इको फ्रेण्डली शर्ट
By Admin | Updated: May 22, 2014 15:56 IST2014-05-22T15:56:30+5:302014-05-22T15:56:30+5:30
खादी फॅशन असेल तर ती गरिबांनी का वापरू नये? उन्हाळ्यात थंडावा आणि थंडीत उष्णता देणारे शर्ट बनवण्याचं कल्पक काम वर्ध्यातील तरुणाने केले आहे.

इको फ्रेण्डली शर्ट
>बळवंत ढगे - खादी फॅशन असेल तर ती गरिबांनी का वापरू नये? उन्हाळ्यात थंडावा आणि थंडीत उष्णता देणारे शर्ट बनवण्याचं कल्पक काम.
-----------
‘खादी’ नावाची फॅशन ही तशी शहरी. खेड्यापाड्यात कोण कशाला घालतंय खादी?
या प्रश्नाचं उत्तर हवं तर त्याला भेटायला हवं. विदर्भातल्या आग ओकणार्या उन्हाळ्यात त्यानं ठरवलं असे कपडे बनवू जे उन्हाळ्यात शरीराला जरा तरी थंडावा देतील. लोकांची गरज भागवतील आणि आपल्या हाताला एक कल्पक रोजगार मिळेल. त्यातून त्यानं शोधली ‘इको-फ्रेंडली’ शर्टांची आयडिया. आणि ठरवलं इको कॉटनचे शर्ट बनवू. विदर्भातल्या वध्र्यातल्या एका तरुणाला हे जमलं, ते कसं?
कशी सुचली आयडिया?
बळवंत ज्ञानेश्वर ढगे. वय वर्षे २५ . चार वर्षांपूर्वी त्यानं मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली. दादरच्या कीर्ती कॉलेजमधून बीएमएमची पदवी घेतली. तीन महिने एका मीडिया कंपनीत काम केलं. एन.आय.बी.एम.मधून ऑनलाइन एमबीए केलं. पुढे काय हा प्रश्न होताच. पण सुदैवानं त्याच्या वडिलांनीही कधी नोकरीच कर म्हणून आग्रह धरला नाही. त्यांना वाटत होतं की मुलानं एखादा उद्योगच करावा. दोन पर्याय होते. नोकरीपेक्षा वडिलांचा सल्ला अधिक महत्त्वाचा वाटला. आणि म्हणून त्यानं ठरवलं की बेरोजगारांच्या रांगेत लागण्यापेक्षा उद्योग सुरू करायचा. मग ठरवून मुंबईतल्या काही उद्योजकता विकास सेमिनारमध्ये सहभाग घेतला आणि थेट वर्धा गाठलं. गारमेंटचा उद्योग करायचं ठरवलं. आज तीन वर्षं होत आली या व्यवसायाच्या माध्यमातून २३ लोकांना थेट, तर ४-५ लोकांना अप्रत्यक्ष रोजगार त्यानं उपलब्ध करून दिलाय.
पण इको फ्रेण्डली शर्ट ही आयडिया कशी सुचली तर त्यावेळी त्याच्यासमोर दोन पर्याय होते. एक तर हर्बल कॉस्मेटिक्स आणि दुसरा गारमेंटस्चा व्यवसाय. त्याला कपड्यांचा व्यवसाय अधिक सुरक्षित वाटला पण त्यात नवीन काय द्यायचं हेही ठरवणं कसरतच होती. खादी म्हटलं तर वध्र्याची. गांधीजींच्या स्पर्शानं पावन झालेली. बळवंतला वाटलं की या खादीलाच अधिक महत्त्व देऊन तीच अधिक लोकांपर्यंत का पोहचवू नये? खादी ही निसर्गपूरक असूनही तिला मुख्य बाजारपेठेत पाहिजे ती जागा नाही. ती जागा आपण मिळवून द्यायची, असं त्यानं ठरवलं. आणि ‘इको फ्रेंडली शर्ट’ निर्मिताचा उद्योग करण्याचा विचार पक्का झाला.
- सुरुवातीला मार्केट स्वीकारेल किंवा नाही हे माहीत नव्हतं. देशभर फिरून, खादी निर्मिती करणार्या परंपरागत उद्योजकांच्या भेटी घेतल्या. त्यात काय बदल करता येईल यावर लक्ष केंद्रित केलं. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून खादीला विकसित केलं आणि खादी नवीन रूपानं पुढे आली. यालाच इको कॉटन असं नाव दिलं. ग्राहकांनी या इको कॉटन शर्टला पसंती दिली. बघता बघता विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात या शर्टची मागणी वाढू लागली.
अडचणी काय आल्या?
या व्यवसायाचा पाठीशी काहीएक अनुभव नव्हता. खूप अडचणी आल्या. निर्मिती करणं, मार्केटिंग करणं ही दोन्ही कामं स्वत:ला करावी लागत. सोबतच क्वॉलिटी जपणं हेही आलंच. अपेक्षेपेक्षा खर्चच अधिक झाला. उद्योग उभा झाला खरा, पण मार्केटअभावी तो कोलमडून पडतो की काय, या भीतीनं पूर्णत: खचून गेलो. पण निराश झालो नाही. मित्रांच्या आणि परिवाराच्या मदतीनं गाडी कशीबशी रूळावर आणली. आता पहिल्या वर्षापेक्षा चार पटीनं निर्मिती वाढली आहे. आर्थिक मदतीला धावून येणारे मित्र असले तरी मी हार मानलेली नव्हती. अखेर व्यवसाय फळास आला, याचं समाधान आहे.
लक्षात काय ठेवायचं?
१) व्यवसाय सुरू करताना सगळं काही नवीन होतं. प्रत्येक गोष्ट पहिल्यांदाच करावी लागली. निर्मितीपासून तर ट्रान्स्पोर्टपर्यंत सारं काही सांभाळावं लागलं. मनुष्यबळही नवखं असतं. मशीनमधील बिघाड, क्वॉलिटी मेन्टेन करायला त्रास होत होता. मार्केटमध्ये ओळख निर्माण करणं, वसुली करणं हेही एक आव्हान होतं. विश्वासातील माणसं आणि काम करण्याची जिद्द असेल तर ध्येय गाठणं कठीण नाही.
२) कौशल्य म्हणजे आलेल्या कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची इच्छाशक्ती आणि तयारी असली पाहिजे, याच कौशल्याच्या बळावर आज उद्योजक झाल्याचा आनंद वाटतो. मनात आणलं तर बरोजगारीवर मात करणं कठीण नाही, हे मला या उद्योगातून शिकता आलं.
- राजेश भोजेकर, वर्धा