प्रोफेशनल लाइफचा नवीन नियम, काम बोलो दाम बोलो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 13:50 IST2019-01-10T13:44:34+5:302019-01-10T13:50:23+5:30
अनेक कंपन्या तर त्यांच्या ‘एचआर’ला हाऊ टू डिल विथ मिलेनिअल्स नावाचं ट्रेनिंगही विदेशात देऊ लागल्या.

प्रोफेशनल लाइफचा नवीन नियम, काम बोलो दाम बोलो!
व्यक्तिगत आयुष्यात जशी या तरुण मुलांनी जगण्याची रीत बदलली तशी प्रोफेशनल आयुष्यातही बदलली. एक मांडणी सतत होते की, प्रोफेशनल जग बदललं, कार्पोरेट लाइफ, जागतिकीकरण आलं आणि कार्यालयीन संस्कृती बदलली. वर्क कल्चर. हा शब्द परवलीचा झाला. मात्र मनुष्यबळ अभ्यासक असं मानतात की कार्यालयीन संस्कृतीच बदलली म्हणून हे तरुण कर्मचारी बदलले नाहीत. तर हे तरुण कर्मचारी बदलले, मिलेनिअम जनरेशन कामाला लागली आणि त्यामुळेही कार्यसंस्कृती बदलली. अनेक कंपन्या तर त्यांच्या ‘एचआर’ला हाऊ टू डिल विथ मिलेनिअल्स नावाचं ट्रेनिंगही विदेशात देऊ लागल्या. आपल्याकडेही हे सारं आताशा काही फार नवीन उरलेलं नाही.
तर कार्यसंस्कृतीत तरुण पिढी कशी दिसते, त्याची ही काही वैशिष्टय़.
1. मनी मोटिव्हेशन.
पैसा कमावणं हेच आपल्याकडे काहीतरी भयंकर ठरवण्याचा एक काळ होता. कामाचं समाधान हे शब्द मोठय़ा प्रतिष्ठेनं वापरले जात. आता ही तरुण पिढी म्हणते मी काम चोख करीन; पण त्याचा परतावा पैशाच्या स्वरूपातही मला काय मिळणार ते सांगा. पैसे असतील तर माझी जीवनशैली, क्वालिटी ऑफ लाइफ सुधारेल, पैसे नसतील तर काहीच घडत नाही. त्यामुळे पैसा ही या पिढीची प्रेरणा बनली आणि तो मिळत नसेल तर एकाच ठिकाणी काम करत राहण्यात त्यांना काहीही रस नसतो.
2. हायरारकी? -हु केअर्स
वरिष्ठ, त्यांची सीनिऑरिटी, हायरारकीची यस सर संस्कृती त्यांनी आता नाकारली आहे. आपण उत्तम काम करणार असू, तर वय काय हे कुणी विचारू नये आणि विचारलंच तरी केवळ वयानं लहान म्हणून कमीपणा घेणं, मागे राहणं या तारुण्यानं सोडून दिलं आहे.
3. बॉसशी दोस्ती
या पिढीची त्यांच्या बॉसशी दोस्ती दिसते. अनेकांचा बॉसही त्यांच्यापेक्षा वयानं फार मोठा नसतो. त्यामुळे बॉसला घाबरून राहण्यापेक्षा, त्यांच्याशी दोस्ती करून उत्तम टीम बांधणं या पिढीला जमतं. जे खेळाच्या मैदानावर दिसतं, ते आता कार्यालयांतही दिसू लागलं आहे.
4. टेकसॅव्ही
खरं तर सारं जगणंच टेकसॅव्ही झालेलं आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणीही ते तंत्रज्ञान उत्तम वापरतात, चटचट शिकतात आणि त्यातून आपलं काम सोपं करतात.
5. बदलाला तयार!
अनेकजण बदल सहज स्वीकारतात, त्यानुसार काम, जागा, कामाची वेळ हे सारंही बदलतात. बदल म्हटलं की ते घाबरत, बिचकत नाहीत.
6. अपडेशन
सतत अपडेट राहावं लागतं, त्यासाठी शिकावं लागतं. जुनं विसरून नवीन शिकावं लागतं, हे या तारुण्याला माहिती आहे. अपडेट राहणं हा त्यांच्या यशाचा मंत्र आहे.
7. प्रतिक्रियावादी
सोशल मीडियामुळे कदाचित; पण या पिढीला त्यांच्या कामाविषयीचा प्रतिसाद, प्रतिक्रिया लवकर हवा असतो. तो प्रतिसाद पैसा, पद, ओळख आणि प्रोत्साहन पुरस्कार यासगळ्यासह तत्काळ कौतुकाच्याही रूपात मिळावा ही अपेक्षा असते.
8. फन
नुसतं कामच ते करत नाहीत तर ‘फन’ हा नवीन शब्द आयुष्यात रूळला आहे. आठवडाभर काम, वीकेण्डला मजा, हॉटेलिंग, प्रवास हे सारं आता तरुण आयुष्यात रुळलं आहे!