लिओनेल मेस्सी द मशिन ऑफ ८७

By Admin | Updated: June 13, 2014 09:43 IST2014-06-13T09:43:38+5:302014-06-13T09:43:38+5:30

लिओनेल मेस्सी’ आजच्या घडीला त्याचे जगात किती दिवाने आहेत, याची काही गणनाच नाही. त्याच्या पायांना फुटबॉलचं जन्मजात वरदान असावं असं तो खेळतो.

Lionel Messi The Machine of 87 | लिओनेल मेस्सी द मशिन ऑफ ८७

लिओनेल मेस्सी द मशिन ऑफ ८७

>लिओनेल मेस्सी’ आजच्या घडीला त्याचे जगात किती दिवाने आहेत, याची काही गणनाच नाही.
त्याच्या पायांना फुटबॉलचं जन्मजात वरदान असावं असं तो खेळतो.
पण आज जे ‘वरदान’ जगाला दिसतंय ते वास्तवात उतरवण्यासाठी तो स्वत:चंच नाही तर त्याच्या वडिलांचंही एक स्वप्न अक्षरश: जगलाय.
अर्जेण्टिनाच्या रासारिओ नावाच्या छोट्याशा शहरात मेस्सीचा जन्म झाला. मेस्सीचे वडील जॉर्ज मेस्सी एका स्टीलच्या कारखान्यात कामगार, तर आई  साफसफाईची  पार्ट टाईम कामं करायची. घरात एकूण चार मुलं, मेस्सीला दोन मोठे भाऊ, एक धाकटी बहीण. जॉर्ज मेस्सी मुलांना फुटबॉल शिकवायचे. एका लोकल क्लबमध्येही ते फुटबॉल शिकवायला जात. वयाच्या पाचव्या वर्षापासून मेस्सीने तिथेच फुटबॉल खेळायला सुरुवात केली. नंतर तो दुसर्‍या एका मोठय़ा क्लबमधून खेळायला लागला. आणि त्यानंतर पुढची सलग ४ वर्षं तो क्लब एकही मॅच हारला नाही. मेस्सी आहे म्हणजे जिंकणारच असं एक समीकरण बनलं, आणि सहकार्‍यांनी त्याला नाव दिलं ‘द मशिन ऑफ ८७’ ( ८७ सालचा त्याचा जन्म म्हणून).
पण नेमकी गडबड याच काळात झाली. वयाच्या ११ व्या वर्षी मेस्सीला एक वेगळाच आजार झाला. त्याला म्हणतात ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी. म्हणजे वाढत्या वयात शरीरात आवश्यक ते पोषक हार्मोन्सच तयार होत नव्हते. त्याकाळी तो ज्या क्लबकडून खेळत होता, त्यांना त्याच्या खेळात रस होता. पण त्याच्या उपचारांवर खर्च करण्याची मात्र त्यांची तयारी नव्हती. महिन्याला सुमारे ९00 डॉलर्स इतका खर्च त्याकाळी त्याच्यावर करावा लागणार होता.
मेस्सीच्या वडिलांना तर हा खर्च परवडणं शक्यच नव्हतं. त्याचकाळी बार्सिलोनातल्या (स्पेन) कार्ल्स रिक्सॅचना या मुलाविषयी माहिती कळली. ते बार्सिलोना फुटबॉल क्लबचे संचालक होते. त्यांनी मेस्सी आणि त्याच्या वडिलांना बोलावून घेतलं. आपल्या टीमसोबत मेस्सीला खेळायला सांगितलं. ती मॅच संपताच ते उठले, त्यावेळी त्यांच्याकडे लिहून द्यायला काही कागदही नव्हता. त्यांनी टेबलावरचा पेपर नॅपकिन उचलला आणि त्यावरच मेस्सीच्या वडिलांना लिहून दिलं की, बार्सिलोना या मुलावर सगळे उपचार करीन, पण त्यांना कायमचं स्पेनला येऊन रहावं लागेल. मेस्सीला आमच्याकडून खेळावं लागेल. मेस्सीच्या वडिलांकडे दुसरा काही पर्याय नव्हता, मुलाचं करिअर समोर दिसत होतं. ते अर्जेण्टिना सोडून स्पेनला रहायला आले आणि मेस्सी बार्सिलोनातल्या युथ अँकॅडमीत फुटबॉल खेळू लागला.
आज तोच मुलगा, मेस्सी फुटबॉलचा सुपरस्टार आहे. 
मेस्सी म्हणतो, ‘आयुष्यात मला सगळ्यात जास्त दोनच गोष्टींचा तिटकारा आहे. एक तर हारणं मला मान्य नाही, ते मला छळतं. आणि दुसरं म्हणजे गरिबी. माझ्या अर्जेण्टिना देशात गरिबी आजही माणसांना अतोनात छळते. रस्त्यावर लहान लहान पोरं भीक मागतात, दोन पैशासाठी वाट्टेल ती कामं करतात. ही गरिबी, ही लाचारी मला हतबल करून टाकते.’
त्यातूनच त्यानं ‘युनिसेफ’च्या मदतीनं मुलांसाठी एक फाउण्डेशन सुरू केलं आहे. मुलांना शिक्षण आणि क्रीडाशिक्षणाच्या संधी मिळाव्यात म्हणून ते फाउण्डेशन काम करतं.
एकेकाळचा अत्यंत लाजाळू, अबोल असा हा मुलगा, आज फुटबॉल स्टार झालाय. पैसा पायाशी लोळण घेतोय पण त्याला विचारा तुला काय आवडतं, तो म्हणतो, ‘मी आहे तसा आहे, तसाच मैदानावर दिसतो. मला एकच गोष्ट पक्की माहिती आहे, मी कसा दिसतो, कसा खेळतो हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे ते एकच, मी रिटायर झाल्यावर लोकांनी म्हणावं की, चांगला खेळाडू तर होताच पण चांगला माणूसही.’

Web Title: Lionel Messi The Machine of 87

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.