D & A - अ‍ॅन्झायटी आणि डिप्रेशनशी लढताना ! world mental health awareness day

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 04:22 PM2019-10-10T16:22:47+5:302019-10-10T16:23:58+5:30

मन हलकं फुलकं ठेवण्यासाठी, नव्या नजरेनं आपलं जगणं समजून घेण्यासाठी फार कुठला वेगळा खर्च अपेक्षित नसतो. फार कुठल्या वेगळ्या क्लासलाही जायची गरज नसते. अगदी साध्या साध्या गोष्टीसुद्धा आपणच आपल्या मनाच्या आरोग्यासाठी नक्कीच अंगीकारू शकतो. काय काय करता येईल त्यासाठी?

D&A - Fighting Anxiety and Depression! world mental health awareness day | D & A - अ‍ॅन्झायटी आणि डिप्रेशनशी लढताना ! world mental health awareness day

D & A - अ‍ॅन्झायटी आणि डिप्रेशनशी लढताना ! world mental health awareness day

Next
ठळक मुद्देआपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. त्यांना भिंग लावून बघतो का आपण?

- प्राची पाठक

आजची तरु ण मुलं. हा विषय म्हणजे नव्याने येणार्‍या प्रत्येक पिढीत काहीतरी भयानक नवीन, उटपटांग चमत्कार झालाय, अशाप्रकारे बोलायचा एक ट्रेण्ड असतो. गंमत म्हणजे हा ट्रेण्ड प्रत्येक पिढीत असतो. आधीच्या कोणत्याही पिढीला ज्या सुविधा आणि मोकळिकीसाठी झगडायला लागलेलं असतं, बंड पुकारायला लागलेलं असतं, त्यापैकी अनेक सुविधा आणि  स्वातंत्र्य नवीन पिढीला अलगद हातात मिळालेलं असतं. आमच्यावेळी नव्हते रे बाबांनो हे सर्व, नीटपणे जगा जरा, इतकंच त्यांना खरं तर सांगायचं असतं. पण ते सुंदर फिलिंग व्यक्त होताना मात्र त्याची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स घेऊन समोरच्यावर क्षेपणास्नसारखं आदळतं. कोणी त्यातून सावरतात, कोणी कोशात जातात. कोणी केवळ शब्दच घेऊन बसतात आणि आतून दुखावले जातात. शब्दांच्या पलीकडचा माणूस आणि त्याचा कन्सर्न त्यांच्यार्पयत पोहोचतच नाही. नात्यांचे हजारो गुंते आणि प्रत्यक्ष परिस्थितीमधील तानेबाने यात सगळेच पिचून जातात. एकीकडे सर्वत्र सल्ले दिले जात असतात की संवाद साधा. मोकळेपणी बोलायला लागा. दुसरीकडे बोलायची सोय नसणं, ऐकून घेणारे कान नसणं, ऐकून घेणार्‍या लोकांवर विश्वास ठेवावा की नाही, याचा अंदाज नसणं, असे अनेक प्रश्न असतात. सगळीकडून कोंडी होते. तिच्यातून बाहेर पडायचा मार्गच दिसेनासा होतो. भरल्या घरातलं एकटेपण वाढत जातं. मग शरीराचं गणित कोलमडायला लागतं. खाणंपिणं, आरामदायी झोप, मनातून आनंदी असणं, लेट गो करता येणं, नवीन काही शिकायची ऊर्मी, स्वच्छ नजरेनं जग बघता येणं या सगळ्यांवर ताण पडायला लागतो. त्यातून एकटेपण, एकलकोंडेपण आणखीनच वाढत जातं.
दुसरीकडून आजची पिढी कशी फोनला खिळलेली, पिझा, बर्गरसारखं जंक फूड खाणारी, वेळेचा धरबंध नसलेली, व्यसनाधीन झालेली, रात्री उशिरा घरी येणारी, अतरंगी कपडे घालणारी, कोणाला न जुमानणारी पिढी, वगैरे चर्चाना ऊत आलेला असतो. अशा नजरेने आपल्याकडे बघणार्‍या या लोकांशी काय बोलणार, असा आपल्याला बेसिक प्रश्न पडलेला असतो. केवळ त्यांच्या त्या सहजच पास ऑन केलेल्या रिमार्क्‍समुळे आपणही त्यांना समजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला नसतो, हे कोणाला कळतच नाही. या बाजूचे किंवा त्या बाजूचे दोन्हीकडचे शिक्के मारणं फार सोपं होऊन जातं. मग सुरू होते ती फक्त आपल्याला सोयीस्कर असलेली बाजू बघून दुसर्‍यांना हे असंच आणि ते तसंच असं लेबल लावायची स्पर्धा. त्यांच्याशी काय बोलणार? त्यांच्याशी काय संवाद साधणार? हे प्रश्न मनात आले की मनमोकळं बोलायची गाडी रुळावरून घसरायला लागते. आपल्याही मनाचं कळत नकळत कंडिशनिंग होतं, दुसर्‍याला आपण एकाच नजरेने बघायला लागतो, हे कोण बघणार? मनातल्या सततच्या आंदोलनांमुळे  आणि  एखादं दोन घटनांमुळे डोळ्यांवर लावून घेतलेल्या चष्मातून आजूबाजूला असणार्‍या कोणातच आपल्याला संवाद साधायला योग्य अशी व्यक्ती सापडत नाही. घरच्या लोकांपासून एकतर लपून काही करावं लागणं किंवा त्यांच्याशी वरवर जेवढय़ास तेवढा संवाद साधत राहून आपल्या मनाचा थांगपत्ताही लागू न देणं, अशा ट्रिक्स आपोआप त्या नात्यांमध्ये जन्माला येतात. शरीर मनाच्या आरोग्यासाठी घरी मोकळे बोला, संवाद साधा, हे फक्त आदर्शवादी बोलणं ठरतं. ते कसं साधत जावं, ते कळत नाही. त्यातून एकटेपण आणखीन वाढत जातं किंवा चुकीच्या संगतीत जायची शक्यता वाढत जाते.
त्यात तिशीर्पयतचा काळ हा अनेक मानसिक समस्यांचादेखील डोकं वर काढायचा काळ असतो. आजूबाजूला प्रचंड स्पर्धा असते. आपल्यावर आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं, काहीतरी घडवायचं, आयुष्याला चांगला आकार देण्याचं प्रेशर असतं. या प्रेशरच्या आडूनदेखील कित्येक मानसिक समस्यांना स्वीकारणं टाळलं जातं. परिस्थिती आणखीन चिघळत जाते. आयुष्याची घडी पारच विस्कटायला लागते.
एकीकडे शरीर उत्तम दिसावं म्हणून वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सचे कपडे, दागदागिने, अ‍ॅक्सेसरीज वापरल्या जातात. जिमचं भूत डोक्यावर बसलेलं असतं. सायकलिंग, ट्रेकिंग, वेगवेगळे खेळ, विविध डाएट ट्राय केले जात असतात. परंतु, मनाची मशागत उत्तम करण्यासाठी विशेष कोणते प्रयत्न होत नाहीत. 
मन हलकं फुलकं ठेवण्यासाठी, नव्या नजरेनं आपलं जगणं समजून घेण्यासाठी फार कुठला वेगळा खर्च अपेक्षित नसतो. फार कुठल्या वेगळ्या क्लासलाही जायची गरज नसते. अगदी साध्यासाध्या गोष्टीसुद्धा आपणच आपल्या मनाच्या आरोग्यासाठी नक्कीच अंगीकारू शकतो. काय काय करता येईल त्यासाठी? 
मनाचं आरोग्य बिघडलं तर डॉक्टरकडे जावं, उपचार करून घ्यावेत हे खरं तर उत्तम. पण एरव्हीही ते आरोग्य बिघडूच नये म्हणून काही गोष्टी करता येतील.
ते कसं जमेल.
त्यासाठी हे काही करून पाहण्याचे उपाय.
******************


1. बोला.
बोलायला लागा, संवाद साधा, या केवळ सांगण्यापुरत्या गोष्टी न राहाता आपल्याला आवडणार्‍या विषयांवरती आजूबाजूच्या लोकांशी बोलायला सुरु वात करावी. आपल्याला जे काही खटकत आहे, त्याबद्दलदेखील बोलायचा सराव करावा. बोलण्याच्या अशा सरावातूनच ‘मनातलं बोलणं’ ही कला आपल्याला जमायला लागेल. आपल्या भावभावना समजून घेणारी हक्काची मंडळी आपल्या आसपास दिसू लागतील. एकटेपण अंगावर आदळणार नाही. आजूबाजूचे लोक इतके वाईट नसतात, असं आश्वासक काही समजून घेता येईल. त्यांचीही काही अपरिहार्यता असू शकते, म्हणून ते तसे वागतात, हे लक्षात येऊ लागेल. 

2. घरातल्यांशी मैत्री
आपल्या घरातले ज्येष्ठसुद्धा त्यांच्या त्यांच्या आयुष्यातल्या झगडय़ातूनच आज जिथे असतात तिथे असतात. त्यांनीही काहीतरी निर्माण केलेलं असतं. कदाचित ते आपल्यार्पयत पोहोचवायचं स्किल कमी पडत असेल. शब्द जरा पुढे मागे होत असतील. पण त्यापलीकडे काही प्रेम आणि काळजी असतेच की. ती अस्सल असते, इतकं तरी समजून घ्यावं. त्यातून होणारा फायदा दुहेरी असतो. दोन्ही बाजूंना एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी संवादाचा मार्ग खुला होतो. कॉमन इंटरेस्ट असलेल्या अनेक वाटा दिसू लागतात. आपल्याच घरात आपल्यासाठी चांगलं चिंतणारं कोणी आहे, त्यांच्याशी मनमोकळं बोलू शकतो, हा दिलासा मनाच्या अनेक लहान-मोठय़ा गुंत्यांना सहज सोडवून टाकतो.

3. पेशन्स !
आपल्या मनातल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्या लगेचच्या लगेच मिळणार नाहीत, हे समजून घ्यावं. आपले प्रश्न नक्कीच सच्चे असू शकतात. त्यात तथ्य असू शकतं. आपण बरोबर असू शकतो. तरीही काहीतरी अन्याय झालेला असतो. त्याही परिस्थितीत ‘याला काहीतरी दुसरी बाजू असू शकते, ती आज ना उद्या कळेल किंवा कळणार नाहीसुद्धा’ हा संयमाचा मंत्र आपल्याला देणं अत्यंत आवश्यक आहे.

4. झोप, जेवण आणि व्यायाम
हे खरं तर चावून चोथा झालेले विषय. तरीही आपल्याला झोप किती वेळ लागते, कशी लागते, आपण काय खातो दिवसभर, कोणत्या स्वरूपाचे व्यायाम करतो, कशा प्रकारचे शारीरिक कष्ट करतो, आपल्या मनाला तजेलदार वाटण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करतो, याचं ऑडिटच दर आठ-पंधरा दिवसांनी आपल्याशीच करावं. हे प्रत्येक ऑडिट आपल्या शरीर मनाशी आपली मैत्री होण्यासाठी अतिशय आवश्यक असतं.

5. नजरिया बदलो.
आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. त्यांना भिंग लावून बघतो का आपण? की फक्त आपल्या आयुष्यातल्या समस्यांना भिंग लावून लावून मोठं करतो? अमुक असंच आणि तमुक तसंच हे शिक्के मारण्याची घाई करायची नाही. लॉँग रोप द्यायचा. दुसर्‍या-तिसर्‍या बाजू समजून घेण्यासाठी मनात जागा ठेवायची. त्यातून विचारांना, मताला एकच एक रंग चढत नाही. दिल दिमाग खुला रखने का.. मन चंगा तो कठौती में गंगा, ह्याचा प्रत्यय मिळायच्या अनेक घटना आपल्या आपल्यालाच लक्षात येतील.. जरा नीटपणे जगू रे, असा दिलासा सतत आयुष्याकडून मिळत राहील.
ट्राय तो करो.

 

(प्राची पर्यावरणासह मानसशास्र अभ्यासक आहे.)

 

Web Title: D&A - Fighting Anxiety and Depression! world mental health awareness day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.