केविन-प्रिन्स आणि जेरोम बोटेंग दोस्ती भी, दुश्मनी भी.

By Admin | Updated: June 13, 2014 09:49 IST2014-06-13T09:49:34+5:302014-06-13T09:49:34+5:30

दोन सख्खे भाऊ. एकाच घरात वाढले. सोबतच लहानाचे मोठे झाले. एकत्रच दंगामस्ती केली. दोघंही फुटबॉल चॅम्पियन झाले, दोघांचीही राष्ट्रीय संघात निवड झाली, दोघांचंही एकमेकांवर अतीव प्रेम, पण दोघंही एकमेकांना पाण्यात पाहताहेत. - कारण थोरला घानाकडून खेळतोय, तर धाकला र्जमनीकडून. दोघांनीही आताच एक जिवंत इतिहास लिहिलाय.

Kevin-Prince and Jerome Boateng friendship too, hostility too. | केविन-प्रिन्स आणि जेरोम बोटेंग दोस्ती भी, दुश्मनी भी.

केविन-प्रिन्स आणि जेरोम बोटेंग दोस्ती भी, दुश्मनी भी.

>म्हटलं तर एकदम फिल्मी स्टोरी. दोन सख्खे भाऊ. अर्थातच एकाच घरात वाढलेले. सोबतच लहानाचे मोठे झालेले. सोबतच दंगामस्ती केलेली. दोघांचीही आवड बर्‍यापैकी सारखीच. दोघांचंही खेळावर अमाप प्रेम, पण त्यातही फुटबॉल दोघांचाही जीव की प्राण. लहानपणी त्यांनी घराचं जसं फुटबॉल मैदान केलं, तसंच गल्लीचं आणि प्रत्येक मोकळ्या जागेचं. जागा दिसली आणि ‘किक’ बसली नाही असं कधी झालंच नाही.
दोघंही अगोदर गल्लीतले फुटबॉल चॅम्पियन झाले, शाळेतही ही जोडगोळी चॅम्पियनच होती. पुढे चॅम्पियन म्हणून त्यांनी आपल्या देशाचं नावही रोशन केलं.
पण. इथे कहाणीला थोडा ट्विस्ट आहे.
दोघंही फुटबॉल चॅम्पियन आहेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्येही अर्थातच दोघंही खेळताहेत.
मात्र मोठा भाऊ घानाकडून तर लहाना र्जमनीकडून!
या दोन्ही सख्ख्या भावांचं नाव आहे जेरोम बोटेंग आणि केविन-प्रिन्स बोटेंग. जेरोम लहाना तर केविन थोरला. दोघांचाही जन्म र्जमनीतला. 
मूळ घानाचे असलेले एजिनिम बोटेंग नंतर र्जमनीत स्थायिक झाले. तिथे दोन र्जमन बायकांशी त्यांनी लग्न केलं. त्यांची ही मुलं. सावत्र असली तरी त्यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आणि तेवढीच ‘दुश्मनी’ही. लहानपणीही एकत्र खेळत असताना त्यांनी कधीच एकमेकांची ‘कीव’ केली नाही. दोघंही तडफेनं खेळायचे. एक आघाडीला खेळायचा, तर दुसरा डिफेंडर. दोघंही एकाच टीमकडून जसं खेळले, तसंच बर्‍याचदा दुसर्‍या टीमकडूनही. एक एका संघात, तर दुसरा दुसर्‍या संघाकडून. यावेळीही एकानं गोल करण्याची पराकाष्ठा केली, तर दुसर्‍यानं त्याचा गोल होऊ नये म्हणून त्याच्या मार्गात जेवढे म्हणून अडथळे उभे करता येतील तेवढे केले. एक मात्र खरं, एकमेकांविरुद्ध खेळताना त्यांच्या रक्ताच्या नात्यानं कधीच घोळ केला नाही, मात्र एकमेकांविषयी असलेलं त्यांचं प्रेमही कधीच आटलं नाही. खेळताना एखाद्याला लागलं की लगेच दुसर्‍याचा जीव खालीवर व्हायचा. ताबडतोब त्याच्या मदतीला दुसरा धावून जायचा.
आज दोघांचे देश वेगवेगळे आहेत, संघ वेगवेगळे आहेत, दोघंही दोन वेगवेगळ्या देशांत राहताहेत, दोघंही त्याच तडफेनं आता विश्‍वचषकात एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत, पण दोन्ही देशांविषयी दोघांना तितकंच प्रेमही आहे.
मोठा केविन-प्रिन्स बरीच वर्षं र्जमनीकडून खेळला. अंडर फिफ्टीन, अंडर सिक्स्टीन, अंडर सेव्हन्टिन, अंडर नाइन्टिन, अंडर ट्वेंटी, अंडर ट्वेंटीवन. अशा जवळजवळ सार्‍याच स्पर्धा केविन र्जमनीकडून खेळला. जगभरात विविध देशांविरुद्ध खेळताना आपली छापही त्यानं सोडली. २00७ला फ्रान्समध्ये एका मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. मात्र इथून पुढे ‘बुरे दिन’ त्याची वाट पाहात होते. तिथे शिबिरात शिस्तभंगावरून अख्ख्या टीमलाच शिक्षा देण्यात आली आणि या सार्‍यांनाच स्पर्धेतून बाद करण्यात आलं. त्यात अर्थातच केविनही होता. त्यानंतर दोन वर्षांनी २00९मध्ये नव्या कोचनं केविनला पुन्हा बोलावणं पाठवलं आणि तो परत संघात आला. त्याच तडफेनं खेळू लागला. पण ‘बुरे दिन’ अजून संपलेले नव्हते. खेळताना त्याच्याकडून एकाला दुखापत झाली आणि मुख्य संघाचे दरवाजेही त्याच्यासाठी काही काळ बंद झाले. निराशेनं त्यानं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधूनच नवृत्ती घेतली. 
पण त्यानंतर घाना देशानं त्याला आपल्याकडून 
फुटबॉल खेळण्याची विनंती केली आणि आपल्या पितृदेशाकडून खेळण्याचं त्यानं मान्यही केलं. आपल्या मातृभूमीकडून र्जमनीकडून वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न त्यानं पाहिलं होतं, पण त्याचं हे स्वप्न साकार केलं ते मात्र घानानं. २0१0चा आपला पहिला वर्ल्ड कप तो घानाकडून खेळला. त्याचवेळी लहान भाऊ जेरोमही आपल्या देशाकडून; र्जमनीकडून वर्ल्ड कपमध्ये खेळत होता. 
आपापल्या देशाकडून खेळताना एक वेळ आलीच, जेव्हा दोघं सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. एकाचा पराभव आणि दुसर्‍याचा विजय अटळ होता. या सामन्यांत र्जमनीनं घानावर बाजी मारली. 
एकाच देशाकडून दोघा भावांनी वर्ल्डकप खेळण्याचे प्रसंग यापूर्वी बर्‍याचदा येऊन गेले, पण हा पहिलाच प्रसंग होता, जेव्हा दोन सख्खे भाऊ वर्ल्डकपमध्ये एकमेकांविरुद्ध झुंजत होते. तीच वेळ यंदा पुन्हा आलीय. जेरोम आणि केविन दोघांचीही यंदाच्या वर्ल्डकपसाठी पुन्हा एकदा निवड झालीय. समोर कुणीही असलं तरी त्याला चारी मुंड्या चीत करायचंच याच एका इराद्यानं दोघंही आपापल्या देशाकडून पुन्हा एकदा झुंजताना दिसतील.
केविननं जसं आपल्या वडिलांच्या देशाकडून खेळण्याचा निर्णय घेतला, तसाच निर्णय धाकट्या जेरोमनंही घ्यावा यासाठी त्याला आग्रह करण्यात आला, घानानं त्याला सन्मानानं बोलावणंही पाठवलं, पण जेरोमनं त्याला नम्रपणे नकार दिला. त्याचं म्हणणं, त्या देशाचं रक्त माझ्या अंगात असलं तरी ज्या देशात मी वाढलो, ज्या देशात मी लहानाचा मोठा झालो त्या देशाशी मी प्रतारणा करू शकत नाही. मी र्जमनीकडूनच खेळणार! त्याच्या या निर्णयाचा सार्‍यांनीच आदर केला. कविननंही त्याच्यावर कुठलंच दडपण आणलं नाही कि घानाकडून खेळ असं सुचवलं नाही.
कारण दोघांचंही दोन्ही देशांवर तितकंच प्रेम आहे. दोघांनाही टॅटूची भयंकर आवड.
जेरोम आपल्या र्जमनी देशाचा जर्सी परिधान करीत असला तरी त्याच्या डाव्या हातावर आफ्रिकेचा नकाशा आहे आणि त्यावर ‘घाना’ असं ठळक अक्षरात लिहिलेलं आहे. उजव्या हाताच्या टॅटूवरही वडिलांचं नाव घाना देशाच्या लिपीत कोरलेलं आहे. एक देश त्याच्या रक्तात आहे, तर दुसरा हृदयात. दोघांवरही त्याचं तितकंच प्रेम आहे. 
कविन तर टॅटूचा अक्षरश: वेडा आहे. आपल्या संपूर्ण शरीरावर तब्बल २६ टॅटू त्यानं गोंदवले आहेत. त्याच्या पाठीवरही ‘फॅमिली ट्री’चा टॅटू आहे आणि त्याच्या लाडक्या जुळ्या मुलींसह एकूण २३ जणांची नावं त्यावर आहेत. 
कोण जिंकणार आणि कोण हरणार?.
सार्‍यांनाच उत्सुकता आहे. लहानपणापासून जे स्वप्न पाहिलं आणि जगलं त्याचं काय होणार?.
घरात यासंदर्भात संमिश्र भावना आहेत. वडील ‘तटस्थ’ आहेत, तर दोन्ही आया आपापल्या मुलांच्या बाजूनं. अर्थात दोघांनीही चांगलं खेळावं, त्यांना कुठलीही इन्ज्युरी होऊ नये आणि आपला सर्वोत्तम खेळ त्यांनी करावा असंच त्यांना वाटतं. 
दोघा भावांचं वैशिष्ट्य म्हणजे मैदानात कुठल्याही जागेवर ते खेळू शकतात, पण मोठय़ा केविनला आघाडीवर खेळायला, दुसर्‍यावर आक्रमण करायला आवडतं, तर धाकट्या जेरोमला हे आक्रमण अंगावर घ्यायला, थोपवायला, थकवायला आणि चकवायला आवडतं. संपूर्ण जगात एक आक्रमक खेळाडू म्हणून केविनचं नाव आहे, तर उत्तम डिफेंडर म्हणून जेरोमला गौरवलं जातं. 
अनुभवानं शहाणा झालेला केविन काही न बोलता संधीची वाट पाहतोय, तर जेरोम आमनेसामने येण्यासाठी उतावीळ झालाय. मोठय़ा भावाला डिवचण्यासाठी खोचकपणे तो म्हणतो, मोठय़ा भावाप्रमाणेच केवळ फुटबॉलच नाही, तर बास्केटबॉल, टेबल टेनिस आणि टेनिस माझ्याही रक्तात आहे, पण माझ्या संघानं केविनच्या संघाला जास्त वेळा हरवलंय. व्हिडीओ गेममध्येही मी केविनची ‘टगेगिरी’ जास्त चालू दिली नाही. आता तर वर्ल्ड कप आहे.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत दोघांनीही फुटबॉलचं अफलातून पदलालित्य आत्मसात केलंय. दोघांकडेही जगाचं लक्ष लागून आहे, एकमेकांना प्रत्यक्ष भिडण्यापूर्वीच एक नवा इतिहास दोघांनीही लिहिलाय, आता प्रतीक्षा आहे ‘किक’ची. पण तीही कधीचीच बसलीय.

Web Title: Kevin-Prince and Jerome Boateng friendship too, hostility too.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.