हुकुमशहाच्या अंतानंही का संपला नाही इजिप्शियन तारुण्याचा झगडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 09:42 IST2020-03-05T07:45:00+5:302020-03-05T09:42:40+5:30

होस्नी मुबारक. इजिप्तचे लष्करी हुकूमशहा. आधी पदावरून आणि आता जगातूनही गेले; पण व्यवस्था? ती तशीच आहे, हुकूमशाही. आणि तरुण आजही तहरीर चौकात क्रांतीची हाक देत लढत आहेत..

Hosni Mubarak, Egypt’s autocrat, dies at 91 but Iran youth is still struggling for democracy. | हुकुमशहाच्या अंतानंही का संपला नाही इजिप्शियन तारुण्याचा झगडा?

हुकुमशहाच्या अंतानंही का संपला नाही इजिप्शियन तारुण्याचा झगडा?

ठळक मुद्देदुसर्‍या लढय़ासाठी मात्र आता हे तारुण्य सोशल मीडियाचा हात सोडून खरोखरच रस्त्यावर उतरलं आहे.

- कलीम अजीम

होस्नी मुबारक. गेल्याच आठवडय़ात त्यांचं निधन झालं. पॅलेस्टाइन व इस्रायलचा हा कथित मैत्रिदूत काळाच्या पडद्याआड गेला. 91 वर्षे ते जगले. तानाशहाच. खरं तर 2011 साली तरुणांनी पुकारलेल्या बंडात त्यांची सत्ता गेली. मात्र एक सैनिक ते राष्ट्रप्रमुख हा त्यांचा प्रवास रंजक व रोचक आहे. आणि यासाठीही महत्त्वाचा आहे की, 2011च्या अरब स्प्रिंगचा, तरुण मुलांनी मुबारक यांची सत्ता उलथवून टाकण्याच्या क्रांतीचा एक आयाम त्यांच्या राजकारणाला आहे. जानेवारी 25 रेव्होल्युशन ही क्रांती आणि त्यातला तरुण मुलांचा सहभाग, त्यांची आक्रमक आगेकूच हे त्या दशकात नव्हे तर जगाच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरले. होस्नी मुबारक यांना हाकल म्हणत हे तारुण्य रस्त्यावर होतं, त्या मुबारक यांच्या तारुण्याची आणि तानाशाह होण्याची कथाही रंजक आहे. 
14 ऑक्टोबर 1981 साली एका नाटकीय घटनेत राष्ट्राध्यक्षपदाची माळ होस्नी मुबारक यांच्या गळ्यात पडली. त्यावेळी ते देशाचे दोन नंबरचे नागरिक होते. एका यशाच्या मोबदल्यात त्यांना हे गिफ्ट मिळालं होतं. होस्नी मुबारक वायू सेनेत असताना 1973 साली बहुचर्चित ऑक्टोबर युद्ध अर्थात ‘योम किपुर युद्ध’ झाले. इस्रायलकडून आपली भूमी परत मिळवण्यासाठी अरब देश आणि इस्रायलमध्ये हे युद्ध झालं होतं. यात इजिप्तने 1967 साली गमावलेले सिनाई क्षेत्न होस्नी मुबारकमुळे परत मिळालं.
मुबारक यांनी इजिप्तने गमावलेली जमीन परत मिळवली होती. या बदल्यात त्यांना उपराष्ट्रपतिपद द्यावं, अशी मागणी राष्ट्रपती अनवर सादात यांच्याकडे करण्यात आली. अशा रीतीने मुबारक उपराष्ट्रपती झाले. कालांतराने राष्ट्राध्यक्ष सादात यांनी इस्रायलशी मैत्न करार केला. ही बाब देशातील परंपरावाद्यांना खटकली. शत्रूशी हातमिळवणी केल्याच्या आरोपावरून मुस्लीम ब्रदरहूड या दहशतवादी संघटनेनं सादात यांची 6 ऑक्टोबर 1981 या दिवशी एका परेडदरम्यान हत्या केली.
हत्येच्या आठ दिवसांनंतर 14 ऑक्टोबरला होस्नी मुबारक राष्ट्राध्यक्ष झाले. 
एका सामान्य कुटुंबातील मुबारक, थेट देशाचे प्रथम नागरिक झाले. आणि त्यानंतर 30 वर्षे त्यांनी इजिप्तवर एकहाती सत्ता गाजवली. मुहंमद होस्नी सईद इब्राहिम मुबारक. एका सामान्य घरातला हा मुलगा देशाचा सम्राट म्हणून सत्ता गाजवेल असं कुणाला खरंही वाटलं नसतं. शिक्षण त्यांनी घेतलं; पण उच्च शिक्षण मिळेलच याची शाश्वती नव्हती. केवळ गुणवत्तेच्या जोरावर ते 1949 साली मिलिट्री अकॅडमीत पोहोचले. इथे त्यांनी एअर सायन्समध्ये डिग्रीचे शिक्षण पूर्ण केलं. आणि वयाच्या 21व्या वर्षी एअर फोर्स जॉइन केलं. वायू सेनेत त्यांनी 25-30 र्वष नोकरी केली. वायुसेनेचे कमांडर आणि संरक्षण खात्याचे उपमंत्री या नात्याने ते इस्रायल युद्धाला सामोरे गेले. तिथे त्यांनी देशासाठी जमीन परत मिळवण्याची कामगिरी केली आणि त्यांच्या जगण्यानं भलताच भारी टर्न घेतला.
एक साधासुधा माणूस अशी त्यांची प्रतिमा होती. पण राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यांचा नूर पालटला. इस्रायलशी मैत्नी करार करून त्यांनी कुटनीती राबवली. दुसरीकडे परंपरावाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्यावर निर्बंध लादले. त्यांनी देशात मिलिटरी कायदा लागू केला. आणीबाणीसदृश कायदे केले. विरोधक व प्रसारमाध्यमांवर वचक बसवली ती थेट 2011 र्पयत..
****
मात्र 2009 साली टय़ूनिशिया या इजिप्तच्या शेजारी राष्ट्रात सत्तेविरोधात बंड उभे राहिले. वाढती महागाई, सत्तेचा गैरवापर, वाढता भ्रष्ट्राचार आणि निरंकुश सत्तेविरोधात तरु णांनी एकत्र येत जस्मिन क्रांती घडवली. पंधरा दिवसात तिथल्या राष्ट्राध्यक्षाला पद सोडावं लागलं. तरु णाईचं हे मोठं यश होतं. सोशल मीडियाचा प्रभावी वापर त्यावेळी या तरुणांनी पहिल्यांदाच केला. तरुणांच्या हाती नवीन शस्रं आणि माध्यम आलं अशी जगभर चर्चाही सुरू झाली.
ही ठिणगी काहीच दिवसात इजिप्तला पोहोचली.
इजिप्शियन तरु णांनी होस्नी मुबारक यांच्या निरंकुश सत्तेविरोधात बंड केलं. 2010च्या जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात राजधानीतल्या तहरीर चौकात प्रचंड मोठं आंदोलेन उभं राहिले. आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने निदर्शकांवर लाठीमार केला. त्यात 17 वर्षीय उमर नावाच्या मुलाचा पाय तुटला. दुसर्‍या दिवशी हा उमर लंगडत लंगडत तहरीर चौकात पोहोचला. उमर हा फोटो जागतिक मीडियात झळकला आणि एकच भडका उडाला.
तहरीर चौकात 10 लाख तरु ण, वृद्ध आणि महिला जमा झाल्या. शांततेत चाललेल्या या मोर्चामुळे मुबारक यांच्यावर दबाव वाढला. अमेरिकेने उघड भूमिका घेत मुबारक यांना खुर्ची सोडण्याचा आदेश दिला. मीडियाने व्यापारी संधी म्हणून या आंदोलनाकडे पाहिले. भांडवलवादी देशांनी इस्रायल-अमेरिका-रशिया-फ्रान्स-ब्रिटेन समर्थित होस्नी मुबारक यांना सत्तेतून घालवण्याची विशेष मोहीम सुरू केली. डोईजड झालेले मुबारक आता अमेरिका व इस्रायलला नको होते. पुढच्या नाटकीय घडामोडीनंतर शिस्तशीरपणे होस्नी मुबारक यांनी राजीनामा दिला.
दरम्यानच्या काळात त्यांनी उपराष्ट्रपतीची निवड करून राजकीय सुधारणा घडविण्याचा प्रयत्न केला. आगामी निवडणुकीपासून दूर राहील, अशी ग्वाही दिली. परंतु संतप्त झालेल्या तरु णांनी माघार घेतली नाही. यातच नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींनी आगीत तेल ओतणारं भाषण केले. त्यांनी आंदोलक तरु णांचा बंदोबस्त करू, अशी थेटच धमकी दिली होती. या विधानावरून संतप्त झालेल्या तरु णांनी मंत्रिमंडळ कार्यालयं आणि संसद भवनाचा ताबा घेतला.
संसद भवनाकडे जाणार्‍या रस्त्याचं नामकरण पीपल्स असेम्बली स्ट्रीटऐवजी पीपल्स स्ट्रीट केलं गेलं. हा निर्णायक बदल मुबारक यांना राजीनामा देऊन कुटुंबासह काहिरा सोडण्यास कारणीभूत ठरला. होस्नी मुबारक यांची 30 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. या आंदोलनात 239 आंदोलकांच्या मृत्यू झाला. सत्तातरांचे पडसाद येमेन, सीरिया आणिलिबियार्पयत पोहोचले. कालांतरानं काही देशात सत्तांतर झालं.


***
इजिप्तमध्ये निवडणुका होऊन मुस्लीम ब्रदरहूड पक्षाचे मुहंमद मोर्सी राष्ट्राध्यक्ष झाले. पदच्युत झाले असले तरी मुबारक यांची प्रशासनावर पकड होती. ते खटल्यांना सामोरे गेले. कुटुंबातील सदस्यांवर खटला भरला गेला. आंदोलकांच्या मृत्यूच्या आरोपाखाली मुबारक यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
दुसरीकडे अब्दल अल सीसी या मुबारक मंत्रिमंडळातील नेत्याने 2013 साली मुहंमद मोर्सी यांची सत्ता ताब्यात घेतली. त्यांच्यावर पाश्चिमात्य देशासाठी हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला. गंभीर गुन्हे लावून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. अब्दल सीसी होस्नी मुबारकचे दुसरे अवतार बनले. त्यांनी देशावर पुन्हा एकदा सैन्य शासन लादलं. आणि आश्चर्य म्हणजे या सार्‍यात नाटकीयरीत्या होस्नी मुबारक 6 वर्ष तुरु ंगात राहून निदरेष सुटले.
****
तरुणांच्या क्रांतीनं बदल तर झाला; पण व्यवस्था बदलली नाही. अब्दल सीसी यांची निरंकुश सत्ता इजिप्तमध्ये सुरू झाली. महागाई आणि भ्रष्टाचार बोकाळला. अलीकडेच 2019च्या ऑक्टोबर महिन्यात इजिप्शियन नागरिकांनी तहरीर चौकात अब्दल सीसीविरोधात प्रचंड मोठं आंदोलन केलं. दोन महिने चाललेल्या या आंदोलनात हजारो तरु णांना सरकारनं अटक केली. त्यांचा अमानूष छळ केला. चार-पाच महिन्यानंतर अजूनही या तरु णांची सुटता झालेली नाही. सरकारनं निर्ममतेनं ते आंदोलन मोडीत काढलं.
*** 
आधी मुबारक यांची सत्ता गेली, आता तेही गेले. पण तानाशाही गेली नाही. लोकशाहीसाठी तरुणांचा लढा अजून सुरूच आहे. सीसीच्या रूपाने अजूनही एक हुकूमशहाच इजिप्शियन लोकांवर सत्ता गाजवतो आहे. तरुणांची आंदोलनं सुरूच आहेत. कैरोचा तहरीर चौक पेटलेला आहे. लोकशाहीचं स्वप्न भंग पावलं आहे.
या दुसर्‍या लढय़ासाठी मात्र आता हे तारुण्य सोशल मीडियाचा हात सोडून खरोखरच रस्त्यावर उतरलं आहे.


(कलीम मुक्त पत्रकार आहे.)
 

Web Title: Hosni Mubarak, Egypt’s autocrat, dies at 91 but Iran youth is still struggling for democracy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.