मेरे मन ये बता दे तूं.

By Admin | Updated: December 5, 2014 11:50 IST2014-12-05T11:50:27+5:302014-12-05T11:50:27+5:30

दुसर्‍याच्या मनात काय चाललंय हे नाही ओळखता येत तर ना सही, पण स्वत:चं मन तर ओळखा, आपल्या मनात काय चाललंय हे तर समजून घ्या. तेवढं केलं तरी खूप हलकं आणि मस्त वाटेल.

Let me tell you this. | मेरे मन ये बता दे तूं.

मेरे मन ये बता दे तूं.

स्वत:च्या मनात डोकावून पाहत आपण गेले काही दिवस स्वत:च्याच भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आनंद-दु:ख, चिडचिड, रोज उठून भेटणारी नवनवी आव्हानं, नाउमेद होण्याचे क्षण आणि त्यासोबत भावनांचे चढउतार तर रोजचाच  खेळ.  बर्‍याच गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, पण म्हणून आपल्याला कुणालाच थांबून रहायचं नसतं. भावनांचे चढउतार सांभाळत पुढेच जायचं असतं. 
आणि तिथंच तर आपण अडखळतो, कारण भावनांना योग्य प्रकारे हाताळणं ही तशा अर्थाने मोठी प्रक्रिया आहे. आणि आपण त्यांना नीट हाताळलं नाही तर त्याचे आपल्या स्वत:वर, स्वत:च्या शरीरिक, मानसिक आरोग्यावर, नात्यांवर आणि आपल्या कानावर खूप खोलवर परिणाम होत राहतात. मात्र भावना तर आयुष्यातून डीलीट करता येत नाही, तेव्हा त्यांना अडथळा समजण्यापेक्षा आणि आपण फार इमोशनल फुल आहोत असं मानण्यापेक्षा भावना हाताळण्याची कौशल्य शिकणं स्वत:त प्रयत्नपूर्वक निर्माण करणं महत्त्वाचं.  थोडा सराव केला, वागण्यात सातत्य ठेवलं तर ही प्रक्रिया सोपी होऊ शकते.
तेव्हा तुम्हाला शिकायच्याच असतील तुमच्या भावना हाताळणं तर या काही गोष्टी नियमित करून पहा..
 
 
आहे स्वत:साठी वेळ ?
रोजच्या रोज दिवसातून किमान दहा ते पंधरा मिनिटांचा वेळ फक्त स्वत:साठी राखून ठेवा. स्वत:च्या मनात डोकावून पहा. स्वत:शी गप्पा मारा. बोला स्वत:शी. स्वत:च्या भावना, स्वत:चे विचार समजून घ्या. तुम्हाला काय वाटतंय, कोणत्या गोष्टी मनाला टोचताहेत, खूपताहेत, त्रास देताहेत याची नोंद घ्या. भावनांना नाकारून, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, आपल्याला असं वाटूच कसं शकतं असा विचार करत बसलं तर  प्रश्न वाढत जातात. आपल्या जगण्यातली गुणवत्ता वाढवायची असेल तर आपल्याला जे वाटतं ते, त्या भावना नाकारून चालणार नाही.
 
मन वाचायचं वळण
भावनांना घाबरून दूर पळू नका.  लक्षात घ्या भावना नकारात्मक असल्या तरी त्या आपल्याला मदतच करतात.  कोणत्या भावना मला वारंवार जाणवतात ? सतत साध्या कारणांनी राग येतो का, किंवा मला सतत कशाचंतरी दडपण वाटतं का ? त्यामुळे शरीरावर काय पडसाद उमटतात, मनात काय होते, आपण कसे वागतो हे पहा. त्याची कारणं, आणि त्यामागचे विचार काय हे जरा शांत होऊन पहा.
म्हणजे बघा, तुम्हाला राग येतो, चिडचिड होते, सतत साध्या कारणांवरूनसुद्धा राग येतो. अगदी कुणी फोनला रिप्लाय केलं नाही तरी संताप होतो असं होतं का ? मग तेव्हा चेहरा ताणला जातो, डोकं दुखायला लागतं. कधी मुठी आवळल्या जातात अशी काही शारीरिक लक्षणं दिसतात का ? मग नेमका आपल्याला कशानं त्रास झाला याची कारणं पहा. साध्या गोष्टी मनाविरुद्ध होतात याचा, की अचानक कुणी प्लॅन बदलला याचा, की कुणी आपल्याकडे लक्षच दिलं नाही याचा.?
 मग तुमच्या डोक्यात विचार सुरू होतात की, असं कसं कुणी वागू शकतं ? साधे मॅनर्स नाहीत लोकांना!  हे असं नेहमी होत असेल तर विचार करा की, नेमकं काय होतं तेव्हा ? डोक्यात फटाके फुटल्यासारखे वाटतात? अशा वेळी आपल्याला काय वाटतं, याचं एखादं चित्र काढून पहा.
हे सारं अवघड वाटेल, पण सरावानं आपल्याला आपलंच वागणं नीट समजून घेता येईल.
रोज डायरी लिहा
मनात ज्या-ज्या गोष्टी जशा- जशा येत राहतात त्याचं मूल्यमापन न करता त्या लिहून काढा. आपल्या मनता असं कसं येतं? असं मला वाटताच कामा नये, अशा विचारांनी त्यांना बांध घालू नका. सातत्याने टोचणा-या भावना, अस्वस्थता निर्माण करणारे विचार समजून घ्या. डायरी लिहीण्याने मन मोकळं व्हायला मदत होते. आपल्याला वाटणा-या भावनांचा स्वीकार करायला मदत होते.  आपली विचार करण्याची पद्धतही त्यातून समजते. 
 
मी म्हणतो तसंच...?
स्वत:ची विचार करण्याची पद्धत, विचारांमधील त्रुटी, कमतरता, आपले दृष्टिकोन तपासून पहा. त्यात आवश्यक त्या ठिकाणी बदल करण्याची तयारी ठेवा. आपल्याच विचारात असलेला अट्टाहास, दुराग्रहीपणा, हट्टीपणा समजून घ्या. मला एकही चूक अजिबात चालत नाही तसं झालं तर..
सर्व गोष्टी अमुक एका पद्धतीनेच व्हायला हव्या नाही तर..
मला अमुकने समजून घ्यायलाच हवं ..
हे असे हट्ट आपण करतो का, हे तपासा. अशी अनेक अर्धवट वाक्य आपल्या मनात असतात, ती पूर्ण करा. त्या वाक्यातील आपला हेका तपासा, आणि स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करा. 
 
त्यानं काय होणार ?
आपल्याला मदत करणारे विचार कोणते, मदत न करणारे विचार कोणते याचं वर्गिकरण करायला शिका. सातत्याने समोर येणार्‍या गोष्टी, त्या पाठीमागचे विचार सरावाने बदलता येतात. त्यामुळे आपल्यामध्ये अडथळा निर्माण करण्याच्या भावनांची हाताळणी करायला त्याची मदत होते. म्हणजेच सतत वाईट विचार करून, काहीच उपयोग नाही असं म्हणत बसण्यापेक्षा आपण काहीतरी करू, होईल काहीतरी चांगलं, असा विचार करा, सवयीनं चांगले विचार करता येतात. 
 
माहितीये मला ?
आपल्या मनात असणारी गृहीतकं, आपण काढलेले निष्कर्ष तपासून पहा. आपल्याला वाटतं तेच खरं, तीच बाजू योग्य, मी म्हणतो तेच सत्य हा हेका काही कामाचा नाही. तो तसा कायम राहिला तर आपली चिडचिड होणार आणि कधीच फक्त आपल्या मनासारखं होणार नाही. तेव्हा आपल्याला वाटतं, त्यापेक्षाही वेगळं काही आहे का, हे एकदा तपासून पहायची सवय लावाच स्वत:ला!
 
विचार करून, तोंड उघडा
कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देण्यापूर्वी एक क्षणभर थांबून आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे, काय म्हणायचं आहे, हे मनातल्या मनात ठरवा. तुमचं म्हणणं योग्य शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा. आपण भावनेच्या भरात वाटेल ते बोलत राहिलो तर त्याचा परिणाम आपल्या संवादावर आणि नात्यांवर परिणाम होतोच.  कधी भीड वाटते म्हणून आपण मनातली गोष्ट मोकळेपणाने बोलत नाही तर कधी राग येतो म्हणून आवाज चढवून आक्रमकपणे बोलतो. संवाद तर होत नाहीच, पण मनस्ताप होतो. 
 
कामाला लागा.
फक्त विचारांमध्ये बदल उपयोगाचा ठरत नाही. तो कृतीतही आवर्जून आणावा लागतो. बर्‍याच जणांना कळतं पण वळत नाही, अशी स्थिती असते. ज्या गोष्टीत बदल करण्यासाठी आपण धडपडत आहोत तो बदल कृतीत आणण्यासाठी काय करायला हवं याचा विचार करा.
विचार तर कराच, पण कृती करा, कामाला लागा..! 
 

Web Title: Let me tell you this.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.