जानलेवा है; तो?
By Admin | Updated: March 20, 2015 15:56 IST2015-03-20T15:56:01+5:302015-03-20T15:56:01+5:30
सिगरेट आणि तंबाखूच्या व्यसनानं आयुष्य पोखरून निघालं मित्राचं, मरायला टेकला पण तंबाखू सुटेना, हे ऐकून मला गलबलून आलं. मला प्रत्येकाला सांगावंसं वाटत होतं, ‘‘मित्नांनो, जीव प्यारा असेल तर सिगरेट, तंबाखू, गुटका खाणं बंद करा.’’

जानलेवा है; तो?
सिगरेट आणि तंबाखूच्या व्यसनानं आयुष्य पोखरून निघालं मित्राचं, मरायला टेकला पण तंबाखू सुटेना, हे ऐकून मला गलबलून आलं. मला प्रत्येकाला सांगावंसं वाटत होतं, ‘‘मित्नांनो, जीव प्यारा असेल तर सिगरेट, तंबाखू, गुटका खाणं बंद करा.’’
असाच सुदीप माझा मित्न. मी त्याला म्हणालो, ‘‘अरे, मी जे काही मुक्तांगणमध्ये ऐकलं आहे त्यामुळे मला वाटतं तू तंबाखू खाणं बंद करावंस. मी तपशील सांगत नाही; पण माझा एक चांगला मित्न म्हणून मी ही विनंती करतोय.’’
‘‘अरे आनंदा, तू मला काय सांगणार याची मला कल्पना आहे. सगळे अनेकवेळा हेच सांगत आले आहेत. अगदी सिनेमाला गेलो तरी धूम्रपान कर्क रोगजन्य आहे हे वाचावंच लागतं. शेंबडं पोरसुद्धा तंबाखू वाईट असते हे सांगू शकेल. त्याच्याकरता मुक्तांगणमध्ये जाऊन माहिती काढायचं कारणच काय? हे बघ, मी गेली वीस वर्षे तंबाखू खातोय. तरी मला कुठलाही त्नास नाही. ब्लडप्रेशर एकदम नॉर्मल.’’
‘‘अरे आत्ता आहे पण पुढे कधीही होऊ शकते. मग आत्ताच काळजी घेणं चांगलं नाही का?’’
‘‘मी या गोष्टीचा अभ्यास केला आहे. भारताची लोकसंख्या घटकाभर १00 कोटी आहे असे गृहीत धरूया. त्यातल्या महिला आणि बारकी पोरं बाजूला ठेवू. म्हणजे किमान ४0 कोटी माणसं या ना त्या स्वरूपात तंबाखू वापरतात. त्यांच्यापैकी किती जणांना कर्करोग होतो? टक्केवारी काय? म्हणजे अगदी १0 टक्के गृहीत धरले तरी किती लोकांना कर्करोग होतो, तरी चार कोटी झाले. इतक्या कर्करोग पीडितांची नोंद आहे कुठे? याचाच अर्थ ९0 टक्के तंबाखू सेवन करणार्यांना कर्करोग होत नाही. नेहमी सकारात्मक विचार करत जा असं एका बाजूला सांगतोस. त्यामुळे उरलेल्या ९0 टक्के माणसातला मी एक आहे असं समजतो आणि पुढे जातो.’’
त्याचं बोलणं ऐकून मी थक्क झालो. वाटलं, किती या पळवाटा? किती हे बहाणे? आणि त्यांना काही सुमार?
असुरक्षित शरीरसंबंधांमुळे एचआयव्हीचा संसर्ग होतो हे सांगण्याकरता कित्येक अब्ज रुपये खर्च झाले याची गणतीच नाही; परंतु त्यापेक्षा शतपटीने घातक असलेल्या तंबाखूच्या विरोधात सरकार काय करतं? एक म्हणजे करात वाढ आणि दुसरं म्हणजे ‘तंबाखू - जानलेवा है’ अशी ओळ वेष्टनावर आणि चित्नपटात टाकायचा कायदा.
तंबाखू आणि दारूवरील कर हे केंद्र आणि राज्य सरकारांचे उत्पन्नाचे साधन आहे. ते कसे कमी करणार? मी हे सारं मनात बोलत असताना मला मुक्तांगणची प्रार्थना आठवली
जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया,
जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया.
सरकारचं धोरण आपण बदलू शकत नाही; परंतु या विषयाची माहिती तर पोहोचवता येऊ शकते. आपण पुन्हा पुन्हा सांगू, निदान काही तरुणांना तर पटेल? मुक्तांगणमध्ये स्वागत कक्षात वायंगणकर भेटले. त्यांच्याशी सहज बोलताना ते म्हणाले, ‘‘तुम्हाला आमच्या दिलीपची गोष्ट सांगतो.
एकदा मुक्तांगणमध्ये एका डेंटल कॉलेजने शिबिर भरवले होते. तेव्हा त्यांनी सर्व रुग्णमित्न आणि स्टाफची ओरल हेल्थची तपासणी केली. तेव्हा एकटा दिलीप कार्यक्र मानंतर त्या तज्ज्ञांना भेटायला गेला.
बाहेर आला ते तोंड पाडून. आम्ही विचारलं, का रे नेहमी हसवणारा तू असा मूड नसलेला का? काय झालं?
चार-पाच दिवसांनी त्याच्या बरोबर त्याची पत्नीही आली होती. मी रिसेप्शनवर होतो. मी नमस्कार केला. पण नेहमीचे हसू नव्हते. चेहरा म्लान झाला होता. ते दोघं मॅडमना भेटले. दिलीप खाली आल्यानंतर ती बराच वेळ मॅडमशी बोलत असावी. जाताना नेहमीप्रमाणे घरी कधी येणार? हा प्रश्न तिने विचारला नाही.
काही दिवसांनी तो लांब सुटीवर गेला. जाताना मी गावी जातोय असंच काहीतरी सांगितलं. पण परत येतो तर त्याच्या चेहर्यावर ऑपरेशन झाल्याच्या खुणा. तरी बिडी पेटवत म्हणाला, तोंडात एक गाठ होती, ती काढून टाकली.’
आम्ही विचारलं, तरीही तुझ्या बिड्याकाड्या चालूच?
तो म्हणतो, काय नाय होत.
आम्हाला मागाहून समजलं की त्याला कॅन्सर झाला होता म्हणून त्याला विडी-तंबाखू यांना स्पर्शसुद्धा करू देऊ नका असं बजावलं होतं. त्यानं फक्त प्रमाण कमी केलं. म्हणे दोनच्या ऐवजी एकाच बंडलात भागवतो.
मग त्याला रेडिओथेरपी सुरू झाली. हे महाराज हॉस्पिटलमध्ये जाताना आणि परत आल्यावर सतत बिडी पीत. त्याला रेडिओथेरपीचा प्रचंड त्नास झाला. तरी बिड्या चालूच. त्यानंतर किमो थेरपी सुरू झाली. त्यानंतर जवळ जवळ तीन महिन्यांनी कामावर रुजू झाला. आमचा संशय की कॅन्सर उलटला असणार. आत येताच एका ठरावीक जागी बसून तो विडी पीत असे. मस्तपैकी धूर काढत गप्पा मारत बसे. तो गेला. त्याच्यासोबत घरच्यांचीही वाताहत झाली.
ही कहाणी आम्ही मुक्तांगणमध्ये सगळ्यांना सांगतो. लोक हळहळतात. पण त्याचा त्याच्या तंबाखू खाण्यावर, विडी ओढण्यावर काही परिणाम का होत नाही?
का माणसं तंबाखू, बिडी सोडत नाहीत? का? - मला प्रश्न होताच. आणि उत्तर शोधत मी पुढं निघालो होतो.
तंबाखूचं व्यसन सुटत
का नाही?
१) तंबाखूचं व्यसन हा सर्वात मोठा
वस्तुस्थिती नाकारण्याचा आजार आहे.
२) माणसं तंबाखूच्या व्यसनाला नाकारतात, कारण
ेत्यांना ते सोडायचंच नसतं.
त्यामुळं ते वाट्टेल ते बहाणे सांगून, आपल्या व्यसनाचं सर्मथन करतात.
३) चहा आणि सिगरेट, तंबाखूशिवाय शौचाला साफ होत नाही, प्रेशरच येत नाही, असं सांगतात.
४) महिला सोयीची वेळ गाठून शौचाला जाण्यासाठी औषध म्हणून तंबाखू खातात.
५) तंबाखू, बिडी, गुटखा, सिगरेट हे तरुण मुलांना आपल्या यंग लाइफस्टाइलचे निदर्शक वाटतात.
६) काही मुली केवळ बंडखोरी म्हणत ही व्यसनं करतात.
७) ही सारी साधनं सर्वत्र स्वस्त, मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, सहज मिळतात.
८) या व्यसनातून सुटण्याचं ना गांभीर्य आहे, ना त्यासाठीची उपाययोजना आणि साधनं, उपचारांच्या सोयी.
- आनंद पटवर्धन
सहकार्य- मुक्तांगण व्यसनमुक्ती
केंद्र, पुणे