्या पाहिजेत. शाळेत आपल्याला भाषा शिकवतात; पण भावना शिकवत नाहीत. त्यातून मग आपण ढोबळ भावनाच वाचू शकतो, जसं की, राग, आनंद, दु:ख. भावना ओळखता आली, तर ती चांगली व्यक्त करता येते. यासाठीचे प्रयत्न याकाळात नक्की करता येतील.
(मधुमेह आणि जीवनशैलीविषयक तज्ज्ञ आहेत.)
मुलाखत आणि शब्दांकन- शर्मिष्ठा भोसले