Freedom to be fearless! what it means to study in JNU | निर्भय रहने की आजादी! अशी काय जादू असते जेएनयूच्या हवेत?

निर्भय रहने की आजादी! अशी काय जादू असते जेएनयूच्या हवेत?

ठळक मुद्देकाय जादू असते जेएनयूच्या हवेत? - या कोडय़ाचं उत्तर उलगडताना मी स्वत: अनुभवते आहे!

राही श्रु ग

‘मिल बहने लेंगी आजादी,  मिल बच्चियां लेंगी आजादी!’ 
तुरुंगातून सुटल्यावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात झालेल्या कन्हैया कुमारच्या ऐतिहासिक भाषणानंतर गाजलेली आणि नंतर देशभरात जिचे पडसाद उमटत गेले ती ‘आजादी’ ही घोषणा मुळात जन्मली ती कमला भसीन या ज्येष्ठ स्रीवादी कार्यकर्तीच्या याच नावाच्या कवितेतून. ‘मनुवाद आणि पुंजीवादा’पासून हरप्रकारच्या बंधनांपासून स्वातंत्र्य मिळवण्याची मागणी करणारी ही घोषणा पितृसत्तेच्या विरोधातल्या लढय़ाच्या निर्धारातून जन्मलेली आहे, याहून अधिक अर्थपूर्ण काय असू शकतं?
मूळ कवितेत हिंसाचार आणि बलात्कारापासूनच्या ‘आजादी’ची मागणी करतानाच भसीन म्हणतात,
‘हम मौन से लेंगे आजादी
आने जाने की हो आजादी
हंसने गाने की हो आजादी
सब कुछ कहने की आजादी
निर्भय रहने की आजादी’
आज देशातल्या शहरा-शहरातल्या लहान मुलींपासून म्हातार्‍या बायकांर्पयत स्रियांचा आवाज शोषणापासून, युद्धापासून, हिंसेपासून आणि हुकूमशाही शासनापासून ‘आजादी’ची मागणी करत असतो, तेव्हा रस्त्यावर एक उत्सव साजरा होत असतो! रात्र जिंकणार्‍या, शहर कवेत घेणार्‍या मुली-बायका ही आजादीच तर साजरी करत असतात!
आज देशातली मोठी विद्यापीठं चर्चेचा विषय झाली आहेत. सत्ताधारी पक्षाने आपला ‘आवडता शत्रूू’ म्हणून जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारख्या केंद्रीय शिक्षण संस्थांना निवडलं आहे. देशातल्या आर्थिक आणि इतर प्रश्नांना उत्तरं देणं कठीण झालं की जेएनयूसारख्या विद्यापीठाभोवती राजकारण करत राहणं सरकारला सवयीचं झालं आहे. मात्र या सगळ्या राजकारणामध्ये, टीव्हीवर आणि समाजमाध्यमांवरून जगाला पहिल्यांदाच या केंद्रीय विद्यापीठांचं अंतरंग दिसतं आहे. शिक्षणाचं, विचारकलहाचं मुक्त वातावरण पाहता येतं आहे. मुख्य म्हणजे इथल्या ‘आजाद’ विद्यार्थिनींची निर्भय अभिव्यक्ती दिसते आहे.
अशी काय जादू असते सार्वजनिक विद्यापीठाच्या हवेत की इथल्या विद्यार्थिनी मान खाली घालून शांत दिवस ढकलण्याऐवजी मुक्त, स्वतंत्र काम करतात, नव्या ज्ञानाची निर्मिती करतात आणि  प्रसंगी त्यांची विद्यापीठं वाचवण्यासाठी लढय़ाचं नेतृत्वसुद्धा करतात? 


 

मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेले तेव्हा इथल्या दिवसागणिक या कोडय़ाचं उत्तर उलगडू लागलं. विद्यापीठाची कठीण प्रवेश परीक्षा पास होऊन प्रवेश घेण्यासाठी माझ्यासोबत रांगेत उभ्या असलेल्या मुली देशाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यातून आलेल्या होत्या. कोणी आई, वडील, भावंडं किंवा नातेवाइकांबरोबर आलं होतं, तर काही ठिकाणी एका तालुक्यातून मुला-मुलींचे गट एकमेकांच्या सोबत आले होते. अगदी विद्यापीठाच्या मुख्य दारापाशीच मला एक सीनिअर मुलगी भेटली. तिला फक्त रस्ता विचारला, तर माझी पूर्ण प्रवेशप्रक्रि या होईर्पयत तिने माझी सोबत केली. प्रवेशासाठीची सगळी मदत, जेवण- राहाणं याची आस्थेने चौकशी करणारी ही माझी जेएनयूची पहिली विद्यार्थिनी मैत्रीण म्हणजे रॅगिंग वगैरे किस्से ऐकलेल्या माझ्यासाठी मोठाच धक्का होता. ही मदत करणारी सीनिअर एकटी नव्हती. प्रवेशासाठी आम्ही रांगेत थांबलेले असताना असं दिसलं की कितीतरी सीनिअर विद्यार्थी नव्या विद्याथ्यार्ंना मदत करण्यासाठी दिवसभर आवर्जून वेळ काढून आलेले आहेत. सगळीकडे ‘दादागिरी करण्यासाठी मिळालेले नवे बकरे’ म्हणून ज्युनिअर विद्याथ्र्याकडे पाहिलं जात असताना जेएनयूने मात्र आपल्या कुटुंबातले नवे सदस्य म्हणून प्रेमाने आणि आपुलकीने केलेली सोबत आमच्या कायम लक्षात राहील. ही सोबत म्हणजे दिवसाच्या आणि रात्रीच्या कोणत्याही प्रहरी बिनदिक्कत एकमेकांसोबत केलेल्या अभ्यास, गप्पा, चर्चा आणि वादविवादातून फुलणार्‍या मैत्रीची ही केवळ सुरुवात होती.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचं वैशिष्टय़ म्हणजे इथे सर्व विद्याथ्र्याना माहितीचे साठे निर्जीवपणे पुन्हा पुन्हा मांडत राहणारा कळप म्हणून नाही, तर ज्ञानाची निर्मिती करणारी स्वतंत्र माणसं म्हणून पाहिलं जातं. स्री आणि पुरु ष, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी म्हणून असलेल्या समान संधींची पूर्तता करण्यासाठी विद्यापीठ कायम तत्पर असतं. विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत ‘डिप्रायव्हेशन पॉइंट’     (वंचिततेचे निर्देशक) नावाची व्यवस्था वापरली जाते. आरक्षणाच्या योजनेबरोबरच या व्यवस्थेनुसार दुष्काळग्रस्त व ‘अविकसित’ जिल्ह्यांतून येणार्‍या विद्याथ्र्याना आणि सर्व विद्यार्थिनींना प्रवेश परीक्षेमध्ये ठरावीक मार्कजास्तीचे दिले जातात. जात, लिंग, वर्ग आणि भौगोलिक प्रदेशामुळे आपल्यावर लादल्या गेलेल्या वंचिततेच्या विविध उतरंडीचा अभ्यास करून आकडेवारीनुसार शिक्षणतज्ज्ञांनी जेएनयूमध्ये ही व्यवस्था अंमलात आणली.  त्यामुळेच एकूण विद्यार्थी संख्येत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थिनी असलेलं जेएनयू हे देशातलं एकमेव विद्यापीठ आहे.
मुळात या विद्यापीठाच्या वातावरणातच लिंगभावाच्या दीर्घ अभ्यासातून आलेली एक स्वच्छ परिपक्व नजर आहे. ‘तू मुलगी आहेस म्हणून अमुक गोष्ट करू शकत नाहीस’ अशा प्रकारची वाक्य बोलायला इथे कोणीही धजावत नाही. भेदभावाच्या लहानातल्या लहान प्रसंगातही जेएनयूमधले शिक्षक आणि विद्यार्थी पेटून उठतात आणि संघटितपणे उत्तर शोधू पाहतात. स्रियांना अन्यायकारक वागणूक मिळणं हा आपला अपमान आहे, असं इथले सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मानतात. देशातला पहिला ‘जेंडर सेन्सिटायझेशन सेल अगेन्स्ट सेक्शुअल हॅरॅसमेंट- जीएसकॅश’ (लैंगिंक हिंसाचाराविरोधातील लिंगभाव शिक्षण कक्ष) हा जेएनयूमध्येच उभा राहिला. विद्यापीठ प्रशासनामध्ये विद्याथ्र्याचा आणि शिक्षकांचा लोकशाहीपूर्ण सहभाग असलेला हा असा कक्ष आहे, जिथे कोणत्याही प्रकारच्या लैंगिंक हिंसाचाराबद्दलच्या तक्र ारी तर नोंदल्या जातातच, मात्र या कक्षाचं काम केवळ तक्र ार निवारणाचं नाही. हिंसाचाराची तक्र ार करणारे आणि आरोपी अशा दोन्ही प्रकारच्या विद्याथ्र्याना इथे समुपदेशन मिळतं. याशिवाय सर्वच विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी वारंवार लिंगभावावरच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. लैंगिंक छळावरचं उत्तर ‘शिक्षा’ नाही तर समानतेचं ‘शिक्षण’ आहे, हे या विद्यापीठाने ओळखलेलं आहे.
 आणि म्हणूनच राजस्थानच्या खेडय़ातल्या शेतकरी कुटुंबातून आलेली माझी रूममेट मध्यरात्री तीन वाजताही विद्यापीठाच्या वाचनालयापासून होस्टेलर्पयतचा दोन किलोमीटरचा रस्ता गाणी ऐकत बिनधास्त पार करते. परीक्षेच्या काळात पूर्ण वर्ग रात्रभर सुरू असलेल्या कॅन्टिनमध्ये बसून गंभीरपणे एकत्र अभ्यास करतो. एम.ए.च्या पहिल्या वर्गातली मुलगी पीएच.डी. स्कॉलरसोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारता मारता चर्चेचा वाद होतो आणि समोरचा पीएच.डी. स्कॉलरही तिचे मुद्दे पटले तर ते मान्य करून पुन्हा विचार करण्यासाठी वेळ मागतो. गावा- शहरातून, दिब्रुगढ ते दिल्ली आणि रांची ते कोची अशा सगळ्या भागातून आलेल्या मुलींसाठी त्यांच्या खांद्यावरची ओढणी त्यांना घुसमटवून टाकत नाही. त्या ओढणीत वारं शिरतं आणि तिचा हवेवर लहरणारा ‘आजाद’ झेंडा देशा-परदेशातल्या क्षितिजांवर फडकत राहातो. 
.. हे काल्पनिक चित्र नाही, हा युटोपिया नाही, सार्वजनिक विद्यापीठाचं हे उघडय़ा डोळ्यांनी पाहिलेलं खरंखुरं स्वप्न आहे! 

 

Web Title: Freedom to be fearless! what it means to study in JNU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.