..तू कहीं मत जा!
By Admin | Updated: July 3, 2014 18:28 IST2014-07-03T18:28:07+5:302014-07-03T18:28:07+5:30
मॉडेलिंग करणार्या मैत्रिणीपासून ते कट्टर कम्युनिस्ट मित्नापर्यंत,आपल्याच कोशात राहणार्या मित्नापासून ते चळवळीचे पूर्ण वेळ काम करणार्या कार्यकर्त्या मित्नापर्यंत,सिनेमा, संगीत, साहित्य यांच्या वेड्या रसिक मित्नांपासून ते कविता, कथा लिहिणार्या कल्लाकारांपर्यंत’ माझं फ्रेन्डसर्कल मला माझ्या उद्योगांनी दिलं.आणि अशा माणसांना भेटवलं, ऐकवलं जे एरवी मला भेटलेही नसते.

..तू कहीं मत जा!
>कॉलेजातल्या ‘उद्योगांनी’ काय शिकवलं?
‘‘आज मैं उपर आसमां नीचे
आज मै आगे जमाना है पिछे’’
या ओळी मस्त धुंदीत गाण्याचे दिवस येतात ते दहावीची ‘लढाई’ आणि बारावीचे ‘युद्ध’ संपल्यावर.
‘हायवे’तल्या आलिया भटला जशी खुली हवा में सांस घेण्याची तलफ येते आणि त्यासाठी ती मोकळ्या हवेत बाहेर पडते तसंच कॉलेजमधले दिवस म्हणजे असं ‘कल्ला’ करत भरभरून ऑक्सिजन मिळवण्याचे दिवस.
माझं ज्युनियर कॉलेज होतं हडपसरमधलं साधना कॉलेज. हायस्कूलला अटॅच असलेल्या कॉलेजमध्ये शाळेसारखी शिस्त असल्याने काही उद्योग करता आले नाहीत. (येथे ‘उद्योग’ या शब्दाचा अर्थ एक्स्ट्रा-करिक्युलर अँक्टिव्हिटी असा घ्यावा.)
कॉलेज लाइफ ज्याला म्हणता येईल असं लाइफ सुरू झालं जेव्हा मी फग्यरुसन कॉलेजला बीएस्सी फिजिक्स करण्यासाठी अँडमिशन घेतलं तेव्हा. फग्यरुसन कॉलेज म्हणजे अमक्या विचारांचं, इथं ग्रुपिंग, लॉबिंग असतं आपला काही इथं निभाव लागणार नाही असे एक ना अनेक समज घेऊन मी कॉलेजमध्ये आलो, पण माझ्या समजांपेक्षाही हे कॉलेज एक भन्नाट प्रकरण होतं हे निश्चित. कॉमन ऑफ, बन्क, कलटी मारणे, प्रॉक्सी मारणे, ..इ गोष्टी माझ्या डिक्शनरीत आल्याने अधिक समृद्ध होणे भाग पडले. परमपूज्य गुरु जनांचा बॉलिवूड, हॉलिवूड हिरो/व्हिलन यांच्यासोबत तुलनात्मक अभ्यास करणे, कॉलेजमधल्या सुंदर मुलींविषयी एक विकीपीडीया आपल्या मनात स्टोअर करून ठेवणे तसेच बरोबर लेक्चरच्या वेळात सवेरा, रूपाली,वैशाली या क्लासरूम-कम हॉटेलमध्ये आवश्यक अटेन्डस नोंदवणे अशा महत्त्वाच्या गोष्टी करायला लागल्याने व्यक्तिमत्त्वाचा ‘चौफेर’ विकास होऊ लागला.
पहिल्यापासूनच ‘अवांतर’ काही करण्याची हौस असल्याने मी पिहल्यांदा नाटकाच्या ग्रुपसोबत जोडला गेलो. सकाळ करंडक, पुरु षोत्तम करंडक इत्यादी वेगवेगळ्य़ा स्पर्धांसाठी जोरदार तयारी तिथं सुरू असायची. (नाटकं करण्याची नेहमीच सवय असल्याने हे अधिक सोपं होतं!) काही दिवस मी नाटकाची प्रॅक्टीस केली; पण तिथंच रमलो नाही. पुरुषोत्तमची नाटकं मात्न आवर्जून पाहिली. नाटकांचे विषय सादरीकरण हा भाग वेगळा; पण भरतनाट्य मंदिरात फग्यरुसन-फग्यरुसन जल्लोष मला प्रचंड भारी वाटायचा. आजही या नाटकांपेक्षा तो जल्लोष मला एका वेगळ्य़ा दुनियेत नेतो.
माझी दुसरी एन्ट्री होती वक्तृत्व आणि वाद-विवाद मंडळात. पहिल्याच वर्षी मी तीन स्पर्धा केल्या त्यात एका ठिकाणी आम्हाला सांघिक प्राइज मिळालं पण मला वैयक्तिक प्राइज न मिळाल्याने मी अस्वस्थ झालो. ये भी अपने टाइप का नही है असं वाटत असतानाच रूईया कॉलेजने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत मी पहिला आलो.
विषय होता- ‘सुरक्षिततेच्या शोधात विश्व’. या भाषणाचं स्क्रि प्ट मी लिहिलंही नव्हतं.
पण माझं मी तयारी करून बक्षीस मिळाल्याचा मला प्रचंड आनंद झाला. वक्तृत्व आणि वादविवाद या गोष्टींकडे मी सिरियसली बघू लागलो ते या छोट्याशा यशामुळे. समाजासोबत
थेटपणे जोडले जाण्याची ही प्रोसेस खूपच एनरिच करणारी आहे हे माझ्या लक्षात आलं. मग लोकपाल असो की लिव्ह इन रिलेशनशिप, न्युक्लिअर डील असो वा गांधी/सावरकर अशा कुठल्याही विषयावर मी बोलायला लागलो. त्यासाठीचा अभ्यास, स्पर्धेत भेटणारे मित्न-मैत्रिणी, परीक्षक पाहुणे यातून अनुभवाचा कॅनवास विस्तारला. हे करत असतानाच भाषणासाठी स्वत: तयार केलेली स्क्रि प्ट असावी या माझ्या स्वत:च्याच आग्रहाखातर मी लेखनाकडे गांभीर्यानं पाहू लागलो. अनेकदा माझ्या भाषणात वापरलेल्या कविता माझ्याच असत. माझ्या काही कविता मी ‘कविता-रती’ या द्वैमासिकाला पाठवल्या तेव्हा संपादक पुरुषोत्तम पाटील यांचं कविता आवडल्याचं मला पत्न आलं. त्यानंतर मी ‘परिवर्तनाचा
वाटसरू’, ‘अक्षर’, ‘ऐसी अक्षरे’, ‘अनाहत’.. यासारख्या इ नियतकालिकांना कविता पाठवल्या. शाळेत असल्यापासून कवितेशी असलेली मैत्नी कॉलेजमध्ये असताना घट्ट झाली. कविता हा माझा स्वत:चा असा अवकाश मला गवसला तो फग्यरुसनच्या दुसर्या वर्षाला असताना.
सुशील धनमने आणि सविता केळकर या दोन्ही प्राध्यापकांनी मला वक्तृत्व आणि वादविवाद मंडळाचा सचिव म्हणून काम करण्याची संधी दिल्यानंतर वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याची संधी मला मिळाली.
मी सचिव असताना २८ स्पर्धकांनी ५८ बक्षिसं मिळवण्याचं रेकॉर्ड केलं त्यातून अनेकांना आत्मविश्वास मिळाला. वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा ऑर्गनाइझ करताना संघटन कौशल्य, व्यवस्थापकीय कौशल्य यांचा कस लागला. प्रा. प्रवीण चव्हाण यांच्या संपर्कात आल्यानंतर माझ्या साहित्याच्या आवडीला विविधांगी वाचनाचं अधिष्ठान मिळालं. मला कवितेला नवं इंधन मिळत गेलं ते इथं आलेल्या वेगवेगळ्य़ा अनुभवांमुळं.
बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर हा आविष्कार पुरस्कार मला मिळाला खरा; पण त्याहून अधिक कॉलेजच्या या झिंगलेल्या या दिवसात सगळ्य़ात मोठा ऐवज म्हणजे माझं फ्रेन्डसर्कल.
मॉडेलिंग करणार्या मैत्रिणीपासून ते कट्टर कम्युनिस्ट मित्नापर्यंत, आपल्याच
कोशात राहणार्या मित्नापासून ते चळवळीचे पूर्ण वेळ काम करणार्या कार्यकर्त्या मित्नापर्यंत, सिनेमा, संगीत, साहित्य यांच्या वेड्या रसिक मित्नांपासून ते कविता, कथा
लिहिणार्या ‘कल्लाकारांपर्यंत’ असणारं माझं फ्रेन्डसर्कल हे सांस्कृतिक केंद्रच बनलं माझ्यासाठी.
या सर्वांसोबत मेधा पाटकरांपासून ते पी साईनाथांपर्यंत अनेकांना प्रत्यक्ष ऐकताना त्यांच्या जगण्याच्या क्युमिलेटिव संचिताचं दर्शन झालं. या फ्रेन्डसोबत रात्न-रात्न झालेल्या मैफिली आठवल्या तरी ‘ओ रे लम्हे तू कहीं मत जा, हो सके तो उम्रभर थम जा’ असं म्हणत काळाचा स्नॅपशॉट घेऊन थांबावंसं वाटतं; पण ते कसं शक्य आहे ‘चलती का नाम गाडी’ हा तर रु ल आहे इथला तेव्हा भागना तो पडेगाही !
- श्रीरंजन आवटे
(राज्यशास्त्रात एम.ए करून
पुढच्या शिक्षणाच्या तयारीला लागलेला,
दांडगं वाचन-लेखन असलेला हा दोस्त.)