डायरेक्ट कनेक्ट
By Admin | Updated: November 6, 2014 16:45 IST2014-11-06T16:45:02+5:302014-11-06T16:45:02+5:30
मोबाइलवरचं शुटिंग थेट टीव्हीवर पहायचंय?

डायरेक्ट कनेक्ट
>डीएलएनए नावाच्या तंत्राची कमाल
समजा, एखाद्या प्रसंगाचे शूटिंग तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये रेकॉर्ड केले आणि ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण परिवारासह बघायचे तर तुम्ही काय कराल? तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील तुमचे चित्रण एखाद्या पेनड्राईव्हमध्ये कॉपी कराल आणि तो पेनड्राईव्ह डिव्हीडी प्लेअरला लावून तुमच्या घरातील टीव्हीच्या मोठय़ा स्क्रिनवर पहाल.
परंतु आता ही पद्धतीदेखील जुनी झाली. कारण, आता असे तंत्रज्ञान बाजारात आले आहे की, तुमचा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप किंवा डिजिटल कॅमेरा यामधील फाईल्स डायरेक्ट तुमच्या घरातील टीव्हीवर पाहता येतील. म्हणजे तुमचा मोबाइल किंवा लॅपटॉपमधील फाईल्स तुम्ही तुमच्या घरातील टीव्हीवर शेअर करू शकता. त्या तंत्रज्ञानाचे नाव आहे डीएलएनए अर्थात डिजिटल लिव्हिंग नेटवर्क अलायन्स.
१ डीएलएनएचा इतिहास
पूर्वी घरातील वेगवेगळी करमणुकीची उपकरणे एकत्रित करून म्हणजे त्याचे होम नेटवर्क करणं खूप अवघड होतं. त्यासाठी या उपकरणांना आयपी अँड्रेस देऊन लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या साहाय्याने त्याचे होम नेटवर्क करून कंटेंट शेअरिंग केलं जात असे. ही तशी खूप क्लिष्ट पद्धत होती. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांनी एकत्रित येऊन कंटेंट शेअरिंगसाठी २00३ साली डीएलएनए हा एक अत्यंत सोपा पर्याय समोर आणला.
२ डिएलएनए कसं काम करतं?
तुम्हाला घरात जर डीएलएनए नेटवर्क सेटअप करायचा असेल तर तुम्हाला तुमचा टीव्ही हा डीएलएनए सर्टिफाईड अर्थात डीएलएनए तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारा हवा. त्यानंतर डीएलएनए सर्टिफिफाईड डिजिटल मीडिया सर्व्हर अर्थात तुमचा लॅपटॉप किंवा स्मार्टफोन डीएलएनए तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारा हवा. तुमचे नेटवर्क कनेक्ट करण्यासाठी इथरनेट केबल तसेच राऊटर आणि एक वायरलेस ब्रीज हवा. जो तुमच्या डीएलएनए डिव्हायसेसला टीव्हीसोबत जोडण्याचे काम करील. सर्वप्रथम तुमचा डीएलएनए सर्टिफाईड टीव्ही राऊटरला जोडा. टीव्ही राऊटरला जोडण्याच्या तीन पद्धती आहेत. एक तर सरळ सरळ इथरनेट केबल वापरून तुमचा टीव्ही राऊटरला जोडा किंवा तुमचा टीव्ही जर राऊटरपासून जास्त दूर असेल तर वायरलेस ब्रीज तुमच्या टीव्हीच्या इथरनेट पोर्टला जोडा म्हणजे तुमचा टीव्ही वायरलेसने तुमच्या राऊटरला कनेक्ट होईल. तिसरी पद्धत म्हणजे पॉवरलाइन केबल अडॉप्टर वापरून तुम्ही डीएलएनए नेटवर्क सेटअप उभारू शकता. यामध्ये तुमच्या घरातील पॉवर केबलचा वापर नेटवर्कसाठी केला जातो. यासाठी तुमच्या लॅपटॉपवर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागेल. विंडोज मीडिया प्लेअर ११ किंवा १२ मध्ये ही सुविधा आहे किंवा व्हायओ मीडिया सर्व्हर इन्स्टॉल करावे लागेल. एकदा का सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाले की, कुठले गाणे किंवा व्हिडिओ टीव्हीवर शेअर करायचे ते तुम्ही करू शकता.
३ डीएलएनए गॅजेटस्
आजकाल टीव्हीप्रमाणेच मोबाइलमध्येसुद्धा डीएलएनए तंत्रज्ञान यायला लागले आहे. त्यासाठी खास डीएलएनए अँप्ससुद्धा तयार करण्यात आले आहेत. अँण्ड्रॉईड तसेच विंडोज मोबाइलचे अँप्स डीएलएनएसाठी उपलब्ध आहेत. म्हणजे या अँप्सचा वापर करून तुमच्या डीएलएनए तंत्रज्ञानाचा सपोर्ट असलेला मोबाइलमधील कंटेंट तुम्ही तुमच्या टीव्हीवर शेअर करू शकता. मोबाइलप्रमाणेच डीएलएनए सर्टिफाईड डिजिटल कॅमेरासुद्धा आजकाल उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही काढलेले फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही टीव्हीवर शेअर करू शकता. त्याचप्रमाणे एव्ही सिस्टिमसुद्धा डीएलएनए तंत्रज्ञानासह उपलब्ध आहेत. डिव्हीडी प्लेअर, ब्ल्यू रे प्लेअर, डिजिटल फोटो फ्रेम, प्रिंटर, टॅब्लेट, सेटटॉप बॉक्स आदि अनेक उत्पादने आता डीएलएनए तंत्रज्ञानाला सपोर्ट करतात.
मुद्दा काय, जमाना एकत्रिकरणाचा आहे.
- अनिल भापकर
anil.bhapkar@lokmat.com