थोडे उल्लू जरासे चक्रम
By Admin | Updated: July 3, 2014 18:14 IST2014-07-03T18:14:17+5:302014-07-03T18:14:17+5:30
तसं करायचं आपल्यालाही बरंच काही असतं, पण.?

थोडे उल्लू जरासे चक्रम
तसं करायचं आपल्यालाही बरंच काही असतं,
पण.?
हा पण मधे येतो आणि सगळी गडबड करून टाकतो.
म्हणजे वाटतंच ना आपल्याला की, आपल्या कॉलेजातही एखादा मस्त गप्पांचा कट्टा असावा,
तिथं एखादा मोठ्ठा लेखक यावा, त्याच्याशी मस्त गप्पा माराव्यात.
पण कसचं काय?
आपलं कॉलेज जेमतेम, प्राध्यापक त्याहून थोर,
तिथं काहीच घडत नाही.
कुणालाच उत्साह नाही.
कशाचंच आयोजन नाही.
नुस्ती पाट्या लेर्स होतात,
पण ऑदर अँक्टिव्हिटी म्हणायला काही म्हणजे काही नाही.
ना नाटकं होतात, ना गाण्याच्या स्पर्धा,
ना वादविवाद, ना वक्तृत्व,
ना कसली मंडळं आहेत,
ना कुठल्या डिपार्टमेण्टमधे काही ग्रुप अँक्टिव्हिटी होते.
अशा काहीच ‘न घडणार्या’ कॉलेजमध्ये तुम्ही शिकता आणि टीव्हीवरचे चकाचक कॅम्पस पाहून जळता आणि का आपण अशा बोअर जागी शिकतोय म्हणून स्वत:ला दोष देता.?
- मग आधी तो दोष देणं आणि फुकट रडणं थांबवा.
कारण तुमच्या काहीच ‘न घडणार्या’ कॉलेजमध्ये तुम्ही स्वत:च बरंच काही घडवू शकता,
पण त्यासाठी तुम्हाला झटावं लागेल, दुसरं कुणी काहीतरी करेल आणि आपण फक्त टाळ्या पिटायला आणि शिट्टय़ा मारायला जाऊ, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तीच तुमची मोठी चूक.
आणि वेळ वाया घालवून, स्वत:च्या पर्सनॅलिटीला पैलू पाडून घेत, स्वत:ला नवनव्या अनुभवापासून वंचित ठेवून तुम्ही आयुष्यभरासाठी एक मोठी चूक करत आहात.
ती चूक टाळायची असेल आणि स्वत:ला झडझडून कामाला लावत, आनंद कमवायचा असेल तर करून पाहता येतील अशा या काही बिनपैशाच्या गोष्टी.
थोडं डोकं चालवलं तर याहून बरंच काही भन्नाट तुमचं तुम्हालाही सुचेल.
पण सुरुवात करायची असेल,
हा थोडा उल्लूपणा,
जरासा चक्रमपणा करून पहा.
त्यासाठी खूप पैसे लागत नाही, त्यामुळे पैसे नाही म्हणून आमचं घोडं अडलं असं सांगण्याचं काही फुसकं कारणही तुम्हाला मिळणार नाही.
तेव्हा खरंच जर तुमच्या मनात असेल की आपले कॉलेजचे दिवस यादगार करायचे.
तर हे काही फॉर्म्युले ट्राय करून पहा.
- चिन्मय लेले
पुस्तक फ्रेण्डशिप
- फार मोठ्ठं असं काही प्लॅन करायची गरजच नाही.
तुमचा मित्रमैत्रिणींचा ग्रुप पुरेसा आहे, सुरुवात त्याच्यापासून करा.
तुमच्यापैकी कुणी एखादं छानसं पुस्तक वाचलं असेल, तर त्या पुस्तकाची माहिती इतर दोस्तांना द्या. जास्त नाही. पण आठवड्यातून एक दिवस असा ‘पुस्तक फ्रेण्डशिप’ उपक्रम सुरू करायला हरकत नाही.
दर आठवड्याला प्रत्येकानं एखादं खास पुस्तक वाचून त्यावर बोलायचं.
त्यानं दोन गोष्टी होतील. एकतर वाचन वाढेल आणि दुसरं म्हणजे चारचौघात मुद्देसूद, अभ्यास करून बोलण्याचा कॉन्फिडन्सही वाढेल.
सिनेमा वेडे
तुमच्या सगळ्या गॅँगलाच सिनेमे पहायला जायचं वेड आहे. सगळ्यांनाच सिनेमे आवडतात. त्याविषयी बोलायला आवडतं. मग फक्त हिंदी सिनेमे का पहायचे? इंग्रजी सिनेमे पहा, नेटवर अनेक विषयांवरच्या डॉक्युमेण्टरी, शॉर्टफिल्म्स, व्हिडीओ उपलब्ध आहेत.
ते काय तुमच्या लॅपटॉपवर पण पाहता येतील. कुणाच्या तरी घरी जमून, एवढंच काय कॉलेजात नेहमीच्या कट्टय़ावरसुद्धा त्या पाहता येतील. एखादा विषय घेऊन त्यावरच्या डॉक्युमेण्टरी पाहता येतात. पाणी, दुष्काळ, जगभरातल्या निवडणूक कॅम्पेन्स, असं जे तुमच्या मनात येईल, त्यावरचे सिनेमे, शॉर्टफिल्म्स पहा.
बघा, तुम्हाला काय आनंद मिळतो ते.
अवघड विषयांची वाट
सध्या इराक, सिरीया या देशात गृहयुद्ध सुरू आहे किंवा भारत-चीन चर्चा सुरू झाली आहे.
काय आहेत हे नेमके विषय?
नेमका इतिहास काय, त्याचे संदर्भ काय, आजच्या जगण्याशी त्यांचा संबंध काय? हे सारं समजून घेणं तुम्हाला अत्यंत रंजक वाटत असेल, ( खरंतर वाटलं पाहिजेच) तर तुमच्याच महाविद्यालयातल्या राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांना विनंती करा, सर आम्हाला विषय समजावून द्या म्हणून हट्ट करा. किंवा तुमच्या शहरातले एखादे लेखक-पत्रकार यांना भेटून, त्यांची वेळ घेऊन या विषयाची माहिती घ्या.
मग अजून पुस्तक वाचून, नेटवरून माहिती घेऊन तुमचं ज्ञान वाढवा.
तुमचं हक्काचं मासिक
नसेल निघत तुमच्या कॉलेजात विद्यार्थ्यांचं मासिक, साप्ताहिक, एखादी पुस्तिका.
तुम्हाला कुणी रोखलंय?
तुम्ही काढा. स्वत: विषय ठरवा, स्वत: लिहा, मित्रांकडून लिहून घ्या, कुणाच्या कविता मिळवा, हे सारं ऑपरेट करता येत नसेल, प्रिण्टाऊटा काढायला पैसे नसतील तर हस्तलिखिताची एक पुस्तिका करा.
बघा, कसा अनुभव येतो.
आपण लिहायचं, कॉलेजात सगळ्यांनी वाचायचं.
मज्जा तर येईलच.