अरे, मारशील की रे अशानं.
By Admin | Updated: August 1, 2014 11:35 IST2014-08-01T11:35:20+5:302014-08-01T11:35:20+5:30
रात्रीचे अकरा वाजले होते. दुपारपासूनच पावसाची रिपरिप चालू होती. निफाडपासून ५-६ कि.मी. वरच रौळस गाव. तसं आडवाटेवरच.

अरे, मारशील की रे अशानं.
रात्रीचे अकरा वाजले होते. दुपारपासूनच पावसाची रिपरिप चालू होती. निफाडपासून ५-६ कि.मी. वरच रौळस गाव. तसं आडवाटेवरच. कृषी कॉलेजच्या सातव्या सत्रासाठी खेडेगावात राहणं जरुरीचं. मित्र घरी गेलेले. त्यामुळे खोलीवर एकटाच. लाईट गेलेले. बाहेर पाहिलं तर पावसाचा जोर वाढलेला. मेणबत्ती विझवली आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो. १५-२0 मिनटं झाले असतील दरवाजावर टकटक. उठलो. पाहिलं तर बाजूच्या झोपडतीला सखाराम. म्हणाला पोराला ताप आलाय. कण्हतोय. डोळेही उघडत नाही. काय करावं? मी म्हटलं चल. झोपडीत गेलो. पोरगं डोळे थिजून पडलेलं. पोराची आई केविलवाण्या नजरेनं ंपाहत बसलेली.
मी म्हटलं दुपारीच दवाखान्यात न्यायला काय झालं होतं तर म्हटला दुपारी चांगला होता. आता अचानक ताप वाढला. मी म्हटलो ऊठ. चल सरपंचाकडं. तशाच पावसात छत्री धरून सरपंचाकडं गेलो. सरपंच कामानिमित्त मुंबईत गेलेले. वहिनी एकट्याच. असाच अर्धा तास गेला. ताप तर वाढत असलेला. घाई नाही केली तर काही अघटित व्हायचं. मी म्हटलं थांब, मी डॉक्टर घेऊन येतो.
खोलीवर गेलो. रात्रीचे बारा वाजलेले. खेडेगावात कुठली रिक्षा? पावसात गाडी काढली. रेनकोट घातला. आभाळ फाटावं तसा पाऊस. खूप शिव्या दिल्या पावसाला. म्हटलं लेका, लोकांना जीवनदान देणारा तू स्वत: मात्र निर्जीवच आहेच की, कधी पडावं. कधी पडू नये याच्याशी तुला काय घेणंदेणं. पण आता थांब. कशाचं काय, तो पडतच होता.
गाडीचा वेग जमेल तितका वाढवत पिटाळली. सर्वत्र अंधार. वेशीबाहेर येताना खड्डा दिसला नाही. गाडी आणि मी दोन्ही जबर आपटलो. सुन्न कळ शरीरातून फिरली. गरम पाणी डोळ्य़ातून पाझरलं. उठलो गाडी उचलली. चालता येत नव्हतं तरीही किक मारून पाहिल्या. गाडी बंद. ५0-६0 किक मारल्या तेव्हा गाडी चालू झाली. या झटापटीत रेनकोट फाटला. सगळं शरीर पावसाच्या अधीन झालं. पावसाचा जोर वाढतच होता.
निघालो. वाटेत कादवा नदी आडवी. फरशी वरून पाणी वेगानं वाहत होतं. अशात गाडी नेऊ नये ही ताकीद माहीत असूनसुद्धा गाडी टाकली. पूल कसाबसा पार केला. निफाड गाठलं. डॉक्टरची पाटी दिसली. उठवलं. परिस्थिती सांगितली. खूप गयावया केल्या. डॉक्टर तयार झाले. डॉक्टर रेनकोट घालून. झाकूनझुकून तयार. नदीपाशी आलो तर नदीचं भीषण रूप पाहून डॉक्टर घाबरले. म्हणाले नाही, मी नाही येत. उतरव इथेच. थांब. मी लक्ष दिलं नाही. तसा त्यांचा कलकलाट जास्त वाढला. गाडी थांबवली. त्यांच्याकडं पाहिलं. तासाभरापासून पावसात भिजलो होतो. पायात कुठंतरी फ्रॅक्चर असावी अशी कळ अजूनही शरीरात जाणवत असलेली. गाडीवर थंड वार्याच्या झोतानं अंगातली असलेली नसलेली ऊब निघून गेलेली. डोक्यानंकाम करण्याचं केव्हाच बंद केलेलं. फक्त श्वास चालू असल्याचा भास. अशात डॉक्टरांची कलकल. थोड्यावेळ शांत राहिलो. आणि कसं काय कुणास ठाऊक डॉक्टरांच्या कानात एक ठेवून दिली. म्हटलं, ***** जर आला नाहीस ना तर याच पाण्यात ढकलून देईन. काहीच समजत नव्हतं. फक्त डोळ्य़ासमोर सखाचा हातपाय वाकडा केलेला पोरगा दिसता होता. डॉक्टर नाईलाजानं बसले. नदी पार केली.
झोपडीपाशी आलो. सखा खिन्न हसला. काळजात धस्स झालं. म्हटलं काय झालं? पण पोराचा हात हालत होता.
डॉक्टरांनी सलाईन लावली. इंजेक्शन दिलं. अर्धा तासात ताप कमी झाला. पोरगा शुद्धीवर आला. डॉक्टर बसल्या बसल्या पेंगत होते. तिथेच खाटेवर त्यांची सोय लावून दिली. रूमवर आलो. दरवाजा उघडला. आणि धाडकन खाली कोसळलो. जाग आली तेव्हा दुसर्या दिवशी दुपारचे दोन वाजले होते. सखाच्या पोराला बरं वाटत असल्याचं कानावर येत होतं. पाहिलं तर मलाच सलाईन सुरू असल्याचं जाणवलं. पण तेवढंच, परत शुद्ध हरपली माझी.!
- पराग विश्वासराव बिर्हाडे
ढाकेवाडी, जळगाव