लाईफ बदल डाली!!

By Admin | Updated: September 18, 2014 20:22 IST2014-09-18T20:22:18+5:302014-09-18T20:22:18+5:30

‘‘दुनिया का सबसे बडा रोग,क्या कहेंगे लोग’’याच भयानक आजाराने मी त्रस्त होतो

Life changed !! | लाईफ बदल डाली!!

लाईफ बदल डाली!!

‘‘दुनिया का सबसे बडा रोग,
क्या कहेंगे लोग’’
याच भयानक आजाराने मी त्रस्त होतो. पण या आजारापासून आज मी पूर्णपणे मुक्त झालोय आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल ते फक्त एनएसएसला. तुमच्या आमच्यातली धमक ओळखण्याची ताकद एनएसएस देते हे खरं ! 
तसं मी तीन वर्षे एनसीसीत होतो. पण का कुणास ठाऊक माझ्यात फार काही कॉन्फिडन्स नव्हता. ते संपलं, मग सायन्सच्या सेकंड इयरला आलो तेव्हा एनएसएसबद्दल माहिती मिळाली. 
पण तोंडाला झोंबणार्‍या मिरचीसारखी एक शंका मनात आली की, कचरा उचलणं, साक्षरता रॅली काढणं, हिवाळी शिबिरं करणं, या सगळ्या गोष्टी करायच्या,  मित्र-मैत्रिणी काय म्हणतील? पण एनएसएसला गेल्यावर दहा मार्क मिळतील हे कळलं आणि मी एनएसएस जॉईन केलं. मग पहिल्या ‘व्यक्तिमत्त्व विकास शिबिरा’ला गेलो. त्या शिबिरापासून मला स्वत:ची ओळख झाली, एनएसएसचं महत्त्व पटलं.  पण अजूनही कचरा उचलणं म्हणजे काहीतरीच असं माझ्या डोक्यात होतंच. 
शिबिराच्या १५ दिवसांनंतर विद्यापीठातून फोन आला. माझी उदयपूरला होणार्‍या चार दिवसांच्या नॅशनल फेस्टिव्हलसाठी निवड झाली होती. तो क्षण अविस्मरणीय होता. कारण आतापर्यंत फक्त ऐकलेच होते की मुलाने दुनिया पलीकडचे काही काम केले तर सगळ्यात जास्त आनंद आई-वडिलांना होतो ते, प्रत्यक्षात मी त्या दिवशी अनुभवलं.  
उदयपूरला चार दिवस राहिलो तेव्हा मला खर्‍या अर्थानं एनएसएस म्हणजे काय हे समजलं. माझा कॉन्फिडन्स वाढला. मग माझी निवड रिपब्लिक डे परेडसाठी झाली.  जिल्हास्तरीय, विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय आणि शेवटी थेट दिल्लीला राष्ट्रपतींसमोर होणार्‍या २६ जानेवारीच्या परेडसाठी निवड होते.  दिल्लीत जानेवारीत पूर्ण एक महिना राहिलो. देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती या व्यक्तींना सहज भेटलो आणि त्यांच्याशी बोलायलाही मिळालं. एनएसएसनेच मला बोलण्याची पद्धत, राहण्याची पद्धत, जगण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. 
नंतर मला विद्यापीठाच्या शिबिरात परेड इन्स्ट्रक्टर म्हणून बोलावण्यात आलं. त्याठिकाणी २00 मुला-मुलींचे युनिट एकट्यानं सांभाळलं, नंतर राज्यस्तरीय परेड कॅम्पमध्ये परेड इन्स्ट्रक्टर म्हणून माझी निवड झाली नंतर राष्ट्रीय संचलन निवडी शिबिरात ही  इन्स्ट्रक्टर म्हणून निवड झाली. त्यात आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दिव दमण, दादरा नगरहवेली या राज्यांच्या मुला-मुलींना मी परेड शिकवली. 
बघता-बघता माझे वीस कॅम्प झाले. त्यात ४ नॅशनल, ४ स्टेटलेव्हलचे. आणि या सार्‍यात माझा कॉन्फिडन्स वाढला. मी स्वत:ला ओळखू शकलो. 
आज मला कचरा उचलतांना, पीडिताची मदत करताना, रॅलीत घोषणा देत असताना बिलकुल लाज वाटत नाही की लोक काय म्हणतील हेसुद्धा विचार आता  डोक्यात येत नाही. 
माझ्या घरच्यांनी मला कधी अभ्यासाचं प्रेशर दिलं नाही. उलट शक्य तेवढी मदत करून मला प्रोत्साहन दिलं. हे जे मला जमलं, ते कुणालाही जमू शकेल. मात्र त्यासाठी एनएसएसकडे पाहण्याची दृष्टी बदलायला हवी.
आणि एनएसएसमध्ये अभिमानानं जात स्वत:ला घडवण्याची संधी घ्यायला हवी.
ती तुम्ही घ्याल ना?
 
- लोकेश भास्कर चौधरी
शहादा,  जळगाव

 

Web Title: Life changed !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.