फ्रस्ट्रेशन? टोटल गायब!

By Admin | Updated: September 18, 2014 19:47 IST2014-09-18T19:47:09+5:302014-09-18T19:47:09+5:30

सकाळी कॉलेजला जायला निघायचं तर घरातच उशीर होतो. कारण आपण उशिरा उठलेलो असतो, मग बस चुकते, धावतपळत पोहचावं तर सर लेक्चरला वर्गात घेतच नाहीत, कलकल होते.

Frustration? Total missing! | फ्रस्ट्रेशन? टोटल गायब!

फ्रस्ट्रेशन? टोटल गायब!

>सकाळी कॉलेजला जायला निघायचं तर घरातच उशीर होतो. कारण आपण उशिरा उठलेलो असतो, मग बस चुकते, धावतपळत पोहचावं तर सर लेक्चरला वर्गात घेतच नाहीत, कलकल होते. कॉलेजच्या ऑफिसात कामासाठी जावं तर तिथला माणूस जागेवर सापडत नाही, मित्र अचानक अभ्यास करायला येणार नाही असं कळवतो. पाऊस रीपरीप करतो. आपण छत्रीच आणलेली नसते. आणि असं बरच काही हे  एका पाठोपाठ एक त्याच एका दिवशी घडतं जातं. एकही गोष्ट धड होत नाही, सुरळीत होत नाही..
एखादा दिवस असा उजाडतो की, एकही अगदी एकही काम आपल्या मनासारखं होत नाही आणि मग त्या चिडचिडलेल्या, उद्विग्न  अवस्थेत आपण म्हणतो, हे सगळंच फ्रस्ट्रेटिंग आहे. टोटल फ्रस्ट्रेटिंग आहे. 
फ्रस्ट्रेशन जगात असताच कामा नये असं कितीही वाटलं तरी तसं जग अस्तित्वात नाही हेच खरं! कधी माणसं, कधी परिस्थिती तर कधी आपण स्वत:च स्वत:ला नाउमेद करत राहतो. त्यामुळे अशा अवस्थेत जगायचं तर  सर्व फ्रस्ट्रेशन्ससह जगायची तयारी करायला हवी.
ती कशी करणार? त्यासाठी आपण आपला दृष्टिकोन नीट तयार करायला हवा.
तो कसा करायचा?
आपल्या आयुष्यात रोज सर्व गोष्टी आपल्या मनासारख्याच घडायला हव्या आहेत हा हट्ट अनेक अडथळे निर्माण करतो. खरंतर ही अपेक्षा अवाजवी आहे, आपल्या मनासारखं व्हावं असं वाटण्यात काही गैर आहे असं अजिबात नाही. पण त्या अपेक्षेत असणारा आग्रहीपणा, हट्टीपणा मात्र त्रासदायक आहे. म्हणजेच आपल्या विचारांमधले  हट्टी, दुराग्रही सलणारे विचारच फ्रस्ट्रेशनच टोक गाठतात. त्या विचारांनी आपल्याला अजिबात मदत होत नाही. 
मदत कशानं होते?
तर जगाकडून आपणच योग्य अपेक्षा ठेवायला शिकलं पाहिजे. प्रत्येकवेळी गोष्टी माझ्या मनासारख्या घडणार नाहीत याचं भान स्वत:त जागं करणं महत्त्वाचं, ते भान कायम ठेवण्याचं स्कील शिकता आलं पाहिजे.
ते कसं जमेल?
फ्रस्ट्रेशन कशामुळे येतं आणि त्यातल्या आपल्या नियंत्रणात असणार्‍या गोष्टी कोणत्या आणि आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी कोणत्या याचं वर्गिकरणं करणं शिकायला पाहिजे. फ्रस्ट्रेशन ते वर्गिकरण करायला खरंतर शिकवते.  ते शिकलं आणि त्याचा आपण उपयोग करून घेतला तर अनेक गोष्टीतलं फ्रस्ट्रेशन टाळता येऊ शकतं. आपल्या नियंत्रणात असणार्‍या गोष्टींचा वापर करून समस्येतून मार्ग काढू शकतो. 
काहीच करता येत नाही, परिस्थिती आवाक्यात नाही असं वाटून घेण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे, आपण किमान तेवढं तरी करूच शकतो ही भावना जास्त दिलासा आणि उमेद देणारी असते.
मागचंच एक उदाहरण घ्या. सीए करणार्‍या सनयचं.  सनयने सीए करत असतानाच र्जमन भाषेचाही क्लास लावला होता. सीएचा हा पण अँटेम्प्ट हुकला, पण नेहमीसारखी चिडचिड करत फ्रस्ट्रेट न होता त्यानं काही गोष्टी करायचं ठरवलं. त्याच्या कण्ट्रोलमधे काय काय आहे याची यादीच केली.
१) पुन्हा एकदा अभ्यास करून पुढचा अँटेम्प्ट देणं.  
२) एवढा अभ्यास करून आपण कुठे कमी पडतोय याची एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीसोबत चर्चा करणं. 
३) र्जमन भाषेची पुढची  लेव्हल जॉईन करणं.
४) उमेद न सोडणं 
५) स्वत:च्या मानसिक स्वास्थ्याची, भावनिक स्वास्थ्याची काळजी घेणं. त्यासाठी रोज व्यायाम करणं, समुपदेशनाला जाणं. 
६) स्वत:च्या क्षमतांवर विश्‍वास ठेवणं. 
सगळं संपलं असा हिरमोड झालेल्या सनयनला हे एवढं आपण करूच शकतो असं लक्षात आल्यानं एकदम हुरूप आला. पॉझिटिव्हली तो पुन्हा अभ्यासाला लागला.
म्हणजेच समोर आलेल्या नाऊमेद करणार्‍या परिस्थितीला आपण योग्य दृष्टिकोन ठेवून सामोरे गेलो तर त्याचा निश्‍चितच खूप उपयोग होऊ शकतो. मुख्यत: यामध्ये आपण आपला पेशन्सही वाढतो.  
मात्र हे असं पॉझिटिव्हली न घेता आपण मी फार फ्रस्ट्रेट झालोय म्हणून खचून गेलो तर मात्र  कोणत्याही गोष्टीत या फ्रस्ट्रेशनचाच अडथळा निर्माण व्हायला लागतो. आपल्या विकासाच्या वाटेवर त्यामुळे गाडं अडतं आणि आपणच आपल्या वाटेत अडथळे तयार करतो. 
त्यामुळे फ्रस्ट्रेट झालो म्हणून रडत बसू नका. आपल्या कण्ट्रोलमधे काय आहे याचा विचार करा आणि जे करणं शक्य आहे ते तातडीनं कराच!
- संज्योत देशपांडे

Web Title: Frustration? Total missing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.