खेलो इंडियात सुवर्णपदक विजेता सद्दाम शेख आणि हिंदू-मुस्लीम दोस्तीची मिसाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 07:30 AM2020-01-30T07:30:00+5:302020-01-30T07:30:04+5:30

सद्दाम शेख : ‘खेलो इंडिया’- 60 किलो वजनी गटात ग्रिको रोमन कुस्तीमध्ये सुवर्णपदक

Khelo India 2020 : meet  Saddam sheikh -kolhapur wrestler. | खेलो इंडियात सुवर्णपदक विजेता सद्दाम शेख आणि हिंदू-मुस्लीम दोस्तीची मिसाल!

खेलो इंडियात सुवर्णपदक विजेता सद्दाम शेख आणि हिंदू-मुस्लीम दोस्तीची मिसाल!

Next
ठळक मुद्देखेलो इंडियातल्या पदकविजेत्यांची गोष्ट. संघर्षाचीही. यशाचीही

- समीर मराठे

देशातलं वातावरण कसंही असू देत, धर्माधर्मात आणि दोन विशिष्ट धर्मीयांत तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न कितीही वारेमाप सुरू असू देत; पण खरा भारत कसा आहे, हे पाहायचं असेल, तर खेडय़ापाडय़ांत जायला हवं आणि तिथली दुनियादारी, दोस्तदारी पाहायला हवी.
असंच एक गाव आहे. दर्‍याचे वडगाव. अगदी छोटंसं. कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातलं. 
तिथल्या दोस्तीची ही कहाणी.
कासीम बंदगीर शेख आणि त्यांचे खास दोस्त हिंदूराव बेनके. 
कासीम प्लंबिंगचं काम करायचे. काही वर्षापूर्वी ते पडले. गुडघ्याला मार बसला. ऑपरेशन करावं लागलं. जड काम करणं बंद झालं. त्यामुळे प्लंबिंग काम त्यांना सोडावं लागलं. मग त्यांनी शेती कसायला सुरुवात केली. खरं तर त्यांच्याकडे स्वतर्‍चा जमिनीचा चतकोर तुकडाही नाही; पण गावातच आर्मीतल्या एका जवानाची शेती आहे. ती शेती त्यांनी कसायला घेतली. नवरा-बायको दिवसभर शेतात राबतात. जे काही उत्पन्न येईल त्यातला अर्धा वाटा आपण घेतात आणि अर्धा वाटा शेतीमालकाला देतात.
कासीम यांचे मित्र हिंदूराव बेनके यांची परिस्थिती मात्र थोडीशी बरी. त्यांचा मुलगा आर्मीत नोकरीला आहे. तो कुस्तीही करतो. हिंदूराव यांनी एक दिवस आपल्या मित्राला, कासीमला सांगितलं, ‘तुझ्या पोरालाही कुस्तीत टाक. चांगला गडी तयार झाला, कुस्तीत नाव काढलं, तर त्याचं आणि तुमचं कल्याण होईल. गावाचंही नाव होईल.’ 
कासीम यांचा मुलगा सद्दाम त्यावेळी चौथी-पाचवीत होता. गावातच एक छोटीशी तालीम आहे. तिथे तो जायला लागला. दंड-बैठका मारू लागला. याच मुलानं गुवाहाटी येथे झालेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत 60 किलो वजनी गटात ग्रिको रोमन प्रकारात गोल्ड मेडल पटकावलं. सध्या तो वीस वर्षाचा आहे.
गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल सद्दामचं अभिनंदन केलं, तर तो म्हणाला, ‘माझं कशाला अभिनंदन करता? माझ्यावर खूप जणांचे उपकार आहेत. मी काहीच केलेलं नाही. जे काही केलं, ते माझ्या बापानं, त्यांच्यापेक्षाही जास्त त्यांच्या मित्रानं आणि आजर्पयत ज्यांनी ज्यांनी मला सांभाळून घेतलं, माझा सगळा खर्च केला, मला आपल्या घरच्यासारखं मानून पदोपदी मला मदत केली, करताहेत. अशा खूप सार्‍या जणांचं हे यश आहे. ते जर माझ्या पाठीशी नसते, तर मी आज इथर्पयत पोहोचूही शकलो नसतो. त्यामुळे हे यशही त्यांचंच आहे!’
कुस्तीची नशा आपल्यात पेरणारे वडिलांचे मित्र हिंदूराव यांच्या प्रेरणेनं, प्रोत्साहनानं आणि त्यांच्या आग्रहामुळेच मी कुस्तीत आलो असं सांगताना सद्दाम म्हणतो, ‘हिंदूरावकाकांनी मला कुस्तीपटू करण्याचं स्वपA वडिलांच्या डोक्यात पेरलं आणि मग माझ्या ‘फादरनंही मला पैलवान करायचं डोस्क्यातच घेतलं!’.
सद्याम काही दिवस गावातल्या तालमीत गेला. आपल्या कोवळ्या वयातली रग तिथे जिरवायचा प्रयत्न केला. हिंदूरावांचा मुलगा सुरेश तेव्हा कोल्हापूरला होता. तिथल्या न्यू मोतीबाग तालमीत तो सराव करायचा. हिंदूराव एक दिवस पुन्हा मित्र कासीमला म्हणाले, ‘तुझं पोरगं आमच्या पोराकडे जाऊ दे. कोल्हापूरला!. पैशाची चिंता करू नको. तू त्याला पाठव फक्त. पाहिजे तर सुरुवातीला नुस्तं सुटीपुरतं पाठव.’ 
सद्दाम उन्हाळाच्या सुटीत कोल्हापूरला गेला. हिंदूरावांचा मुलगा सुरेशकडे. तानाजी पाटील यांच्या तालमीत. सहा महिने तो तिथे होता. काही महिने शाळा बुडाली; पण परीक्षेपुरता सद्दाम गावी यायचा. कोल्हापूरला तालमीत एका मोठय़ा हॉलमध्ये 40-50 जण राहायचे. तिथेच कुस्ती शिकायचे. सुरेशबरोबर सद्दामही तिथे सामावून गेला.
तिथले वस्ताद तानाजी पाटील एक दिवस सद्यामला म्हणाले, ‘तू चांगली कुस्ती करतोस. मी तुला पुण्याला सोडतो!.’ 
आतार्पयत पैशाची फारशी गरज पडली नाही; पण पुण्याला जायचं तर मोठा खर्च येणार होता. सद्दामचे वडील कासीम तानाजी पाटलांना म्हणाले, पैशाचं कसं जमणार? माझ्यानं होणार नाही. आताच पोटापुरतं कसंतरी भागतंय.
तानाजी पाटील कासीम यांना म्हणाले, ‘तुला मी पैशाचं विचारलं का? तुला एक पैशाचाही खर्च येणार नाही. पोराला पाठवायचं की नाही, एवढंच सांग.’
भारावलेले कासीम काहीच बोलू शकले नाहीत.
कोल्हापुरात तानाजी पाटील यांच्याच आखाडय़ात सुरुवातीला कुस्तीचे धडे गिरवलेला मल्ल बदाम मगदूम यानं सद्यामची जबाबदारी उचलली. बदाम रेल्वेत टीसी आहे आणि कुस्तीही खेळतो.
सद्दामनं पिशवी भरली आणि आठवीत असताना तो पुण्याला आला. काका पवार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात दाखल झाला! बदामही त्यावेळी काका पवारांकडेच शिकत होता. सद्दामचा खाण्यापिण्याचा, राहण्याचा सारा खर्च चार वर्षे बदामनं केला. दोघांच्या स्वयंपाकाचं काम तेवढं बर्‍याचदा सद्दाम पाहायचा. 
काका पवारांच्या या कुस्ती संकुलात देशभरातली जवळपास तीनशे मुलं सध्या कुस्ती शिकण्यासाठी आहेत. काही वर्षापूर्वी बदामचं लग्न झाल्यावर तो गावी गेला; पण त्यामुळे सद्दाम उघडा पडला नाही. ‘आता पुढे काय’ असा प्रश्न सद्दामपुढे उभा राहिला नाही. कारण जाण्यापूर्वी बदामनं सद्दामला आपला मित्र कौतुक डाफळे याच्याकडे सोपवलं. कौतुकही रेल्वेत टीसी आहे आणि काका पवारांच्या अकादमीतच कुस्तीही शिकतो. तोही मोठा मल्ल आहे. कोल्हापूर महापौर केसरी, लाला कडा केसरी अशा स्पर्धा त्यानं मारलेल्या आहेत. गेल्या तीन वर्षापासून सद्दामचा सारा खर्च कौतुक करतो आहे.
सद्दामनं सांगितलं, आम्हाला दोघांना मिळून महिन्याला किमान 25 हजार रुपये तरी लागतात!
सद्दामला विचारलं, तुमची परिस्थिती इतकी गरिबीची आहे; पण वडील काही पैसे तुला पाठवू शकतात का?
सद्दामचं म्हणणं होतं, ‘माझे आई-वडील इतके कष्ट करतात, तरीही त्यांचं पोटापुरतंही भागत नाही. ते मला काय पाठवणार? मी चुकूनही ती अपेक्षा करू शकत नाही. मला तीन बहिणी आहेत. एकीचं लग्न झालंय. घर चालवताना आई-वडिलांची किती तारांबळ होतेय, हे इथे असल्यामुळे मला दिसत नसलं तरी स्पष्टपणे कळतंय. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे कौतुक डाफळे, बदाम मगदूम यांच्यासारख्या माझ्या पाठीराख्यांनीच वेळोवेळी मला बजावलंय, ‘आम्ही आहोत ना, घरून पैसे मागवायचे नाहीत. त्यांच्यावर तुझा भार नको. अशा लोकांचे उपकार मी कसे फेडणार आहे? खरं तर ते आहेत, म्हणून मी आहे.’
यंदा झालेल्या युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेत सद्दामनं ब्रॉँझ मेडल घेतलं आहे. गिरको अधिवेशनातही त्यानं ब्र्राझ मेडल मिळवलं आहे. या वर्षापासून पहिल्यांदाच 22 फेब्रुवारीला ‘युनिव्हर्सिटी खेलो इंडिया’ स्पर्धा होणार आहेत. त्यात सद्दामला चांगली कामगिरी करायची आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि पुढे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवायचं त्याचं ध्येय आहे.
सद्दाम सांगतो, ‘माझ्या घरात कुस्तीची कुठलीच परंपरा नाही. आमची तेवढी ऐपतही  नाही. तरीही मी कुस्तीपटू झालो. त्यात खूप जणांचा वाटा आहे. वडिलांचे मित्र हिंदूराव बानके, त्यांचा मुलगा सुरेश, वस्ताद तानाजी पाटील, मला लहान भावासारखं मानणारे बदाम मगदूम, कौतुक डाफळे, त्याचबरोबर कोच काका पवार, गोविंद पवार, शरद पवार, रणधीरसिंग पोंगल, सुनील नेमन, अमोल काशीद. किती नावं घेऊ?. मला जे निरपेक्ष प्रेम, आधार मिळाला, त्याची कशानंच भरपाई होऊ शकत नाही. या माझ्यापेक्षा जास्त कष्ट या लोकांनी घेतले आहेत. माझ्यापेक्षा अधिक स्वप्न त्यांनी पाहिली आहेत. माझ्या वडिलांसाठी, माझ्यासाठी जी दोस्तदारी अनेकांनी निभावली, त्याचं मोल मी कशानं करू? एवढंच सांगतो, आता माझी पाळी आहे. त्यांनी घेतलेल्या कष्टांचं, त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचं मी चीज करीन. त्यासाठी माझे प्राण मला पणाला लावावे लागले तरी बेहतर. काय व्हायचं ते हू दे!’

Web Title: Khelo India 2020 : meet  Saddam sheikh -kolhapur wrestler.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.