कांदेपोहे खाऊन हो/नाही कसं सांगणार?
By Admin | Updated: June 30, 2016 16:32 IST2016-06-30T16:32:56+5:302016-06-30T16:32:56+5:30
एका भेटीत लग्नाला होकार/नकार देण्याच्या प्रथेला प्रश्न विचारण्याची धमक कमवतंय का आजचं तारुण्य?

कांदेपोहे खाऊन हो/नाही कसं सांगणार?
- गजानन दिवाण
आई-बाबांनी मुलगी-मुलगा पाहायचा, कांदेपोहे खाण्याचा कार्यक्रम ठरवायचा आणि नुसते पोहे खाऊन वा खाऊ घालून लग्नाचा बार उडवून द्यायचा हा ट्रेण्ड आता बदलतोय.
या बदलत्या ट्रेण्डवर प्रकाश टाकणारी एक जाहिरात सोशल मीडियावर पाहण्यात आली...
एका मुलीच्या घरी तिला पाहण्यासाठी मुलासह त्याचे आई-वडील येतात. मुलगी तयार होण्यासाठी खूप वेळ घेते. अखेर कंटाळून तिचे बाबा रूममध्ये जाऊन तिला लवकर ये सर्वजण वाट पाहत आहेत, असे सांगतात. यावर ती म्हणते, ‘पापा, सिर्फ समोसे खिलाकर कैसे डिसाइड करू की जिंदगी इसीके साथ बितानी है...’
वडिलांना कुठलेही उत्तर देता येत नाही. एकही शब्द न बोलता ते खोलीबाहेर येतात. पाठोपाठ तयार होऊन मुलगीही येते. मुलगी पसंत असल्याचे मुलाचे आई-वडील सांगतात. मुलगाही होकार देतो. तारीख कधीची काढायची, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यावर मुलीचे वडील म्हणतात, ‘तुम्ही आमचे घर पाहिले. आता आम्हालाही तुमचे घर पाहायचे आहे. माझी मुलगी काय करू शकते, हे तुम्ही जाणले. तुमच्या मुलाला काय-काय करता येतं हेही आम्हाला पाहायचं आहे..’
यावर मुलाचे आई-वडील आश्चर्यचकित होतात. ते म्हणतात, ‘मुलाला तर किचनमधले काहीच येत नाही. अगदी चहादेखील त्याला करता येत नाही. तो फार फार तर ओव्हनमध्ये नूडल्स बनवू शकतो.’
यावर मुलीचे वडील म्हणतात, ‘मला माफ करा. माझी मुलगी आयुष्यभर नूडल्स खाऊन नाही जगू शकत...’ वातावरण गंभीर बनते. कोणीच काही बोलत नाही.
काही क्षणांत स्वत: मुलगाच बोलतो. ‘तुम्ही दहा दिवसांनी याल का आमच्या घरी?’
मुलीचे वडील म्हणतात, ‘दहा दिवसांनी का?’
तो म्हणतो, ‘या काळात मी आणखी काहीतरी बनवायला शिकेन’ मुला-मुलीसह सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते आणि ही जाहिरात येथे संपते.
***
आपला जोडीदार निवडताना काय पाहिलं जातं?
केवळ पोहे-समोसे खाऊ घालून वा खाऊन काय समजतं?
चहा-पान होण्यापुरत्या वेळेत दोन कुटुंब आणि स्वत: मुलगा-मुलगी ‘हो वा नाही’चा निर्णय कशाच्या आधारे घेतात? -मोठं कोडं आहे.
इंडिया ह्यूमन डेव्हलपमेंट सर्व्हे २०११-१२च्या आकडेवारीनुसार, देशातील ग्रामीण भागातील लग्न झालेल्या आणि ३२ वर्षे वयोगटातल्या अर्ध्याहून अधिक मुलींचं लग्नाआधी आपल्या जोडीदारासोबत एकदाही बोलणं झालेलं नाही. समोरासमोर तर नाहीच. फोन-इमेलच्या माध्यमातूनही त्यांचा जोडीदाराशी संपर्क झालेला नाही. एवढंच नाही तर या मुलींनी आपल्या जोडीदाराला लग्नाआधी प्रत्यक्ष पाहिलेलंदेखील नाही. केवळ फोटो पाहून त्यांनी होकार दिला. तरुण पिढीतील हे वास्तव. ज्येष्ठांच्या बाबतीत काय असेल? सहापैकी केवळ एका महिलेला आपल्या भावी जोडीदारासोबत लग्नाच्या आधी बोलता आलं. शहरातलं वातावरण यापेक्षा थोडंसं बरं आहे. ते पण समाधानकारक म्हणता येणार नाही.
या आकडेवारी नजर घातली तर असं लक्षात येतं की, आजही आपल्या समाजात अनेक मुलं-मुली एकेका भेटीत लग्नाचा निर्णय घेतात. शहरात वातावरण बदलत असलं तरी खेड्यापाड्यात आजही लग्न हा निर्णय मुलगा/मुलगी नाही तर त्यांच्या घरचेच घेतात. आणि म्हणून मग प्रश्न कायम राहतो की, नुस्ते पोहे खाऊन कसा काय लग्नाचा एवढा मोठा निर्णय घेणार?
लग्नाचं वय वाढतंय...
मुलींच्या लग्नाचं वय आता वाढत आहे, त्यातल्या त्यात ही एक चांगली गोष्ट.
*संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार भारतातील मुलींच्या लग्नाचं वय १९९१ साली १९.३ वर्षे होते.
* २०११ मध्ये हे वय २१ वर्षांवर पोहोचलं.
* इंडिया ह्यूमन डेव्हलपमेंट सर्व्हेनुसार २०११-१२ साली साधारण ४१ टक्के विवाहित महिलांचा वयोगट हा १५ ते ३२ वर्षे असा होता. याचाच अर्थ, १९८० नंतर जन्मलेल्या अनेक मुलींनी १६ ते १८ वयादरम्यान लग्न केले. १९ ते २१ या वयोगटात २४ टक्के मुलींनी लग्न केले आणि २२ ते २५ या वयोगटात ११.५ टक्के मुलींनी लग्न केले.
* याचा अर्थ १६ ते १८ वर्षे वयोगटात मुलींचं लग्न करण्याचं प्रमाण अजूनही ४१ टक्क्यांवर असून ते धोकादायक आहे. युनिसेफने २०११ साली भारतात केलेल्या सर्वेक्षणानुसार गरिबीमुळे पालक आपल्या पाल्याचे अल्पवयात लग्न करतात. सामाजिक दबाव, शाळा सोडण्याचं प्रमाण आणि शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हीदेखील यामागची कारणं असल्याचं हा सर्व्हे सांगतो.