friends-hardwork & cafe- a story of small town man | मित्रांच्या साथीने कष्टांच्या भांडवलावर त्यानं सुरु केला स्वत:चा कॅफे!
मित्रांच्या साथीने कष्टांच्या भांडवलावर त्यानं सुरु केला स्वत:चा कॅफे!

ठळक मुद्देपैसा तर कमावतोय; पण त्याहून मोठी कमाई आहे ती स्वप्न पाहण्याची हिंमत. तिला मोल नाही!

     अल्ताफ शेख/ मिनाज लाटकर

 मी अल्ताफ. माझं वय 26 वर्ष. मी ज्या वर्गातून येतो तिथं कुणी मोठं होण्याची स्वप्नपण बघू शकत नाही. कारण स्वप्न पाहण्यासाठीचा पण वेळ नसतो. आपण काही करू शकतो यावर विश्वाससुद्धा नसतो. जशी परिस्थिती असते तसा रोज मार्ग काढत जगावं लागतं. माझे बाबा केळीची गाडी काढायचे आणि आई शिवणकाम करते. परिस्थिती हलाखीची कसंतरी दहावीर्पयतचं शिक्षण पूर्ण करून मी किराणा मालच्या दुकानात काम करत होतो. महिना 1200 रु पये पगार होता. 
पुढं कुठं शंभर दोनशे रु पये जरी ज्यादाचे मिळाले तरी काम बदलत मी माझं पदवीर्पयतचं शिक्षण पूर्ण केलं. अकाउण्टंट म्हणून काम करू लागलो. तिथं तीन हजार रुपये पगार मिळत होता. सतत वाटायचं आपणच आपली परिस्थिती बदलू शकतो; पण कशी बदलायची हे काही कळत नव्हतं. कोल्हापूरसारख्या छोटय़ा शहरात अशा नोकर्‍या आयुष्यभर केल्या तरी काही उपयोग नाही हे सतत जाणवत होतं. मात्र मोठय़ा शहरात जाण्याची परिस्थिती आणि हिंमत या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. अकाउण्टंट म्हणून काम करताना लक्षात येतं होतं व्यापार केला की आपण चांगला नफा मिळवू शकतो. मात्र हातगाडी काढणं, किराणा दुकान किंवा चहाची टपरी याशिवाय आपण दुसरा कोणता व्यवसाय करू शकतो याचा मी विचारपण करत नव्हतो. पण कॉलेजात शिकत असताना आम्ही काही मित्न व्यवसायाच्या अशाच कल्पना करायचो. आपला एक स्वतर्‍चा ब्रॅँड असावा असं काहीतरी करावं असं वाटे. पण या फक्त कल्पनाच होत्या. 


मी माझ्या नोकरीत खुश नव्हतो. मला माझं स्वतर्‍च काहीतरी करायचं होतं. मनात सतत वाटायचं की आपण जेवणाच्या संबंधितच काहीतरी करावं. कारण माणसांची जी काही धडपड सुरू असते ती दोनवेळच्या जेवणासाठीच. मात्र लगेच हॉटेल सुरू करणं मला शक्य नव्हत. कर्ज काढणं, बचत करणं याचा कधीच विचारही केला नव्हता. कारण जेवढं कमवायचो तेवढं खर्च व्हायचं असच आजर्पयत जगत आलो होतो.
 नोकरीत आयुष्य काढायचं नाही म्हणून माझी सतत खडपड सुरू होती. त्यातून काही लोकांच्या ओळखीही झाल्या होत्या. एखादा  व्यवसाय सुरू तर करून बघू असं सतत वाटत होतं; पण यासाठी आर्थिक, मानसिक पाठिंबा लागतो. तो घरून मिळण्याची काहीच शक्यता नव्हती. मी  व्यवसाय सुरू कसा होणार या विचारात  असताना राजीव निगवेकर हा माझा कॉलेजचा मित्न सोबत होता. आम्ही शिकत असताना पुढं आयुष्यात काय करायचं याबाबत सतत चर्चा करायचो. यातूनच एक कॅफे हाउस सुरू करू अशी कल्पना सुचली होती. तीच कल्पना प्रत्यक्षात आणू असा मी विचार केला. राजीवशी याविषयी चर्चा केल्यावर यासाठी लागणारं सर्व भांडवल उभं करायची तयारी राजीवने व त्याच्या बाबांनी दाखवली.  आनंद खोंदल हा मित्र आम्हा दोघांना मानसिक आधार देत आमच्या सोबत खंबीरपणे उभा राहिला. माझ्या या मित्नांनी मला मोलाची साथ दिली. कारण फक्त कल्पना असून उपयोग नसतो, ती प्रत्यक्षात राबविण्यासाठी पैसा हा खूप महत्त्वाचा असतो आणि तोच माझ्यासारख्या मुलाला सहज उपलब्ध होणं फार कठीण असतं.
माझ्या या मित्नाने माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवला व यातूनचं कोल्हापुरात राजारामपुरीत 2015 साली ‘द रीच कॅफे’ या नावाने छोटं कॅफे हाउस सुरू केलं. सुरुवातीला खूप भीती वाटतं होती, कारण जर व्यवसाय चालला नाही तर त्याचं कर्ज फेडण्यात पुढंच आयुष्य जाणार होतं. त्यात मी मोठा मुलगा असल्याने भावाच्या शिक्षणाची, घरची जबाबदारीही माझ्यावर होती. आई सतत घाबरायची कर्ज काढलं, ते फेडता आलं नाही तर? त्यात सुरुवातीला काही महिने काही विक्र ीच होत नव्हती. त्यामुळे मी नोकरी करत करत कॅफे चालवायचो. तेव्हाही माझ्या मित्नांनी मला खूप मदत केली. 
सुरुवातीला आम्ही पदार्थ बनवण्यासाठी कूक ठेवला होता. नंतर त्याचा पगार देणं परवडत नव्हतं. त्यामुळे पिझा, बर्गर, सॅडविच, कॉफी कशी बनवायची हे सगळं स्वतर्‍ शिकून घेतलं. कॅफेमध्ये सर्व करण्यापासून ते सगळी कामं मी करत होतो. हळूहळू ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कर्जही फेडलं आणि नफाही मिळू लागला. त्यामुळे लगेच दोन वर्षात दुसरा कॅफे सुरू केला तिथंही उत्तम प्रतिसाद मिळाला. मी ज्या परिसरात हा कॅफे चालवतो त्या भागात कॉलेजेस आहेत. त्या कॉलेजमध्ये मोठय़ा प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी आले आहेत. कॅफेमध्ये अनेक विद्याथ्र्याची  ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून लक्षात आले की मेसमध्ये त्यांना चांगल्या प्रतीचं जेवण उपलब्ध होत नाही. पैसे खर्च होतात पण  अनेक विद्याथ्र्याच्या आरोग्याच्या तक्र ारी होत्या. मला कमी दरात उत्तम जेवण उपलब्ध करून देण्याची संधी होती. त्यातून मग मी विद्याथ्र्यासाठी खानावळ सुरू करायची ठरवलं; पण मग पुन्हा तेच भांडवलाची कमी. मात्र यावेळी माझं कुटुंब माझ्या सोबत होतं. आई, आजी मला मदत करायला पुढं आल्या. मित्नांकडून पैसे उधार घेतले आणि खानावळ सुरू केली. घरगुती पद्धतीचं जेवण अत्यंत कमी दरात मी विद्याथ्र्याना देऊ लागलो. आता खानावळ सुरू करून काही महिनेच झाले आहेत. आई आणि आजीच जेवण बनवून देतात. त्यांची या कामात मोठी मदत झाली आहे. 
आता या माझ्या सर्व व्यवसायातून मी अनेक लोकांच्या सहवासात आलो. यातूनच माणसं ओळखू लागलो. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मीसुद्धा मोठं होण्याची, काहीतरी नवीन उभं करण्याची स्वप्नं बघू लागलो आहे. व्यवसाय, पैसे याही पेक्षा महत्त्वाचं माझ्यासाठी हेच आहे की मोठी स्वप्नं बघणं आणि आपण काहीतरी करू  शकतो असा स्वतर्‍वर विश्वास निर्माण करणं. या सर्व प्रवासात माझ्या मित्रांनी फार साथ दिली. राजीव निगवेकर, आनंद खोंदल या मित्नांनी माझ्या स्वप्नांना बळ दिलं आणि त्यानंतर माझे कुटुंबीय, ज्यांना वाटतंय आपला मुलगा काहीतरी करू शकतो. 
हा प्रवास इतका सहज घडला नाहीये. अजूनही खूप वेगवेगळ्या पातळींवर मतभेद, नुकसान, आर्थिक, सामाजिक अडचणींचा सामना करतच काम करतोय. पुढं या व्यवसायाचं काय होईल हेपण मी आज ठामपणे सांगू शकत नाही; पण या व्यवसायाने मला फक्त पैसे, प्रतिष्ठा दिली नाही, तर माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील मुलाला एक आत्मविश्वासाने, सन्मानाने माणूस म्हणून जगण्याची दिशा दिली आहे. त्यामुळे मी नवीन काहीतरी उभं करू शकतो यावर मला पूर्ण विश्वास वाटतो. 


 


Web Title: friends-hardwork & cafe- a story of small town man
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.