गो. गेट द जॉब
By Admin | Updated: November 6, 2014 16:47 IST2014-11-06T16:47:32+5:302014-11-06T16:47:32+5:30
‘मॅनेजर’ची नोकरी पाहिजे,हव्या असलेल्या पॅकेजपेक्षा एक रुपया कमी घेणार नाही, नोकर्या काय छप्पन मिळतील. - असा विचार करत असाल तर ‘बेकार’ होण्याची पाळी येईल.

गो. गेट द जॉब
>डिग्री हातात पडताच, काम शोधा, नाहीतर.?
‘‘बेटा, पुढच्या महिन्यात तुझी एम.बी.ए.ची डीग्री हातात पडेल, त्यानंतर काय? कोठे प्रयत्न वगैरे सुरू केलेत ना?’’
-मुलाच्या करिअरच्या बाबतीत सजग असणार्या बापाने मुलाला प्रश्न विचारला. डिग्री घेतल्यानंतर वरमाला घेऊन उभ्या असणार्या राजकन्येप्रमाणे नोकरीही आपल्या पायाशी येईल असं समजणार्या नव्या जमान्याच्या, आधुनिक गूगल नॉलेजवर (जीके) पोसलेल्या, स्टार जनरेशनच्या तरुणाने अंग घुसळत आणि खांद्याची विचित्र हालचाल करत उत्तर दिलं, ‘‘येस डॅडी, व्हाय नॉट, आय नो आय विल डेफीनेटली गेट द जॉब!’’
या उत्तराने वडिलांच्या कपाळावर सूक्ष्म आठी पडली.
‘‘यू नो डॅड, नेक्स्ट मंथ, वुई वील हॅव कॅम्पस, अँण्ड आय विल डेफीनेटली गेट द जॉब’’
‘‘बाळा, ते ठीक आहे, पण आताच्या स्पर्धेच्या जगात तुला नोकरी मिळण्याचे चान्सेस किती आहेत? वडिलांनी विचारले.
‘‘सेन्ट परसेन्ट डॅड, गुड जॉब विथ गुड पॅकेज,’’ मुलगा उत्तरला. ‘‘मीन्स युवर इंटेन्शन इज नॉट टू गेट द जॉब इन फ्युचर, म्हणजे थोडक्यात काय आपल्याला काहीही नोकरी मिळण्याची शक्यता नाही असंच ना.’ वडिलांनी त्याच्याच भाषेत तिरकस मुलाला उत्तर दिलं.
वरील किस्सा अगदी खरा आहे. वडील मुलाला टोमणे मारताहेत असं वाटेल तुम्हाला, पण तसं नाही. एखादी प्रोफेशनल डीग्री घेतल्यानंतर नोकर्या खूप स्वस्त आहेत आणि मोठय़ा हुद्दय़ाच्या पगाराच्या नोकर्या आपली वाट बघत आहे असं हल्ली अनेक विद्यार्थ्यांना वाटतं. पण ‘‘मागणी तसा पुरवठा’’ या तत्त्वाप्रमाणे कॉलेजेस तयार झालीत, विद्यार्थी नाहीत.
बर्याचदा मुलाखतीच्या वेळेस विद्यार्थ्यांची / उमेदवारांची अशीच विचित्र मानसिकता जाणवत राहते. करिअर आणि पॅकेजच्या अवास्तव अपेक्षेमुळे बरीच मुले सिलेक्ट होत नाहीत.
खरंतर सुरुवातीला कामाचा अनुभव घेण्यासाठी योग्य त्या पॅकेजची कोणतीही ऑफर स्वीकारायला हरकत नाही. संधी ही चोरपावलांनी येते असं म्हणतात आणि बेरोजगार राहण्यापेक्षा काही दिवस अनुभव मिळविण्यासाठी कोणतीही संस्था वाईट नसते. मात्र स्वत:च्या कुवतीचा विचार न करता, स्वत:बद्दलची भूमिका तयार करणं शेवटी निराशाच देऊ शकतं.
नोकरीबद्दलचा चॉईस असायला हरकत नाही, पण जेव्हा चॉईस नसतो, तेव्हा वेळ घालवण्यापेक्षा उपलब्ध नोकरीनेही यशाचे दरवाजे उघडू शकतात. नोकरीच्या संधी असूनही मला अशीच नोकरी मिळाली पाहिजे, एवढय़ाच पगाराची नोकरी पाहिजे, हीच कंपनी पाहिजे हा अतिचोखंदळपणाही हल्ली तरुणांमध्ये बेरोजगारी वाढवत आहे.
मनासारख्या मृगजळाच्या मागे धावताना शेवटी मग अनेकजण थकतात. वर्षे निघून गेल्यावर त्यांचे ज्युनियर्स मार्केटमध्ये येतात, मग नाईलाजाने कोणतीही नोकरी पत्करावी लागते. एकेकाळी मॅनेजर, जनरल मॅनेजरसारख्या पदाची स्वप्ने बघत होतो, आता, साध्या ऑफिसबॉयच्या पदासाठीही अर्ज करण्याची तयारी आहे असं एक एमबीए झालेला उमेदवार मला निराश होऊन सांगत होता.
आयएएस, आयपीएससारख्या परीक्षा देता देता अनेकांचं अर्ध आयुष्य निघून जातं. मात्र तरीही ते हाताला काम शोधत नाहीत. तिथंच थांबून राहतात.
लक्षात ठेवा, वेळ कोणासाठीही थांबत नाही त्यामुळे डीग्री हातात पडल्यापडल्या काहीतरी करणे गरजेचे आहे.
कामाला लागा.
- विनोद बिडवाईक