पॅशन नावाच्या फॅक्टरीतले प्रयोग
By Admin | Updated: May 21, 2015 20:23 IST2015-05-21T20:23:27+5:302015-05-21T20:23:27+5:30
उद्योजकता शब्दाचा एक अर्थ ‘नव्या, सर्जनशील कल्पनांचा ध्यास’ असा होतो. एखादी कल्पना शोधून काढण्यासाठी आणि प्रत्यक्षात

पॅशन नावाच्या फॅक्टरीतले प्रयोग
> गोपाळ महाजन -
उद्योजकता शब्दाचा एक अर्थ ‘नव्या, सर्जनशील कल्पनांचा ध्यास’ असा होतो. एखादी कल्पना शोधून काढण्यासाठी आणि प्रत्यक्षात साकारण्यासाठी झपाटून काम करणं, धोके पत्करणं, समस्यांना सोडवण्यासाठी चाकोरीबाहेरचा, नावीन्यपूर्ण, ‘हटके’ विचार करणं हेदेखील उद्योजकतेत येतं.
आणि उद्योजकता या शब्दाचा दुसरा अर्थ ‘काहीतरी उद्योग किंवा व्यवसाय करणं आणि त्यातून नफा कमावणं’ असाही होतो.
सामाजिक उद्योजकतेत (सोशल आंत्रप्य्रुनर/बिझनेस) या संकल्पनेत वर सांगितलेल्या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव होतो. म्हणजे उद्योजक बनण्यासाठी सर्जनशील वृत्ती हवीच. ‘हटके’ विचार हवाच. परंतु इथे फक्त नफा कमावणं असा आणि एवढाच संकुचित विचार करून चालत नाही. सामाजिक उद्योजकतेत समाजातल्या तळागाळातील, गरीब लोकांना त्यांच्या गरजांवर आधारित अशा वस्तू किंवा सेवा किफायतशीर दरात (चिपर), जलद गतीने (फास्टर) आणि मोठय़ा प्रमाणात (बिगर स्केल) देणो अभिप्रेत असते.
मग सामाजिक उद्योजकता म्हणजे नक्की काय?
खरं तर जगभर आणि भारतातसुद्धा गेल्या 5क्-6क् वर्षात सामाजिक उद्योग/व्यवसाय अनेकांनी केले आहेत आणि अजूनही असे अनेक सुरू आहेत. परंतु सामाजिक उद्योजकता या कल्पनेला नवा आकार, नवा अर्थ देण्याचे काम महम्मद युनूस यांनी अलीकडेच केले आहे. बांगलादेशात बचतगटांचं मोठं जाळं उभारून, ग्रामीण महिलेलाच उद्योजक बनवत एक ग्रामीण बॅँक सुरू करण्याचं काम या महम्मद युनूस यांनी केलं. त्यांचं हे काम म्हणजेच खरं तर सामाजिक उद्योजकता. त्यांचं काम समजून घेतलं ना तर आपल्याला सामाजिक उद्योजकतासुद्धा नीट कळेल.
त्यांनी एका कल्पनेतून एक मोठा सामाजिक उद्योग सुरू केला. ज्या महिलेकडे काहीच साधनं नव्हती त्या महिलेलाच उद्योजक बनवत तिनं बनवलेल्या वस्तू बाजारपेठेत पोहचवण्याइतपत सक्षम केलं!
महम्मद युनूस यांनी मात्र वेगळ्याच दृष्टीने भांडवलशाहीकडे बघितलं. खरंतर अर्थविचारांच्या डाव्या बाजूला असलेले तज्ज्ञ आणि कार्यकर्ते मानतात की भांडवलशाहीमध्ये फक्त नफ्याचाच विचार होतो आणि इतरांचं शोषण केल्याशिवाय नफा कमावता येतच नाही. महम्मद युनूस मात्र असं मानत नाहीत. उलट ते म्हणतात की, भांडवली तंत्रचा सुयोग्य वापर करून जगातील विषमता आणि गरिबी आपण नष्ट करू शकतो. आणि त्यांनी हे आपल्या कामातून सिद्धही केलं. ग्रामीण बँक आणि सहयोगी कंपन्यांच्या माध्यमातून बांगलादेशात आणि बचतगटांच्या संकल्पनेतून जगभर मोठय़ा प्रमाणात गरिबी निमरूलनाच्या कामाला गती दिली. त्यासाठीच त्यांना शांततेचं ‘नोबेल’ पारितोषिकसुद्धा मिळालं.
दुग्ध व्यवसायातील जगप्रसिद्ध डॅनॉन ही कंपनी आपल्याला माहीत असेलच. महम्मद युनूस यांनी डॅनॉन कंपनीशी करार करून सोशल बिझनेसचं एक नवं मॉडेल तयार केलं. त्यावेळी बांगलादेशात लहान मुलांमधील कुपोषणाचं प्रमाण खूप जास्त होते. ते कमी करण्यासाठी ग्रामीण बँक आणि डॅनॉन कंपनी यांनी दह्याचं एक प्रॉडक्ट तयार केलं. ते विकेंद्रित पद्धतीने बनवण्यासाठी त्यांनी बांगलादेशातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी फॅक्टरी सुरू केल्या. स्थानिक शेतक:यांना दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य केलं. दुधाच्या संकलनासाठी बचतगटाच्या पुरु ष आणि महिलांना सहभागी करून घेतलं. स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन फॅक्टरीमध्ये रोजगार दिला. दह्याचं प्रॉडक्ट कमी किमतीत गावागावांत विक्र ी करण्याचं काम बचतगटांनाच दिलं. अशा रीतीने कुपोषण कमी करणारं प्रॉडक्ट स्थानिक शेतकरी, बचतगट आणि युवक यांना रोजगार देऊन कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा आणि झालेला नफा पुन्हा सोशल बिझनेस वाढवण्यासाठी गुंतवण्याचा उद्योग ग्रामीण बँक आणि डॅनॉन कंपनी यांनी सुरू केला.
सामाजिक प्रश्न सोडवताना उत्तम उद्योग उभारून नफाही कमावता येऊ शकतो, याचं हे झालं एक उदाहरण!
सामाजिक उद्योजकतेत दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे व्यवस्थापनाचा. ग्रामीण व्यवस्थापनाचे अस्सल भारतीय उदाहरण म्हणजे ‘अमुल’चे. गुजरातमधील खेडा जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतक:यांनी ‘पोल्सन’ कंपनीच्या मक्तेदारीला आव्हान म्हणून स्वत:ची को-ऑपरेटिव्ह सुरू केली. पुढे जाऊन त्या ग्रामीण उद्योगाचे व्यवस्थापन वर्गीस कुरियन नावाच्या कुशल व्यक्तिमत्त्वाच्या हाती आले. दूध उत्पादनात जगात भारताचा पहिला क्र मांक असण्यामागे अमुल आणि कुरियन यांचे कळीचे योगदान आहे. को-ऑपरेटिव्ह किंवा उत्पादक संघ या प्रकारच्या उद्योजकतेमध्ये उत्पादक हेच समभागधारक असतात. म्हणजेच ते अशा उद्योगाचे मालकही असतात. त्यामुळे होणारा नफा हा सगळ्या समधारकांमध्ये वाटला जातो. उत्पादक संघ किंवा कंपनीचा कारभार चालवण्यासाठी एक कुशल व्यवस्थापक नेमलेला असतो. एका अर्थाने तोसुद्धा उद्योजकच असतो.
ही झाली सामाजिक आणि ग्रामीण उद्योजकतेची जगभर गाजलेली उदाहरणं!
आजच्या घडीला भारत देश जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. शहरातल्या लोकांच्या हाती पैसा असल्यामुळे बहुतेक कंपन्यांची नजर शहरांकडे वळलेली आहे. परंतु भारतातला ग्रामीण भागसुद्धा झपाटय़ाने बदलतोय. माहितीच्या विस्फोटामुळे, सर्वदूर फैलावामुळे ग्रामीण जनतेच्या इच्छा-आकांक्षासुद्धा बदलत, वाढत आहेत. म्हणूनच युनूस, कुरियन यांसारख्या उद्योजकांची, व्यवस्थापकांची गरज अजूनच वाढली आहे.
ग्रामीण भागातच उद्योग सुरू झाले आणि त्यांनी स्थानिक साधनसामग्री वापरून स्थानिक लोकांच्या गरजा भागवत स्थानिक लोकांनाच रोजगार दिला तर अनेक प्रश्न सोपे होतील अशी ही कल्पना आहे.
म्हणूनच ही ग्रामीण उद्योजकता शिकवणा:या अनेक संस्था आता पुढे येत आहेत. त्यातून उत्तम प्रशिक्षण घेऊन यशस्वी पण समाजाभिमुख उद्योग करणारेही अनेकजण पुढे येत आहेत.
मुख्य म्हणजे फाटकी झोळी घेऊन समाजसेवा करत फिरण्याचे दिवस कधीच संपलेत. सामाजिक क्षेत्रतसुद्धा आज मोठ्ठं ‘जॉब मार्केट’ तयार झालंय. विकासाच्या प्रश्नांशी दोन हात करत, तळागाळातल्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतसुद्धा उत्तम करिअर आज आपण घडवू शकतो. आपल्या पॅशनलाच प्रोफेशन बनवण्याचा चॉइस नक्कीच आपल्या हातात आहे.
ग्रामीण उद्योजकता आणि व्यवस्थापनाची क्षेत्रं आपली दारं ठोठावतायत..