फक्त ‘टच’मधे राहण्याचा अतिरेक, अर्थहीन होत जाणार्या संवादाची एक पायरी
By Admin | Updated: December 5, 2014 11:56 IST2014-12-05T11:56:29+5:302014-12-05T11:56:29+5:30
एखादी व्यक्ती, तिचं म्हणणं, वागणं किती गांभीर्यानं घ्यायचं याचा विचार आपण आपल्या अनुभवातून, समजेनुसार करतो. तसंच त्या व्यक्तीशी वागतो. माध्यमांचंही असंच होतं.

फक्त ‘टच’मधे राहण्याचा अतिरेक, अर्थहीन होत जाणार्या संवादाची एक पायरी
>
एखादी व्यक्ती, तिचं म्हणणं, वागणं किती गांभीर्यानं घ्यायचं याचा विचार आपण आपल्या अनुभवातून, समजेनुसार करतो. तसंच त्या व्यक्तीशी वागतो. माध्यमांचंही असंच होतं. वर्तमानपत्रं सुरु झाली त्या काळात वर्तमानपत्रातला प्रत्येक शब्द माणसं गांभीर्यानं घ्यायची, आदरानं वाचायची. मग टीव्ही आला. टीव्ही हे एक माहितीचे आणि मनोरंजनाचे साधन म्हणूनच लोकांनी त्याकडे पाहिले. सिनेमा म्हणजे वेळ घालवण्याचं, वैयक्तिक आनंद मिळवण्याचं माध्यम. आणि त्यानंतर इंटरनेट आणि आता मोबाइलवर इंटरनेट आले. फेसबुक-व्हॉट्स अँप, त्यांच्यावरचा संवाद ही फार कमी गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे, अशी एक भावनाच लोकांमधे तयार होते आहे. त्यावर जे बोलणं होतं, जे शेअर होतं, पुढे पाठवलं जातं ते सगळं तात्पुरतं, लाईटली घ्यायचं असतं असाच एकूण त्या माध्यमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन. कारण त्यांचा हेतूच मुळात ‘संपर्कात’ राहणं एवढाच आहे. तत्काल प्रतिक्रिया, तात्पुरता संबंध यापलीकडे तिथल्या संवादाला फार अर्थ नाही, असंच ती माध्यमं वापरणार्यांना नकळत वाटू लागतं. त्या माध्यमाचा लोक गंमत म्हणून वापर करतात. केवळ आपण ‘टच’मधे आहोत, एवढीच भावना ते माध्यम
देतं ! आणि त्यातून सुरू होतं एक ‘अनइन्व्हॉल्व्ड’ कम्युनिकेशन. म्हणजेच कुठल्याही भावनिक गुंतवणुकीशिवाय असलेला संवाद. आपण प्रत्यक्षात माणसांशी जेव्हा बोलतो त्यात काहीतरी भावनिक गुंतवणूक असते. प्रेम, राग, लोभ, काहीतरी असतं. या माध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे कुठल्याच संवादात अशी काही ‘इन्व्हॉल्वमेण्ट’ वाटत नाही अशी भीती आहे. त्यात वाईट म्हणजे अनेक तरुणांच्या आयुष्यात प्रत्यक्ष संवादापेक्षा आभासी जगातला असा गुंतवणूक नसलेला संवाद वाढला आहे. आणि त्यातून मग संवादात पण भुसभुशीतपणा येण्याची शक्यता असते. आणि गंमत म्हणून, तिथं जे बोललं जातं, ते गांभीर्यानं न घेण्याची एक सवयच लागते.
माध्यमांच्या अतिरेकी सुलभ वापरातून हे पोकळपणाचे धोके आता दिसू लागले आहेत.
- विश्राम ढोले
संस्कृती आणि माहिती-संज्ञापनाचे अभ्यासक