स्वीडनच्या पर्यावरण प्रेमाशी दोस्ती करवणारे स्टॉकहोमचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 07:30 IST2019-09-26T07:26:00+5:302019-09-26T07:30:09+5:30
सारं स्वीडनच पर्यावरणस्नेही जगतं! या देशात वाया गेलेल्या अन्नातून बायोगॅस तयार केला जातो. त्यावर शहरातल्या तमाम बसेस धावतात. - ही कल्पनाच किती वेगळी आहे. स्टॉकहोममध्ये फूड बँक्स आहेत. काही सुपरमार्केट्सही आहेत, जी फूड बॅँकसारखं काम करतात. कुणी अन्न आणून देतं, ज्याला गरज असेल, तो कमी पैशात ते विकत घेतो.

स्वीडनच्या पर्यावरण प्रेमाशी दोस्ती करवणारे स्टॉकहोमचे दिवस
- संयोगीता सरीन
या जगाचे दोन महत्त्वाचे प्रश्न दिसतात. एक म्हणजे अज्ञान आणि दुसरं म्हणजे वास्तव न स्वीकारण्याची तयारी. निदान पर्यावरणाचा विचार केला तर ही दोन मुख्य कारणं सरसकट सर्वत्र दिसतात. साधं पाहा, आपली एखादी लहानशी कृती जगाच्या पर्यावरणावर आघात करते, आणि तसं काही होत असेल याची आपल्याला जाणही नसते. खरं तर जाण नसते की आपल्याला ते समजूनच घ्यायचं नसतं? साधं उदाहरण घ्या, आपण स्ट्रॉने कोल्ड्रिंक पितो? नेहमी पितो? पण आपल्याला हे कुठं माहिती असतं की, तो इटुकला स्ट्रॉ आपण फेकला की समुद्रात जाऊन पडणार आहे आणि त्यामुळं देवमाशाला आपले प्राण गमवावे लागणार आहेत.
हे असंच चालणं काही बरं नाही, बदल व्हायलाच हवा असं म्हणून पुढाकार घेत स्वीडिश इन्स्टिटय़ूटने स्पॉन्सर्ड केलेल्या एसईके सिटी एलीट स्कॉलरशिप प्रोग्रॅमसाठी माझी निवड झाली. स्वीडिश इन्व्हार्यनमेण्ट रिसर्च इन्स्टिटय़ूटने त्याचं आयोजन केलं होतं. समर कॅम्पच तो, तिथं 15 ते 19 वयोगटातले आम्ही 20 विद्यार्थी जमलो होतो. तेही भारत आणि चीन या दोन जगातल्या महाकाय देशांतले. पर्यावरणाच्या बदलत्या जगाचा भाग व्हायची संधी आम्हाला मिळाली, हे सुदैवच.
त्या सुदैवींपैकीच मी एक. मनापासून सांगते, त्या कॅम्पने माझं आयुष्य बदलून टाकलं. या कॅम्पमध्ये आम्हाला तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. भाषणं दिली. पण सोबत फिल्ड व्हिजीट होत्या. जागोजागी जाऊन आम्ही अनेक गोष्टी पाहिल्या. विविध प्लाण्ट्स पाहिले. स्टॉकहोम आणि बॉरलेन या दोन शहरात वेस्ट मॅनेजमेण्टचे प्लाण्ट पाहिले. त्यांचा वापर-पुनर्वापर पाहिला. त्यातून आमच्या लक्षात आलं की वेस्ट मॅनेजमेण्टच्या जगात स्वीडनने इतकी आघाडी कशी घेतली आहे. त्या देशात तयार होत असलेल्या एकूण सर्व कचर्यांपैकी फक्त 2 टक्के कचरा हा कचरा डेपोत जातो आणि बाकी सगळा पुनर्वापर होतो. स्वीडनमध्ये एक खास व्यवस्था आहे, ज्याला इनव्हॅक सिस्टीम म्हणतात. म्हणजे अशी व्यवस्था जी ऑटोमॅटिक व्हॅक्युम वेस्ट कलेक्शन करते, अर्थात हवेतून किंवा अंडर ग्राउण्ड. इथं अंडर ग्राउण्ड टनेल्स आहेत आणि त्यातून देशभरातलं मलमूत्र, कचरा गोळा केला जातो. तो एका ठिकाणी आणला जातो आणि त्यावर प्रक्रिया केली जाते.
सगळ्यात महत्त्वाचं काय शिकलं तर वाया जाणार्या अन्नाचं स्वीडनमध्ये काय केलं जातं? नासलेल्या, खाताच न येणार्या अन्नापासून स्टॉकहोममध्ये त्यापासून बायोगॅस तयार केला जातो. त्यावर शहरातल्या तमाम बसेस धावतात. म्हणजे घरातलं वाया जाणारं अन्न, शहरातल्या गाडय़ांचं इंधन ठरतं, ही कल्पनाच किती वेगळी आहे. स्टॉकहोममध्ये फूड बॅँक्स आहेत. काही सुपरमार्केट्सही आहेत जे फूड बॅँकसारखं काम करतात. मॅटमिशनेन नावाचं स्टॉकहोममधलं एक सुपरमार्केट अन्नपदार्थ विकतात. मात्र हे पदार्थ कुणीतरी त्यांना जास्त झाले म्हणून, उरले म्हणून आणून दिलेले असतात. गरीब, आर्थिकदृष्टय़ा मागास लोक ते पदार्थ कमी पैशात विकत घेतात. या उपक्रमामुळे अन्न तर वाया जात नाहीच, पण कुणाचं तरी पोटही भरतं.
शहरं शाश्वत विकासाच्या दिशेनं कशी जातील आणि तसं करताना माणसांना छान मनमोकळं जगता यावं, सोयीचं असावं, सुविधाही असाव्यात असं नियोजन केलेलं दिसलं. रॉय सीपोर्टला जाताना हे असं शहर नियोजन अगदी जवळून पाहता आलं. या शहरातल्या इमारतीच अशा की सगळ्यांना भरपूर सूर्यप्रकाश मिळेल, प्रत्येक छतावर रुफ टॉप गार्डन केलेलं आहे. विशेष म्हणजे नागरिकांच्या सोयीचाही विचार आहे. सगळं काही 5 मिनिट रुल या एका नियमाभोवती गुंफलेलं आहे. दुकानं, रेस्टॉरंट यासाठी कुणालाही 5 मिनिटापेक्षा लांब जावंच लागणार नाही, असं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे लोकांचा गाडय़ांचा वापर आपोआपच कमी होतो. त्यातही रस्ते दगडानं बनलेले आहेत. सिमेंटचे नाहीत, रस्तेही वेगळे आणि मजबूत आहेत. इतक्या बारीक गोष्टींचा विचार शहर नियोजनात पर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवून करण्यात आलेला आहे.
माझ्या या स्वीडन भेटीत मी दोन गोष्टी शिकले.
एक म्हणजे स्वीडनमध्ये राहाणारी माणसंच पर्यावरण हा अत्यंत महत्त्वाचा जीवनकेंद्री मुद्दा म्हणून आपलं आयुष्य जगतात. निसर्गाशी त्यांची नाळ पक्की आहे. त्यांना क्लायमेट चेंज नावाच्या गोष्टीचा पुरता अंदाज आहे. माणसं अशी पर्यावरणस्नेही असल्यानं सरकारही आपल्या योजना उत्तम राबवू शकत आहे. भारतात नागरिकांचं आणि सरकारचं असं नातं तयार व्हायला हवं असं मला वाटलं.
दुसरं म्हणजे स्थानिक सरकारला असलेले अधिकार. स्थानिक सरकार आणि व्यवस्थेकडे अत्यंत महत्त्वाचे अधिकार आहेत. म्हणजे सिटी कौन्सिल आपल्या महानगरपालिकांसारख्या त्या पायाभूत सुविधा ते इन्फ्रास्ट्रक्चर ते वेस्ट मॅनजेमेंट यासंदर्भातील सगळी धोरणं आखते. राबवते. असं काही भारतात, लाल फितीत न अडकता होईल का?
अर्थात, आता हा कॅम्प करून परत आल्यावर एक व्यक्ती म्हणून मी पर्यावरणाच्या प्रश्नाचा नाही तर पर्यावरण केंद्री जगण्याचा विचार कायम करीन, त्यासाठीच प्रयत्नही करत राहीन!
******************
आय.व्ही.एल. - स्वीडिश इन्व्हार्यनमेण्ट रीसर्च इन्स्टिटय़ूटने एसईके सिटी एलीट स्कॉलरशिप प्रोग्रॅम अंतर्गत भारतीय आणि चिनी मुलांना शिष्यवृत्ती दिली होती. दोन आठवडे स्टॉकहोम येथे मुक्काम करून स्वीडनमधील पर्यावरणरक्षणाच्या प्रयत्नांचा अभ्यास मुलांनी करावा, असा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे. 15 ते 19 वयोगटातले एकूण वीस विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या निमित्ताने स्वीडनचा अभ्यास दौरा करून नुकतेच परतले आहेत. त्यात दहा भारतीय विद्यार्थाचा समावेश होता.
आय.व्ही.एल. या संस्थेच्या बिझनेस डेव्हलपमेंट व्यवस्थापनपदी मूळ भारतीय असलेल्या रूपाली देशमुख काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या शिष्यवृत्ती कार्यक्रमात सहभागी असलेल्या संयोगीताचा हा अनुभव.