गोंयच्या मातीत फुटबॉलचो जोर

By Admin | Updated: June 13, 2014 09:52 IST2014-06-13T09:52:36+5:302014-06-13T09:52:36+5:30

‘सुशेगात’ गोव्यात या, सध्या फुटबॉलच्या ‘फायरी’ प्रेमात सारा ‘तरुण’ गोवा पुरता वेडा आहे.

Football thrust in Goa soil | गोंयच्या मातीत फुटबॉलचो जोर

गोंयच्या मातीत फुटबॉलचो जोर

>
‘ऑक्सिजन’शी गप्पा मारायला जमलेले गोंयकर दोस्त - स्नेडन मेदेरा, मॅक्सन फर्नांडिस, कॅनेथ क्रास्टो, जिझस काल्देरो, जॉन परेरा, आन्सीवा वाझ आणि सॅनिता तावारीस 
 
‘फन, फ्लोरिक  अँण्ड फुटबॉल’ ही सुशेगात गोव्याची पॅशनेट ओळख.
एरवी आपल्याच मस्तीत असणारं गोव्यातलं तारुण्य ‘फुटबॉल’ म्हटलं की कीक बसल्यासारखं उसळतं. त्यात फुटबॉलचा वर्ल्डकप, समुद्राच्या खार्‍या वार्‍यावर स्वार झाल्यासारखी गोवन पोरं आता पुढचा महिनाभर फक्त फुटबॉल जगतील. फुटबॉल खातील आणि फुटबॉलवरच बोलतील. काल सुरू झाला वर्ल्डकप पण फुटबॉलवेड्या गोव्यात मात्र कितीतरी दिवस आधीपासूनच फुटबाल फॅन्सचं जोरदार प्लानिंग सुरू झालं होतं. ख्रिस्तीयानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, नेयमार, फर्नांडो टॉरेस यांच्यावरून भांडणं पेटली त्याला तर किती दिवस सरले. आपलाच फेवरिट यंदा तुफान खेळेल आणि बाकी सार्‍यांची पुरती दाणादाण उडवून देईल याची खात्री प्रत्येकालाच. आयुष्यातून बाकीचे विषय वजाच व्हावेत, असं ही मुलं फुटबॉलविषयी सतत बोलतात. आपापसातही तोच विषय आणि फेसबुक-व्हॉट्स अँपवरही तोच विषय. तेच पागलपण, तोच जोष आणि तोच थरार.गोव्याच्या भाषेत सांगायचं तर फुटबॉलचो जोर नाही तर फुटबॉलचो पिसो.
गोव्यातल्या फुटबॉलवेड्या तारुण्याला फुटबॉल म्हटल्यावर काय होतं, त्यांच्यातलं कुठलं ‘पिसो’ म्हणजेच पागलपण जागं होतं हे बाकी आम दुनियेला कळणं तसं अवघडच आहे.
कारण गोव्याच्या मातीत रुजत आणि गोवन तारुण्याच्या प्रत्येक पिढीसोबत इथला फुटबॉल मोठा होत गेला.‘तरुण’ होत गेला.
कारण फुटबॉल आणि गोवा यांचं नातं फार जुनंय. असं म्हणतात की, उर्वरित भारताला फुटबॉलची ओळखही नव्हती, बाकीच्यांनी ज्यावेळी फुटबॉल पाहिलाही नव्हता त्याकाळी गोव्यात फुटबॉल खेळला जायचा. पोतरुगिजांची सत्ता असलेल्या गोव्यावर म्हैसूरच्या टीपू सुलतानाने आक्रमण करायचं ठरवलं तेव्हाची ही गोष्ट. टीपू सुलतानानं त्यासाठी फ्रेंचांची मदत घेतली. टीपूचा सामना करायचा तर आपल्यालाही मदत हवी म्हणून पोतरुगिजांनी ब्रिटिशांची मदत घेतली. त्याकाळात ब्रिटिशांनी पहिल्यांदा गोव्यात फुटबॉल आणला. फुटबॉल गोव्याच्या मातीत आला आणि कायमचा गोव्याचाच झाला. आणि आज गोव्यात याल तर दिसेल एक अत्यंत जबरी फुटबॉलवेड. केवळ शहरांतच नव्हे तर छोट्या छोट्या गावातही फुटबॉलची चर्चा कानावर पडते. जे फुटबॉल खेळतात ते तर या वर्ल्डकपकडे डोळे लावून बसलेले आहेतच, पण जे खेळत नाहीत पण ज्यांच्या अंगात फुटबॉल संचारतो असेही फुटबॉल पलीकडे काही बोलायलाच तयार नाहीत.
आणि ज्यांना फुटबॉल हेच आपलं करिअर वाटतं, एक दिवस भारतातही फुटबॉल जगभराइतकाच लोकप्रिय होईल आपणही आपला हा भन्नाट खेळ भारतासाठी खेळू, असं स्वप्न पाहणार्‍या जिवांचं काय होतं.?
‘ऑक्सिजन’नं ठरवलं, गोव्याच्या त्या तरुण फुटबॉल प्लेअर्सनाच भेटायचंच.हे ‘फुटबॉल ड्रीम’ ते कसं जगतात, आणि ते स्वप्न त्यांना कसं जगवतं हे समजून घेत जरा मस्त गप्पा मारायच्या त्यांच्याशी. म्हणून मग आम्ही सगळे भेटलो.
दक्षिण गोव्यात मडगावपासून दोन किलोमीटर अंतरावर नावेली नावाचं गाव आहे, त्या गावातल्या रोजरी महाविद्यालयाच्या हिरव्यागार मैदानावर फुटबॉलची मॅच असावी तशा थरार गप्पा जमून आल्या.
फुटबॉलचा नुस्ता विषय निघाला तसं पहिलं वाक्य कानावर पडलं,
‘आय अँम एक्सायटेड! वर्ल्डकपच्या एकेका मॅचची मी डोळ्यात प्राण आणून वाट पाहतोय, वर्ल्डकपमध्ये जी मजा आहे ना, ती दुसर्‍या कशात नाही’.
स्नेडन मेदेरा पटकन म्हणाला. स्नेडन रोजरी उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीत शिकतो.  सध्या भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक असलेले सावियो मेदेरा यांचा हा मुलगा. सावियो मेदेरा यांनी एकेकाळी भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्वही केले आहे. वडिलांकडून प्रेरणा घेत स्नेडन फुटबॉल खेळायला लागला. अलीकडेच झालेल्या ज्युनियर सेकंड डिव्हिजन लीगमध्ये त्यानं यंदाच आवे मारिया संघाचं नेतृत्वही केलं. फुटबॉल हेच आपलं करिअर आणि तेच आपलं पॅशन, असं म्हणणार्‍या स्नेडनसाठी फुटबॉल ही अत्यंत गांभीर्यानं शिकण्याची, सराव करण्याची आणि अत्यंतिक जीव ओतून खेळण्याची गोष्ट आहे.
आम्ही भेटलो तेव्हा स्नेडन आणि त्याच्याबरोबर खेळणारे सगळे सहखेळाडू मित्र अक्षरश: काउण्टडाऊन सुरू असल्यासारखे वर्ल्डकपची वाट पाहत होते. मॅक्सन फर्नांडिस, कॅनेथ क्रास्टो, जिझस काल्देरो, जॉन परेरा हेदेखील स्नेडनसारखेच गोव्यातले युवा फुटबॉलपटू. सगळ्यांच्या डोळ्यात फुटबॉल खेळणं हेच एक स्वप्न. या सगळ्यांच्या नजरेत नुस्तं पाहिलं तरी कळत होतं त्यांचं फुटबॉलवरचं अतीव प्रेम. त्यांनाही माहिती आहे की, क्रिकेटवेड्या या देशात आजतरी फुटबॉलमध्ये करिअर करण्याच्या फार संधी उपलब्ध नाहीत. त्यासाठी जागतिक दर्जाचं प्रशिक्षणही नाही. पण म्हणून काही त्यांचं पॅशन कमी होत नाही. 
उलट म्हणूनच कदाचित फुटबॉलमधली प्रत्येक मॅच ते बारकाईनं पाहतात. त्यांचा ‘आयडॉल’ खेळाडू कसा खेळतो हे डोळ्यात प्राण आणून साठवतात. कारण हे प्रत्यक्ष ‘पाहणं’ हा त्यांच्यासाठी फक्त आनंदाचा, एन्जॉय करण्याचा भाग नाही तर शिकण्याचा भाग आहे.
मॅक्सन फर्नांडिस हेच सांगतो. मॅक्सनने अण्डर सेवंटीन राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत गोव्याचे नेतृत्व केले आहे. अलीकडेच झालेल्या तासा गोवा फुटबॉल स्पर्धेत तो साल्जोरा संघाचा तो कॅप्टन होता. मॅक्सन म्हणतो, ‘आमच्यासाठी वर्ल्डकप म्हणजे एक स्वप्न आहे, त्या दर्जाचा फुटबॉल आपल्याला खेळता यावा हे एक स्वप्न आणि त्यासाठीच आम्ही नेहमी प्रयत्न करतो.’ 
कॅनेथ, जिझस काल्देरा, जॉन परेरा हे सारे दोस्तही फुटबॉलमध्ये आपापलं करिअर शोधणारे. कॅनेथ अण्डर एटीन संघात खेळतो, त्याने अण्डर सिक्सटीन राष्ट्रीय स्पर्धेत गोव्यातील साळगावकर संघाचे नेतृत्व केले आहे. जॉन परेराही साळगावकर संघाचाच, त्याने १३ ते १७ या वयोगटातील राष्ट्रीय संघात गोव्याचं नेतृत्व केलं आहे.
फुटबॉलमधले एकूणएक डावपेच, एकूणएक गेमप्लान त्यांना तोंडपाठ तर आहेत. पण मुख्य वाद आहेत ते फेवरिट टीमचे. एरवी हे दोस्त जिवाला जीव देतील, पण जेव्हा फेवरिट फुटबॉल टीमची बाजू लावून धरण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते एकमेकांचे कट्टर वैरी.
नुस्तं विचारलं की, तुमची फेवरिट टीम कोणती?
आणि एकच कल्लोळ झाला, प्रत्येकाचा दावाच वेगळा.
स्नेडनचा फेव्हरेट संघ आहे ब्राझील तर मॅक्सनचा स्पेन. त्यात कुणाचा पोतरुगालला पाठिंबा तर कुणाचा अर्जेण्टिनाला.
सुरुवातीला आपल्यालाही वाटतं की, असतात फेवरिट्स त्यात काय एवढं. पण या तरुण फुटबॉलपटूंचं मात्र तसं नाही, त्यांचा आपल्याला फेवरिट संघांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळाच आहे. कारण ही मुलं या वर्ल्डकपकडे फक्त मनोरंजन म्हणून पाहत नाहीत. 
त्यांना आपापल्या फेवरिट टीमकडून, स्टारकडून काही ना काही शिकायचंय, ते जे करतात ते आपल्या खेळात करून पहायचं आहे. म्हणून तर जॉन परेरा सांगतो, ‘मेसी आणि रोनाल्डोचा खेळ पाहताना आम्ही कितीतरी गोष्टी शिकतो, जे पाहून आपल्याला समजलं ते मित्रांशी डिस्कस करतो, खेळताना ते प्रत्यक्षात करून पाहतो. ती पॅशन, ती जिद्द आपल्यात उतरलीच पाहिजे अशी प्रेरणा या मॅचेस देतातच.’
जॉनला फुटबॉलमध्येच करिअर करायचे आहे. फुटबॉलमध्ये करिअर करणं एवढं सोपं नाही याचीही त्याला जाणीव आहे. पण तोच म्हणतो, ‘खेळात मेहनत घेतली, आपलं आपल्या खेळावर प्रेम असलं, तर कायपण जमू शकेल.आणि जमेल मला.’  
जॉनप्रमाणेच मॅक्सनलाही भारताचं प्रतिनिधित्व करायचं आहे, त्यासाठी वाट्टेल तेवढे कष्ट, होतील तेवढे त्रास सहन करण्याची त्याची तयारी आहे. तो म्हणतो, ‘फुटबॉल आमच्या रक्तात आहे. मग फुटबॉलशिवाय वेगळं जगू कसं? फुटबॉलला स्वत:तून बाहेर काढणं कसं शक्य आहे?’ मॅक्सन स्वत: डीफेण्डर म्हणून संघात खेळतो, सध्या भारतीय फुटबॉल संघात खेळणारा गोव्याचा महेश गवळी त्याचा आयडॉल आहे. 
आज हे खेळाडून विद्यालयीन स्तरावर खेळत असले तरी गोव्यात त्यांच्याकडे उद्याचे स्टार म्हणून पाहिले जाते आहे. खरंतर सगळं सोडून फक्त फुटबॉल खेळावा असं या मुलांना जाम वाटतं पण तशी अवतीभोवतीची स्थिती नाही. त्यामुळे त्यांना आपलं शिक्षणही गांभीर्यानंच पूर्ण करावं लागतं आहे. त्यांचे प्रशिक्षक ऑसवल्ड डिमेलो म्हणतात, ‘मी या मुलांना एकच सांगतो, खेळा. मनसोक्त खेळा. जिवापाड प्रेम करा फुटबॉलवर पण म्हणून शिक्षण सोडायचं नाही.’
पण आवडतात कॉलेजातल्या चार भिंती या रांगड्या मुलांना?
 स्नेडनला विचारलं तर तो म्हणतो, ‘फुटबॉलमध्ये करिअर करणं कठीण आहे आणि नाहीदेखील, पण तरीही  शिक्षण हवंच हे आम्हालाही पटतंच. उद्या कदाचित फुटबॉल खेळताना गंभीर इजा झाली आणि फुटबॉल सोडायची पाळी आली तर शिक्षणच तारून नेऊ शकेल. रोजीरोटीसाठी शिक्षणच कामाला येईल  याची आम्हाला जाणीव आहे.’ त्याचे वडील याहीबाबतीत त्याचे आदर्श आहेत. ते उत्कृष्ट फुटबॉलपटू आहेत, तसे उच्चशिक्षितही आहे. मात्र शिक्षण व फुटबॉल याची सांगड घालणं कठीणच असतं, असं आन्सिवाचं मत. आन्सिवा सध्या बारावीत वाणिज्य शाखेत शिकते. फुटबॉल हीच अन्सिवाची प्रायॉरिटी आहे. मुलगी आणि फुटबॉल? असा बाळबोध प्रश्नच तिच्यासाठी कधीच निकाली निघाला आहे.  श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी गेलेल्या भारतीय संघात तिचा समावेश होता. ती म्हणते, ‘मला फुटबॉलमध्येच करिअर करायचे आहे! पूर्वी गोव्यात चांगली मैदाने नव्हती. मात्र आता चांगली मैदाने तयार झाली आहेत. गोव्यात फुटबॉलला आता पोषक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. आणि मुख्य म्हणजे मला फुटबॉल खेळायचा आहे, दुसरं काय?’
‘मला फुटबॉल आवडतो, मी खेळणार’ हा अँटिट्यूड घेऊनच सध्या गोव्यातली ही नवी पिढी फुटबॉल खेळते आहे. त्यामुळेच आहे त्या परिस्थितीवर मात करण्याची त्यांची तयारी आहे. आणि म्हणूनच येणारा वर्ल्डकप हा त्यांच्यासाठी एक संधी आहे, नवीन काहीतरी शिकण्याची. आपलं पॅशन नव्यानं जगण्याची. 
आणि त्या पॅशनच्या पोटात एक स्वप्नही आहे.
याच फुटबॉल वर्ल्डकपमध्ये भारतीय संघानं खेळण्याचं.
‘द बिग फुटबॉल ड्रीम.’
या तरुण फुटबॉलर्सच्या डोळ्यात पाहिलं तर वाटतं, होईलही एक दिवस त्यांचं हे स्वप्न पूर्ण.
 
- सुशांत कुंकळयेकर, 
मडगाव, गोवा
 
मुली आणि फुटबॉल?
मुली आणि फुटबॉल हा प्रश्न देशात इतर भागात पडू शकतो, पण गोव्यात नाही. गोव्याचा फुटबॉल जितका मुलांचा आहे तितकाच मुलींचाही. श्रीलंकेत झालेल्या १३ वर्षाखालील मुलींच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेली आन्सीवा वाझ आणि सॅनिता तावारीस या गोव्यात फुटबॉल खेळणार्‍या आणि फुटबॉल हेच करिअर असं मानणार्‍या मुलींच्या प्रतिनिधी.
गोव्यात, विशेषत: दक्षिण गोव्यात तर मुलींमध्ये फुटबॉलचं विशेष वेड दिसतं. मुली महाविद्यालयीन स्तरावर भरपूर फुटबॉल खेळतात. मुलांबरोबर मैदानात प्रॅक्टिस करतात. ज्या जोषात मुलं खेळतात त्याच जोशात मुलींचा फुटबॉल रंगलेला दिसतो. त्यामुळे गोव्यात तरी फुटबॉलमध्ये मुलं-मुली असा काही भेद नाही. फुटबॉलचा जोर दोन्हीकडे सारखाच.
 
 
.पण ‘सपोर्ट’चं काय?
एकीकडे गोव्यात तरुण मुलं फुटबॉलमध्येच करिअर करायचं म्हणून हटून बसले आहेत. त्यासाठी जीवतोड मेहनत करत आहेत, पण बदलत्या गोव्याच्या बदलत्या राजकीय सामाजिक चित्रात फुटबॉल प्लेअर्ससाठी वातावरण काही फारसं अनुकूल नाही, असं इथल्या अनेक प्रशिक्षकांचं मत आहे.
प्रशिक्षक ओसवल्ड डिमेलो स्वत: पूर्वी एमआरएफ संघात फुटबॉल खेळायचे. ते म्हणतात, ‘त्यावेळी आम्हाला कंपनीत नोकरी असायची. आज फुटबॉलपटूंचं मानधन वाढलं आहे मात्र सर्वांना कॉण्ट्रॅक्टवर खेळविले जाते. पूर्वी गोव्यात धेम्पो, साळगावकर. एवढेच नव्हे तर एमपीटी, कस्टम्स यासारखे संघ फुटबॉलपटूंना नोकरीवर घ्यायचे. त्यामुळे त्यांना नोकरीची शाश्‍वती असायची. आज चित्र बदलले आहे. खेळाडूंना नोकर्‍या देण्याचे धोरण सध्या गोव्यात बंदच आहे.’
 

Web Title: Football thrust in Goa soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.