चवीढवींचा ग्लोबल ट्रायआउट!

By Admin | Updated: June 30, 2016 16:28 IST2016-06-30T16:28:39+5:302016-06-30T16:28:39+5:30

वडापाव, भजीपाव, पाणीपुरी खाल्ली की, काहीतरी मोठ्ठं केल्याचं समाधान मिळायचं ते कॉलेजचे दिवस कधीच सरले. डोसे, इडल्या, पंजाबी आलू टिक्क्या, रगडा पॅटिस, हॉट डॉग्ज, अगदी चिजच्या प्रेमात आकंठ बुडालेला पिझ्झा आणि बर्गर हाणण्याचा ट्रेण्डही आता तसा जुनाच झाला आहे. आता अनेकांच्या जिभेला ग्लोबल टेस्टचे वेध लागलेत.

Fourth Triple Global Trilogy! | चवीढवींचा ग्लोबल ट्रायआउट!

चवीढवींचा ग्लोबल ट्रायआउट!

- भक्ती सोमण

विविध देशांचे पदार्थ खाण्याचाच नाही तर समजून घेण्याचा एक नवा ‘तरुण’ ट्रेण्ड.


पावसाळा सुरू झालाय आणि सोबत कॉलेजही.
कॉलेजमध्ये क्लासरूमच्या आधी ज्याची ओळख होते ते म्हणजे कॅण्टिन. जवळची वेगवेगळी हॉटेल्स. खास तरुण मुलांचे अड्डे असलेले सिटआउट्स!
आणि सगळीकडच्या स्पेशल डिश. ज्यांचा बोलबोला सिनिअर्सनं आधीच करून ठेवलेला असतो. त्यामुळे कॉलेज सुरू होताच आधी ते अड्डे गाठून ते पदार्थ खाऊन पहायची लगबग असायची.
आता जग ‘ग्लोबल’ खेडं होतंय. त्यात हाती नेटपॅक मारलेला मोबाइल. जगभरातले खाण्याचे लेटेस्ट ट्रेण्डसही आता तरुण मुलांपर्यंत सहज पोहचतात.
अर्थात खाण्यापिण्याचेही ट्रेण्डस येतात आणि जातात. आणि मग जसं अन्य फॅशन कॉपी केल्या जातात तशा या खाण्यापिण्याच्याही फॅशन्स कॉपी केल्या जातात, पसरवल्याही जातात.
एक काळ असा होता की वडापाव, भजीपाव, पाणीपुरी खाल्ली की काहीतरी मोठ्ठं केल्याचं समाधान मिळायचं. पण आता तो काळ केव्हाच मागे सरला. साउथ इंडियन डोसे, इडल्या, पंजाबी आलू टिक्क्या, रगडा पॅटिस, हॉट डॉग्ज, अमुकतमुक रोल्स हे सारंही तसं नेहमीचंच झालं. अगदी चिजच्या प्रेमात आकंठ बुडून पिझ्झा रवंथ करण्याचा आणि बर्गर हाणण्याचा ट्रेण्डही आता जुनाच झाला आहे. 
हॉटेलात जाऊन खायचं आणि मुख्य म्हणजे ‘ट्राय’ करून पहायचं तर काही खास, वेगळं ‘टेस्ट’ करून पहायला आजच्या तारुण्याला आवडू लागलंय. मुद्दा काय ज्या प्रकारची एक्सपिरिमेण्ट्स ते त्यांच्या जगण्यात एरव्ही करायला तयार आहेत, तसेच नवे प्रयोग खाण्यापिण्याच्या सवयीतही त्यांना आता करून पहायचे आहे. देश परदेशातले पदार्थ चाखून पहायचे आहे. त्यात सध्या सर्वच मोठ्या आणि छोट्याही शहरांमध्ये देशपरदेशातले पदार्थ मिळणारी हॉटेल्स सुरू होत आहेत.
आणि तिथं जाऊन हे सारं खाऊन पाहणाऱ्या तारुण्याची संख्याही वाढताना दिसते आहे.

दक्षिण पूर्व आशियाई 
सध्या तरुणाईची आवड काय? किंवा त्यांना काय ट्राय आउट करून पहायला आवडतं असं विचारलं तर कळतं की 'साउथ इस्ट एशियन क्युझिन'कडे म्हणजे थाई, आॅथेंटिक चायनिज (आपल्या सवयीचं चायनीज नाही), मंगोलियन, सॅलेड्सचे भरपूर प्रकार हे सारं अनेक तरुण मुलांना खायला आवडतं. त्यातही थाई फूडचं अनेकांना आकर्षण दिसतं.
मेक्सिकन ते मिडल इस्ट
विविध पद्धतीने मिळणारं ग्रीक फूड याशिवाय मेक्सिकन फूड हा आणखी एक आकर्षणाचा मुद्दा. स्ट्रीट फूड म्हणून हमस-पिटा, पास्ता, फलाफल, रॅप्स आणि रोल, श्वार्मा असे मिडल इस्ट पदार्थ तरुण मुलं खाऊन पाहत आहे. या ग्लोबलाइज्ड खाण्याचा सध्याचा ट्रेण्ड पाहता मॉलपासून ते अगदी छोट्या-मोठ्या गल्ल्यांमध्ये, महत्त्वाच्या रस्त्यांवर अशा प्रकारची चोचले पुरवणी चांगली हॉटेल्स निघत आहेत.

स्मुदी 
कॉफी प्यायला येतेस, हा कॉलेजच्या काळातला फेमस डायलॉग. त्यात कोल्ड कॉफी, विविध प्रकारच्या बड्या कॉफी शॉप्समध्ये मिळणाऱ्या कॉफी यांचं आकर्षण तर गेले काही काळ आहेच. पण सध्या कॉफी पिण्याचं ते आकर्षण बरंच कमी झालेलं दिसत असून त्याऐवजी विविध फ्लेवर्सच्या ‘स्मुदी’ म्हणून पिण्याचं फॅडही मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. जेवण टाळून पोट भरण्याचा उत्तम पर्याय म्हणून तरुण जगात सध्या हे स्मुदी हीट आहे. यात विविध फ्लेवर्स तर बघायला मिळतातच पण दूध, फळं, क्रीम भरपूर प्रमाणात असल्यानं ते पिऊन पोटही भरते. 
हायजिन महत्त्वाचं !
हा आणखी एक महत्त्वाचा बदल. एरव्ही कॉलेज गॅँग भेटण्याचे अड्डे कळकट असले तरी मुलांना काही वाटत नसे. कळकट-मळकट जागी मिसळ खायला जाणारे ग्रुप्स तर अनेक. पण आता मात्र एक नवी नजर यासाऱ्याकडे आलेली दिसते. एवढे सगळे जगभरातले पदार्थ चाखून पहायला ही तरुण मुलं तयार आहेत. पण आरोग्याच्या दृष्टीने तो पदार्थ चांगला आहे का याकडेही अनेकांचं अगदी बारीक लक्ष असते. हॉटेलमध्ये असणारी स्वच्छता, टापटीपपणा, सर्व्हिस कशी देतात यालाही अनेकांच्या लेखी फार महत्त्व आहे. हेच जाणून घेऊन अनेक हॉटेल्स त्यांच्या मेन्यूकार्डवर हॉटेलच्या स्वच्छतेविषयी माहिती देऊ लागले आहेत. अनेक हॉटेल्सची माहिती, पदार्थांचे रिव्ह्यू इंटरनेटवर वाचूनही काहीजण त्या हॉटेलमध्ये जातात. काही हॉटेल्स तर इंटरनेटवर आपली माहितीच देऊ लागलेत की तिथे उत्तम सुविधा आहेत, स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते, उत्कृष्ट चव आणि अनेकठिकाणी तर फ्री वायफायही देऊ करतात. त्यामुळे तरुणांचा तिथला ओढा वाढतो. 


अ‍ॅप्सचा वापर
चांगली हॉटेल्स शोधण्यासाठी झॉमेटो, जस्ट डायल अशांसारख्या महत्वाच्या अ‍ॅप्सचा वापर तरूणाई प्रामुख्याने करत आहे. जो पदार्थ खायचा आहे त्या संदर्भातली माहिती या अ‍ॅप्सवर अगदी इत्यंभूत मिळते. इतकेच नव्हे तर त्या रेस्टॉरण्टमध्ये जाऊन आल्यावर त्यांची सेवा आणि पदार्थ जर त्यांना आवडले तर त्यांची मतंही त्या त्या साईट्सवर टाकण्याचं कामही अनेकजण करतात. 

शाकाहारी पदार्थांची क्रेझ
आजकाल छोटे-छोटे जॉर्इंट्सही खूप सुरू झाले आहेत. त्यात ४० ते ५० रुपयात बर्गर, रोल्स, पास्ता मिळतात. किंबहुना स्ट्रीट फूड म्हणून या पदार्थांना तरुणाईची मागणी जास्त आहे. हे पदार्थ शाकाहारी असावेत असा कल तरुणाईचा आहे. माझ्या रेस्टॉरण्टमध्ये शाकाहारी पण सहज तयार होतील असे पास्ता, बर्गर, क्यॅसेदिलाज (पोळीमध्ये भाजी वगैरै भरून केलेला मेक्सिकन रोल) हॉट डॉग्ज खायला येणाऱ्यांत तरुण पिढीच जास्त आहे. त्यांना चार छोटे बर्गर एकत्र करून दिलेले 'स्लाइडर्स' जास्त आवडायला लागले आहे, असं मिल बॉक्स कॅफेचे मालक अमेय महाजनी सांगतात. 

उत्तम चव, परिपूर्ण माहिती
‘इंटरनेटच्या वापरामुळे आजच्या तरुणाईमध्ये सजगता आली आहे. त्यामुळे खाण्याचा ट्रेण्डही पटापट बदलतो आहे. स्वच्छतेपासून जेवण, चव अशा विविध बाबींकडे ही तरुणाई अगदी बारकाईने लक्ष देत आहे. त्यांची जेवणाविषयी उत्सुकता वाढली आहे. म्हणूनच हॉटेलांमध्ये आजकाल मेन्यूकार्डवर पदार्थाच्या खाली त्या पदार्थात काय काय प्रकार वापरले आहेत ही माहिती द्यावी लागते,’ असं मेजवानी हॉटेलचे शेफ प्रसाद कुलकर्णी सांगतात.

हे पदार्थ 
आहेत फेमस

हमस- पिटा
फलाफल
श्वार्मा
थाई पदार्थ
चायनिज पदार्थ
ग्रीक सॅलेड्स
मेक्सिकन फूड
पास्ता, सॅण्डविच
सोया, टोफू यांचा वापर असलेले पदार्थ 
हातानी बनवलेले विविध ब्रेड्स

 
(लेखिका लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादिका आहेत.)
bhaktisoman@gmail.com

Web Title: Fourth Triple Global Trilogy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.