डीपीवालं फोटोशूट

By Admin | Updated: April 12, 2017 16:39 IST2017-04-12T16:39:52+5:302017-04-12T16:39:52+5:30

फेसबुकवर आपल्या फोटोला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लाइक्स मिळाले तर आपली इमेजपॉवरफुल! आणि कुणी लाइकलं नाहीच, तर?

Dpvala Photoshoot | डीपीवालं फोटोशूट

डीपीवालं फोटोशूट

फेसबुकवर आपल्या फोटोला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लाइक्स मिळाले तर आपली इमेज
पॉवरफुल! आणि कुणी लाइकलं नाहीच, तर? या भीतीनंही अनेकांच्या पोटात खड्डा पडतो? त्याच प्राइड आणि फिअरचा एक नवा रोजगार!


‘फेसबुकचा डीपी आमच्याकडून काढून घ्या, आणि लाइक्स मिळवा..
सोशल मीडियामें छा जाओ, बस इक फोटो निकालो..’
- असं जर एखाद्या मार्केटिंग किड्यानं कुणाला सांगितलं तर लोक हसतीलही..
पण तरुण मुलं-मुली?
त्यांना विचारा..
मेट्रोवालेच कशाला, छोट्या शहरातल्या, ग्रामीण भागातल्या कॉलेजात शिकणाऱ्या तरुण मुलामुलींना विचारा की, तुमचा भारी डीपीवाला फोटो काढून दिला कुणी तर चालेल का?
बहुतेक सगळे एका पायावर ‘हो’ म्हणतील!
कारण?
नव्या नेटकरी जगात लाइक्स आणि कमेण्ट्स यांच्या जोरावर आपल्या वर्तुळातील आपली पत मोजली जाते. परस्परांत लाइक्स मिळवण्याच्या स्पर्धा लागतात, आपलाच ग्रुप कसा हटके म्हणून ग्रुपचे फोटोसेशन होतात आणि आपलंच लाइफ कसं हटके आहे हे दाखवण्यासाठी जेवणापासून ट्रेकिंग, शॉपिंगपर्यंत आणि बर्फाचा गोळा खाण्यापासून कुरडया वाळत टाकण्यापर्यंतचे फोटो आपल्या टाइमलाइनवर टाकले जातात..
इथवर तसं आता सारं सरावाचं झालंय..
पण ज्यांना स्वत:ची अशी हवा करायची आहे त्यांचे फोटो काढून देण्याचा, ते फेसबुकावर भारी दिसतील असे एडिट करून देण्याचा उद्योगच कुणी केला तर?
तेही जेमतेम विशीतल्या कॉलेजकरी विद्यार्थ्यानं?
कमवा-शिका योजनेचा हा पुढचा टप्पाच म्हणायला हवा. 
समर जॉबचे विविध ट्रेण्ड चर्चेत ठेवणाऱ्यांनाही ही आयडिया सुचणार नाही अशी भारी आयडिया औरंगाबादच्या शैलेश सोनवणेला सुचली आणि त्यानं डीपी आणि प्रोफाइल स्पेशल फोटोच काढून द्यायला सुरुवात केली..
मित्र तर मित्र अन्य कॉलेजातलं पब्लिकही त्याच्याकडे येऊ लागलं. कॉलेजातले मुलंमुलीच नाही, तर आठवी-नववीचे शाळकरी पोरंपोरीही आताशा असं एफबी स्पेशल फोटोशूट करू लागलेत. आपले खास स्टायलिश, कडक पोजवाले फोटो ‘एफबी’वर पोस्ट करून मित्रांमध्ये भाव वाढवण्याचे, खाण्याचे आणि हिरो बनून मकडण्यासाठीचे हे प्रयोग सर्रास आहेत. अर्थात एरवीही मुलींच्या फोटोंना मुलांपेक्षा जास्त लाइक्स मिळतात. आणि मुली काही असे फोटोशूट करीत नसतील अशी एक धारणा असते. पण तसं नाही. एखाद्या सुपरमॉडेलप्रमाणे पोर्टफोलिओ बनवत ते फोटो मुलीही एफबीवर टाकतातच..
हे सारं कशासाठी?
तर उत्तर तेच, लाइक्ससाठी!
आणि आता जर लाइक्सचा बिझनेस इतका जोरात असेल आणि लोकांना सोशल मीडिया इमेज एवढी महत्त्वाची वाटतच असेल तर शैलेशसारख्या कुणा सुपीक डोक्याला त्यातून बिझनेस आयडिया सुचणारच..
आणि ती आयडिया ‘लाइक’ करण्यासारखी आहेच..
कशी?
?

लाइक मंगता है क्या?

उस्के फोटो को मेरे फोटो से जादा लाइक कैसे? असा ‘जे’ फॅक्टर सध्या तरुण दुनियेत जोरात आहे, त्याचा परिणाम म्हणून स्वत:सह साऱ्या ग्रुपचं  लाइक मिळवणारं फोटोशूट करायचं आणि मग मिरवायचं आपली कशा हवा आहे म्हणत..
 

फेसबुकवर फोटो टाकायचा कशाला?
- तर लाइक्ससाठी. आणि कमेण्ट्ससाठी!
आपल्या फोटोला नेमके किती ‘लाइक्स’ मिळतात, कोण कोण लाइक करतं, वॉव म्हणत अंगठे वर करतं हे पाहण्यासाठी दर मिण्टाला मग रिफ्रेश मारलं जातं. एकेक नोटिफिकेशन म्हणजे जणू पुरस्कारच वाटतो. नोटिफिकेशनच्या लाल रंगातले आकडे जेव्हा दोन आकडी किंवा तीन आकडीही दिसतात तेव्हा जो काही स्वत:चा अभिमान वाटतो ना..
बस, वाटतं, आपल्यासारखे आपणच!


पण लाइकसाठी आतुरलेल्या अशा क्राऊडची नेमकी नस ओळखून त्यांना लाइक येतील असे फोटो काढून देणाऱ्या एका दोस्ताला भेटा. त्याला या लाइकच्या बिझनेसमधून आता थोडेबहुत पैसेही मिळू लागलेत.
औरंगाबादचा शैलेश सोनवणे. पॉलिटेक्निक महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकतो. मात्र तसा नेटसॅव्ही. हा पठ्ठा आपल्या मित्रमैत्रिणींना फेसबुकवर पोस्ट करण्यासाठी फोटो काढून देतो आणि त्यातून आपला ‘पॉकेट मनी’ मिळवतो. हा पॉकेट मनी म्हणजे पेट्रोल आणि मोबाइल रिचार्जचा महिनाभराचा खर्च इतपतच नाही, तर गेल्या काही दिवसांच्या मेहनतीच्या जोरावर त्यानं एक बाइकही विकत घेतली आहे.


त्याच्याच कॉलेजच्या कॅण्टिनमध्ये आम्ही भेटलो. दुपारच्या कडक उन्हात प्रचंड उकाड्याने घामाच्या धारा वाहत होत्या. शेवटच्या वर्षाचं सबमिशन करून तो आला होता. आधी कोल्ड्रिंक, मग भेळ आणि नंतर चहा असा अजब मेन्यू एकामागून एक आमच्या समोर आला.
त्याला थेटच विचारलं की फेसबुक डीपी आणि प्रोफाइल फेमस फोटो एक्सपर्ट तू, ही आयडिया आली कुठून तूला? 
तो हसतो. सांगतो, ‘मला काही फोटोग्राफीची आवड होती असं काही नाही. कॉलेजमध्ये आल्यावर होतं सगळ्यांचं तसंच झालं. मीही माझ्या काही मित्रांप्रमाणे ‘खास फोटोसेशन’ करून ते फोटो फेसबुकवर टाकले. हवा केली म्हणतो आम्ही त्याला. स्वत:चे असे स्टाईलिश फोटो काढले. सहज म्हणून स्वत:च काही फोटो काढून पाहिले. ते मित्रांना दाखवले. त्यांना ते आवडले. म्हणाले आमचे पण असे फोटो काढून दे. मग जवळच्या मित्रांचे फोटो काढणं सुरू झालं.’
शैलेश सांगतो, ‘केवळ फेसबुकवर अपलोड करण्यासाठी माझ्या आणि इतर कॉलेजमधली मुलंही आता मॉडेल्ससारखं खास फोटोशूट करतात. त्यांना केवळ मोबाइल कॅमेऱ्यानं काढलेला फोटो नको असतो, तर चांगल्या डिजिटल कॅमेऱ्याने अगदी प्रोफेशनल पद्धतीने काढलेले फोटो हवे असतात. त्यासाठी पैसे मोजायची त्यांची तयार असते.


तिथून शैलेशला आयडिया सुचली की आपणच पोरांना असे फोटो का काढून देऊ नये?
शैलेश सांगतो. एडिटिंगसह एका फोटोचे साधारणत: ५० रुपये मी घेतो. गेल्या वर्षभर हा ‘स्वयंउद्योजकते’चा प्रयोग सुरू आहे. 
शैलेश चांगले फोटो काढतो म्हणून त्याची डिमांडही वाढू लागली. त्यानं मग डिजिटल कॅमेरा घ्यायचं ठरवलं. आधी त्याच्या आईवडिलांना वाटलं आता हे काय नवीन खुळ? अभ्यास सोडून आता हा लोकांचे फोटो काढत बसणार का? त्यांनी नाराजीही व्यक्त केली. पण मुलाचा हट्ट म्हणून त्यांनी कॅमेरा घेऊन दिला. मग फोटोग्राफर असलेल्या मावसभावाकडून त्यानं कॅमेरा कसा हाताळायचा ते शिकून घेतलं.


शैलेश सांगतो, आधी मी नुसते फोटो काढायचो. म्हणजे एडिटिंग वगैरे काही नाही. फक्त चांगल्या लोकशनवर विविध पोझमध्ये फोटो काढायचो. पण मग एडिट केल्यावर फोटो आणखी छान आणि प्रोफेशनल दिसतात हे लक्षात आलं. मग मी स्वत:हूनच एडिटिंग शिकलो. त्यातले बारकावे जाणून घेतले. तेही करू लागलो. आणि मग फुकट का यातून पैसेही मिळतील हे लक्षात आलं.
पण शहरात प्रोफेशनल फोटोग्राफर भरपूर. मी दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी. मला कोण पैसे देणार? बरं पैसे घ्यावे तरी कोणाकडून? सगळी आपलीच मित्रमंडळी. पण जरा धाडसानं तेही जमलं’ - भेळ खात शैलेश सांगत असतो. 
मात्र एवढी क्रेझ फेसबुकवर फोटो टाकायची? त्यासाठी पैसेही खर्च करण्याची तयारी. नेमकं सांगतात काय मुलं तुला फोटो काढण्यापूर्वी, असं शैलेशला विचारलंच..
- लाइक्स! एका शब्दात शैलेश उत्तर देतो.


जास्तीत जास्त लाइक्स मिळवून आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये इम्प्रेशन पाडणं हे त्यामागचं सर्वात मोठं कारण. तुमच्या फोटोला किती लाइक्स मिळतात आणि किती कमी वेळात मिळतात यावरून आता अनेकांचं सोशल स्टेटस ठरतं. (आॅनलाइन व आॅफलाइनही.) ज्याला जास्त लाइक तो अधिक प्रसिद्ध. मित्रांमध्ये त्याची चलती जास्त असं आता साधं-सोपं गणित आहे. 
लाइक्स मिळवायचे तर भारी दिसलं पाहिजे, चांगले-चांगले स्टायलिश फोटो काढून घेतले पाहिजेत. आणि आता कुठल्याही साध्या फोटोला लाइक्स नाही मिळत, सुपर पोझ देऊन काढलेल्या ‘कडक’ फोटोचीच ‘एफबी’वर चर्चा होते. 
आपल्या फोटोचेच नाही, तर आपलेही चर्चे करत हवा करायची तर फोटो लागतातच..
शैलेश सांगत राहतो, लाइक्सच्या बिझनेसचा नवा फॉर्म्युला!

तेरे फोटो को मेरे फोटोसे जादा लाइक कैसे?
लाइक मिळवणं हा तरुणांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. काहीतर इमोशनली त्यात अडकतात. काहीजण इगो इश्यू करत स्वप्रतिमेला त्या लाइकशी जोडतात. माझ्या फोटोला लाइक का मिळत नाहीत हा विचार करून निराश, उदास होणारेही अनेकजण. लाइक्सवरून वैयक्तिक आयुष्यातील पत मोजली जाते. आणि गोष्ट जेव्हा पत, इभ्रत, प्रतिष्ठेची असते तेव्हा तडजोड कोण करणार? म्हणून तर लाइकसाठी फोटोसेशन. अगदी त्याच्या स्पर्धा भरविल्या जातात. ‘लाइक कॉम्पिटिशन’ आयोजित केली जाते. दोन मित्रांमध्ये किंवा ग्रुपमध्ये एका तासात कोणाच्या फोटोला सर्वाधिक लाइक्स मिळतात यावर पैंज लावली जाते. 

गु्रपची हवा व्हायला पाहिजे!
आमचा ग्रुप कसा भारी, आम्ही सगळे यार-दोस्त कसे हटके आहोत, आमची किती चलती आहे हे दाखवण्यासाठीदेखील कॉलेजकुमारांचे ग्रुप्स फोटोसेशन करतात. ग्रुपमध्ये प्रत्येकाची एक वेगळी स्टाइल असते, व्यक्तिमत्त्व असते. मग कुठे डोंगरावर जाऊन किंवा शहराजवळच्या एखाद्या पिकनिक स्पॉटवर हे विद्यार्थी स्टायलिश कपडे, हेअरस्टाइल करून, बाइक-कार घेऊन जातात आणि एकदम थाटामाटात फोटो काढतात. मग ते फेसबुकवर अपलोड करून सर्वांना टॅग केलं जातं. मग लाइकचा आॅनलाइन व आॅफलाईन भाव खाणं प्रकार!


बड्डे का लाइक फंडा

एक नवीन फॅड. ज्याचा वाढदिवस असतो तो आपल्या सगळ्या मित्रांसोबत एक-एक फोटो काढतो. त्यांची फ्रेंडशिप दिसेल असा तो फोटो असला पाहिजे. मग वाढदिवसाच्या दिवशी हे सर्व मित्र ते फोटो अपलोड करून शुभेच्छा देतात. दिवसभर मग बर्थडे बॉय फेसबुकवर ट्रेंडिंग असतो. सगळ्याच म्युचुअल फ्रेंड्सच्या वॉलवर त्याचा फोटो. एवढी हवा करायची मग पैसे तर खर्च होणारच!


- मयूर देवकर
(मयूर लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत सहायक उपसंपादक/वार्ताहर आहे.deokarmn@gmail.com)



- मयूर देवकर

Web Title: Dpvala Photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.