अ Date With आनंद

By Admin | Updated: November 6, 2014 16:51 IST2014-11-06T16:51:02+5:302014-11-06T16:51:02+5:30

जगात सगळं मिळतं पण आनंद मिळत नाही ! तो कसा शोधायचा, आनंदी रहायचं पण कसं? त्यासाठी काही जादू करता येईल का?

A Date With Enjoy | अ Date With आनंद

अ Date With आनंद

>दिवाळीची सुट्टी संपवून आपण सगळ्यांनी नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. दिवाळी हा आनंदाचा सण ! आनंद मिळवण्याचा आणि आनंद वाटायचा सण. पण असे काही सणासुदीचे दिवस सोडले तर आपल्या आसपास कायम आनंद शोधणारी माणसंच जास्त दिसत राहतात. कधी वाटतं, खरचं का या जगात आनंद इतका दूर्मिळ झालाय ? कुठे शोधायचा हा आनंद? आणि मुख्य म्हणजे कसा शोधायचा? 
गेल्या काही वर्षांत या जगातल्या गोष्टी वेगाने बदलत गेल्या. त्यात खरंतर अनेक आमूलाग्र बदल झाले. तसेच बदल माणसाच्या वृत्तीतही होत गेले. आपल्या हाकेच्या अंतरावर येऊन पोहोचलेला दहशतवाद. प्रदूषणासारखे वाढत जाणारे प्रश्न. आर्थिक मंदीचे जाणवणारे पडसाद. नोकर्‍यांचे निर्माण झालेले प्रश्न. जीवघेणी स्पर्धा. वाढता भ्रष्टाचार. याचसोबत आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत असणारेही खूप प्रश्न आहेतच ना.वाढती महागाई, नात्यांचे प्रश्न, जगण्याचे काच, कितीतरी आहेत.
मग या अशा जगात कुणालाही हा प्रश्न पडतोच की, हा आपला आनंद शोधायचा कुठं? कधी असं वाटतं तो हरवतच गेला आयुष्यातून हळूहळू. 
त्याचं कारण एकच, आजच्या जगात प्रत्येकाच्या मनात असुरक्षिततेची भावना खोलवर रूजत चालली आहे. आपलं कोणत्याच गोष्टीवर कसलंच नियंत्रण नाही याची जाणीव प्रखर होत आहे. जगण्यातली अशाश्‍वतता तर अंगावर येते आहे. मग कसा मिळणार तो आनंद..? कारण कितीतरी गोष्टी माझ्या मनाविरुद्धच घडतायेत ना ! हव्या त्या कॉलेजला, हव्या त्या कोर्सला अॅडमिशन मिळत नाही.
 मित्र  हवं ते सहकार्य देत नाहीत.. आईबाबा समजून घेत नाहीत. आणि असं असूनही मी आनंदी रहायचय? कसं शक्य आहे ते?
====
आनंद ही मनात चैतन्य निर्माण करणारी भावना आहे. जगण्याला सामोरं जाण्याची उमेद निर्माण करणारी भावना आहे. जगण्याच्या उत्साहात वाढ करणारी, आत्मविश्‍वास दृढ करणारी भावना आहे. जगण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पहायला शिकवणारी भावना आहे. आपल्या सर्वांनाच ही भावना हवी आहे; पण तुम्ही विचार केलाय का की, काय झालं किंवा केलं तर मला आनंद मिळेल?
मला खूप पैसा मिळाला तर मी खूष होईन? की गाडी-बंगला माझ्या मनातली स्वप्न पूर्ण झाली तर मी मनापासून खूष होईन? छान नोकरी मिळली तर?
परदेशी जाता आलं तर? आहे त्या नात्यातून घटस्फोट झाला तर? आई-बाबांनी हव्या त्या गोष्टी करायला परवानगी दिली तर?
====
विचार करा आणि तुमची एक यादीच तयार करा. आपल्याला खरंच आनंद नेमका कोणत्या गोष्टीतून मिळणार आहे? असा आनंद मिळवण्याचा खरंच काही फॉर्म्युला असतो का? अशा कितीतरी हव्या असणार्‍या गोष्टींमध्ये आपण तो शोधत रहायचंय का?
आणि या गोष्टींमध्येही तो सापडेलच हे कशावरून?
असा विचार केला की, लक्षात येईल.
आनंद हा शोधायचा नसतो, निवडायचा असतो.
- संज्योत देशपांडे
 
हॅपिनेस इज अ चॉईस
हॅपिनेस इज अॅक्चुली अ चॉईस, इट्स यूवर चॉईस टू बी हॅपी. या वाक्याचा विचार करून पाहिले तर तुम्हाला नक्कीच जाणवेल की सगळं मनाविरुद्ध घडणार्‍या या जगात अशीही काही माणसं आहेत की, आनंदी दिसतात. मग त्यांना कसं बरं जमतं हे सगळं? आनंद कोणत्या गोष्टींशी निगडीत असतो?
आनंद आणि स्वप्रतिमा 
स्वत:विषयी छान वाटणं हा आनंदाच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा भाग आहे.‘जब वी मेट’मधली गीतं आठवून पहा बरं. ‘मैं अपनी फेव्हरिट हूॅँ’ असं म्हणणारी किंवा ‘मेरा फेव्हरिट गेम जिंदगी है’ असं सांगणारी. स्वत:वर अतिशय खूष असणारी! आपलं स्वत:वर प्रेम असणं, स्वत:विषयी सकारात्मक वाटणं, स्वत:बरोबर कम्फर्टेबल राहता येणं या आनंदाच्या प्रक्रियेतल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जेव्हा जेव्हा आपण स्वत:वर नाखूष होतो तेव्हा या आनंदाला तडा जातो आणि मग आपण अजूनच स्वत:शी वाईट वागत राहतो. चुकीचं वागतोय असं समजून मग आपण स्वत:त बदलही करत नाही. माझं वजन वाढलय, मी व्यायाम करायला हवा, आहार नियंत्रित करायला हवा हे कळतं पण आपण यातलं काहीच करत नाही. स्वत:बद्दलची सकारात्मक स्वप्रतिमा मनात असणं, स्वत:सोबत कम्फर्टेबल असणं ही आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे.  आनंद हवा असेल तर स्वत:विषयी छान वाटणं खूप महत्त्वाचा आहे.
आनंद आणि लाईफस्टाइल
आपण अशा जगात वावरतो आहोत जिथे आपल्याला सेकंदासेकंदाचा हिशोब मनात करत वावरावं लागतं. रॅटरेस-स्पर्धा वाढणारा वेग आणि काहीतरी(?) मिळवण्याच्या नादात आपण खूप काही गमावून बसतो आहोत याचं भानच आता उरलेलं नाही. स्वत:साठी वेळ नाही, सगळेजण नुसते धावताना दिसतायत. आपली नाती, छंद, घर, स्वत: आपण सगळं नुसतं कायमचं होल्डवर ठेवलय.  ठरवा आणि प्लॅन करा, आनंदाबरोबर एक मिटिंग किंवा एक डेट !

Web Title: A Date With Enjoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.