२ कोटी रुपयांची नोकरी मिळते कशी? आणि कुणाला?
By Admin | Updated: December 18, 2014 18:38 IST2014-12-18T18:38:59+5:302014-12-18T18:38:59+5:30
देशभरातल्या आयआयटीतल्या ४0 विद्यार्थ्यांना कॅम्पस इण्टरव्ह्यूमधे एक कोटीहून अधिक रुपयांच्या नोकर्या विविध मल्टिनॅशनल कंपन्यांनी देऊ केल्या.

२ कोटी रुपयांची नोकरी मिळते कशी? आणि कुणाला?
देशभरातल्या आयआयटीतल्या ४0 विद्यार्थ्यांना कॅम्पस इण्टरव्ह्यूमधे एक कोटीहून अधिक रुपयांच्या नोकर्या विविध मल्टिनॅशनल कंपन्यांनी देऊ केल्या. ‘फेसबुक’च्या कार्यालयात इण्टर्न म्हणून काम करणार्या आस्था अग्रवाल नावाच्या बी.टेक. झालेल्या आयआयटीयन मुलीला तर दोन कोटी रुपयांची नोकरी फेसबुकनं देऊ केली. दीपाली अडलाखा नावाच्या तरुणीलाही दीड कोटीपेक्षा जास्त पगाराची नोकरी फेसबुकनं दिली.
आयआयटी-आयआयएममधल्या विद्यार्थ्यांना आता काही लाख रुपयांच्या नोकर्या अनेक कंपन्या कॅम्पस इण्टरव्ह्यूमध्येच ऑफर करत आहेत.
अनुभव नाही, कुणाचा वशिला नाही, डिग्री जेमतेम हातात पडते ना पडते, तोच एवढ्ढाल्या पगाराच्या नोकर्या? या सार्याचं आपल्याला अप्रूप वाटतं आणि या कोटीच्या कोटी रुपये उड्डाणाच्या नोकर्यांच्या बातम्या वाचून प्रश्न पडतो की, या मुलांकडे असं काय असतं की, या बड्या कंपन्या अशा पैशाच्या थैल्या घेऊन त्यांच्यासमोर हात जोडून उभ्या राहतात?
तोच प्रश्न ‘ऑक्सिजन’ने सुप्रसिद्ध संगणकतज्ज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोलेंना विचारला. या नव्या ट्रेण्डचं हे खास विेषण त्यांच्याच शब्दांत.
आयआयटी-आयआयएममधे शिकणार्या या तरुण मुलांना एवढे जास्त पगार मिळतात, त्यांच्या बातम्या होतात हे खरंय !
मात्र हे इतके जास्त पगार सगळ्यानांच मिळतात का? नेमके कुणाला मिळतात? आणि ज्या कंपन्या इतके जास्त पगार देऊन जर कुणाला कामावर ठेवत असतील तर त्या कंपन्यांनाही त्यातून काही मोबदला मिळत असेलच ना !
मग ते सारं काय असतं?
हे गणित समजून घ्यायचं तर आपल्याला अर्थव्यवस्था आणि बदलती समीकरणं अगदी थोडक्यात का होईना समजून घ्यायला हवीत.
जगभरातल्या देशांचा साधारण प्रवास शेती-उद्योग आणि सेवाक्षेत्र या तीन टप्प्यांनी झाला. शेतीची वाढ झाली, मात्र त्यातही अनावश्यक मनुष्यबळाची गरज नाही असं लक्षात आलं. मग यंत्रं आली, उद्योगधंदे वाढले. यांत्रिकीकरण झालं त्यामुळे तिथंही जास्त मनुष्यबळाची गरज उरली नाही. मग तिथली माणसं सेवाक्षेत्रात आली.
जे जगात झालं तसंच सगळं मात्र भारतात घडलं नाही. भारतात शेतीची वाढ झाली नाही, उलट शेतीची अवनतीच होत गेली. उद्योगही फार भरभराटीला न येताच एका टप्प्यावर स्थिरावले. गोठलेच. पण त्याच दरम्यान सेवाक्षेत्राची म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीची मात्र झपाट्यानं वाढ होत गेली. सेवा क्षेत्रात भांडवल प्रचंड वाढलं, त्यातून नफाही वाढला. बॅँकिंग, आयटी या सेवाक्षेत्रात काम करणार्यांचे पगारही वाढले. उदाहरण म्हणून सांगतो, लोक स्वत: शेअरबाजारात, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतात. त्यातून त्यांना नफा होतो. मात्र काही सेवा क्षेत्रातल्या वित्तीय कंपन्या ग्राहकांना असं सांगतात की, तुमच्या वतीनं आम्ही पैसा गुंतवू. जगभरातल्या उद्योगांचा अभ्यास करुन, ज्या देशात जास्त फायदा तिथं गुंतवू. तुम्ही आमच्याकडे पैसा द्या. तुम्हाला मिळणार्या नफ्यापेक्षा जास्त पैसा आम्ही मिळवून देऊ असा त्यांचा दावा असतो. ते वित्ततज्ज्ञ मग जगभरातल्या अर्थव्यवस्थांचा, कंपन्यांचा अभ्यास करून पैसा गुंतवतात. ह्या माणसांच्या निर्णयावरती कोट्यवधी रुपयांची उलाढाल अवलंबून असते.
म्हणजेच त्यांच्यावर जबाबदारी मोठी, धोकाही मोठा असतो. आणि सेवाक्षेत्रातला नियम आहे, रिस्क जेवढी जास्त, रिवार्ड तेवढा जास्त.
आता मुद्दा असा की, या नव्या वेगानं मोठय़ा होणार्या बॅँकिग किंवा आयटी क्षेत्रात असं काम करणारी हुशार, अभ्यासू आणि निर्णयक्षम माणसं लागतात. ती कुठून आणायची, तर आपल्यासारख्या आयआयटी-आयआयएममधून ती मिळतात. तिथं चिक्कार हुशार डोकं असतात. ती डोकी आपण आपल्या कंपनीसाठी वापरली तर आपल्या कंपनीला फायदाच होईल हे या कंपन्यांना कळतंच.
म्हणून मग अशी हुशार माणसं ते हेरतात आणि त्यांना घसघशीत पगाराच्या नोकर्या देऊन आपल्याकडे कामाला घेतात. हे जे सेवाक्षेत्रात घडतं, ते सगळ्याच क्षेत्रात घडत नाही. मॅन्युफॅरिंग क्षेत्रात जाणार्या मुलांना इतकी करोडो रुपयांची पॅकेजेस मिळत नाहीत. आयआयटीमधून पासआऊट होणार्या इंजिनिअर्सना सरासरी ५ ते २0 लाखांपर्यंतची पॅकेजेसच एरवी मिळतात. मुद्दा आहे तो त्या-त्या क्षेत्रातल्या पुरवठा आणि मागणीच्या समीकरणाचा. आता फेसबुकसारख्या कंपन्या एवढी मोठी पॅकेजेस देतात तेव्हा त्या मुलांकडून कामही तसंच करून घेत असतील. विशेषत: स्वत:ला आवश्यक ती प्रॉडक्ट्स बनवून घेत असतील. एरवी ती प्रॉडक्ट्स बाहेरून बनवून घेतली तर त्यासाठी जास्त पैसे लागतील, ती कंपनीतच काम करणार्या व्यक्तीनं बनवली तर त्याचा कॉपीराईट अर्थात मालकीही या कंपन्यांकडे कायम राहते.
आणि म्हणून तशी प्रॉडक्ट्स उत्तम बनवू शकणार्या मनुष्यबळाला घसघशीत पैसे मोजून या कंपन्या तातडीनं सामावून घेतात. हे नवीन पॅकेजचं गणित समजून घेताना अर्थव्यवस्थांची ही बदलती समीकरणंही तरुण मुलांनी म्हणूनच नीट समजून घ्यायला हवीत.
तर अप्रूप आणि कौतुकापलीकडच्या गोष्टीही तुम्हाला दिसतील, लक्षात येतील !
- अच्युत गोडबोले
(शब्दांकन -ऑक्सिजन टीम)